Wednesday, 4 December 2024


 

शेलसूर येथे श्री शिवाजी विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

बुलडाणा, दि. 3 (जिमाका): भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत असलेल्या नेहरु युवा केंद्र, बुलडाणा मेरा युवा भारत व श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत श्री शिवाजी विद्यालयाच्या परिसरात 28 नोव्हेंबर रोजी वृक्षरोपण करण्यात आले.

            यावेळी संग्राम देखमुख, विवेक पवार, प्राचार्य डी.एम. कापसे, एस.एम. केसकर, व्ही.आर. घ्याळ, पी जी. खरात, आर.वाय. जाधव, जे.पी. सोनाळकर उपस्थित होते. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी आईच्या सन्मानार्थ प्रत्येकी एक झाड दत्तक घेऊन त्याचे संगोपन करण्याची प्रतिज्ञा घेतली.

*****

9 डिसेंबर रोजी डाक अदालत

 

9 डिसेंबर रोजी डाक अदालत

बुलडाणा, दि. 3 (जिमाका): देशातील पोस्टाची सेवा ही सामाजिक व आर्थिक जीवनाचा एक अभिन्न भाग आहे. देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये अपरोक्षपणे पोस्टाच्या सेवेने एक वेगळ्या प्रकारचे स्थान निर्माण करुन प्रभावित केले आहे. पोस्ट खाते हे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा व ग्राहकांचे जास्तीत जास्त समाधान करण्याचा प्रयत्न करते. ही सेवा देतांना संभाषण, पत्रव्यवहार किंवा सेवेमधील काही त्रुटीमुळे असे काही प्रसंग निर्माण होतात की, ज्यामुळे पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रार करण्याची वेळ येते. ह्या तक्रारींचा योग्य प्रकारे न्याय निवाडा करण्यासाठी अधीक्षक डाक घर, बुलडाणा विभाग, बुलडाणा 443001 व्दारा सोमवार, दि. 9 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता अधीक्षक बुलडाणा डाक विभाग यांच्या कार्यालयामध्ये डाक अदालत आयोजित करण्यात येत आहे.

            पोस्टाच्या कार्याविषयी किंवा कामकाजाबद्दलच्या ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल, स्पीड पोस्ट, डाक वस्तू पार्सल, बचत बँक व मनीऑर्डर बाबतच्या तक्रारी विचार घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रारी पाठविली असेल त्याचे नाव, हुद्दा इत्यादी. संबंधित डाक सेवेबाबतची आपली तक्रार बुलडाणा डाक विभागाचे अधीक्षक गणेश अंभोरे यांच्या नावे दोन प्रतीसह शुक्रवार, दि. 6 डिसेंबर 2024 पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहचेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आपल्या तक्रारीची दखल घेतली जाणार नाही, असे बुलडाणा डाकघर विभागाचे अधीक्षक गणेश अंभोरे यांनी कळविले आहे.

*****

नवीन रुपात ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲप 1 डिसेंबर 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध

 

नवीन रुपात ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲप

1 डिसेंबर 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध

बुलडाणा, दि. 3 (जिमाका): रब्बी हंगाम 1 डिसेंबर 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरु होत असून शेतकऱ्यांना पीक पाहणी करण्यासाठी आधी ई-पीक पाहणी मोबाईल ॲप उपलब्ध होते. परंतू आता केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे त्यामध्ये काही तांत्रिक दुरुस्ती करुन नवीन रुपात ई-पीक पाहणी DCS उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. यानंतर 100 टक्के पीक पाहणी नवीन सुधारित ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲपव्दारे संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे.

शेतकरी स्वत: पिकांची नोंद ई-पीक पाहणी मोबाईल ॲपव्दारे नोंदवायचे व उर्वरित पीक पाहणी जे शेतकऱ्यांनी नोंदविलेली नाही ते तलाठी यांच्या मार्फत होत असायची. त्यामध्ये दुरुस्ती करुन शेतकऱ्यांना हंगामाच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी करण्यासाठी सहाय्यक यांची नेमणूक करण्यात येत आहे. प्रत्येक गावासाठी 1 सहाय्यक उपलब्ध राहणार असून सहाय्यक मार्फत पीक नोंदणी होणार आहे.

पीक विमा, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्ती, एमएसपी अंतर्गत पिकांची नोंद इत्यादी सुविधांचा लाभ घेण्यासाठी ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲपमध्ये पिकांची नोंद असणे आवश्यक आहे.

नवीन मोबाईल ॲप मधील आवश्यकतेनुसार पीक पाहणीसाठी निवडलेल्या गट क्रमांकापासून 50 मीटरच्या आत फोटो घेणे अनिवार्य आहे. पिकांचे दोन फोटो घेणे बंधनकारक आहे.

सुधारीत मोबाईल ॲप मधील नविन सुविधेनुसार शेतकऱ्यांच्या पीक पाहणी मदतीसाठी हंगाम सुरु होण्याच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी संबंधित समस्या सोडविण्यासाठी सहाय्यक उपलब्ध असेल.

सर्व शेतकऱ्यांनी आपली पीक पाहणी ठराविक मुदतीत करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

*****

जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2023-24 करीता अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2023-24 करीता अर्ज सादर करण्याचे आवाहन

             बुलडाणा, दि. 3 (जिमाका): महाराष्ट्र शासनाचे क्रीडा धोरण 2001 अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे मार्फत जिल्ह्यातील उत्कृष्ठ क्रीडापटू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व गुणवंत क्रीडा कार्यकर्ता यांच्या कार्याचे / योगदानाचे मुल्यमापन होवून त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा संघटक कार्यकर्ता आणि गुणवंत खेळाडू (पुरुष व महिला) यांना यावर्षी प्रजासत्ताक दिनी जिल्हा क्रीड पुरस्काराचे वितरण करण्यात येत आहे.  या पुरस्काराचे स्वरुप प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम रु.10,000/- असे आहे. त्या अनुषंगाने सन 2023-24 च्या पुरस्कारासाठी या कार्यालयामार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत.

            पुरस्काराचे निकष :  (1) पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग 15 वर्षे वास्तव्य असले पाहिजे, (2) क्रीडा मार्गदर्शक म्हणून सतत दहा वर्षे महाराष्ट्रात क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केले असले पाहिजे व त्याने वयाची 30 र्वो पुर्ण केलेली असणे आवश्यक आहे.  गुणांकनाकरीता त्या जिल्ह्यातील खेळाडूंचीच कामगिरी ग्राह्य धरली जाईल.गुणांकणाकरीता त्या जिल्ह्यातील कामगिरी ग्राह्य धरली जाईल.             (3) खेळाडूने व दिव्यांग खेळाडुने पुरस्कार वर्षासह लगतपुर्व 5 वर्षापैकी 2 वर्षे त्या जिल्ह्याचे मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धांमध्ये प्रतिनिधीत्व केले असले पाहिजे. (4) एका जिल्ह्यामध्ये जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. (5) एकदा एका खेळामध्ये किंवा एका प्रवर्गामध्ये जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त केलेली व्यक्ती पुन्हा त्याच खेळात किंवा प्रवर्गात जिल्हा क्रीडा पुरस्कार मिळण्यास पात्र असणार नाही.

            पुरस्कार वर्षाची गणना 1 जुलै ते 30 जुन असे राहील.  उपरोक्त तिनही पुरस्काराकरीता अर्जासोबत सादर करण्यात आलेले प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे पुन्हा पुन्हा (अनेकवेळा) सादर करु नयेत.  अर्जदाराने सादर केलेले कागदपत्रे व प्रमाणपत्र सत्य असलयाबाबतचे संबंधित तहसिलदार यांचेकडून ॲफीडीवेट करुन घ्यावे.

            विहीत नमुन्यातील अर्ज आणि पुरस्काराच्या अटी व शर्ती आणि अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलढाणा येथे कार्यालयीन वेळेत अर्ज प्राप्त करुन घेवुन सदरचे परिपुर्ण सिल बंद अर्ज दि.20 डिसेंबर 2024 पर्यंत या कार्यालयास सादर करावेत.  विहीत मुदतीनंतर अर्ज स्विकारले जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी असे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.बाळकृष्ण महानकर यांनी कळविले आहे.

*****

अंचरवाडीत आढळलेले हवामान यंत्र हे प्रादेशिक हवामान केंद्राचे !




 

अंचरवाडीत आढळलेले हवामान यंत्र हे प्रादेशिक हवामान केंद्राचे !

बुलढाणा, दि. 3 (जिमाका) : चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथे शेतात आढळलेले कोरीयन भाषेतील हवामान यंत्र हे प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांचे असून हवामानाच्या अभ्यासाकरीता नियमितपणे परीक्षणासाठी सोडण्यात आले होते. सदर यंत्रामुळे कोणत्याही प्रकारची वित्त व जीवितहानी झाली नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सोमवार, दि. 2 डिसेंबर रोजी अंचरवाडी ता. चिखली येथील व्दारकाबाई सिताराम परीहार व संजय सिताराम परीहार यांच्या शेतामध्ये कोरियन भाषेमध्ये लिहीलेला फुगा व दोरा अशा प्रकारचे हवामान यंत्र आढळून आले होते. या घटनेचा पंचनामा तहसीलदार चिखली यांनी केला असून हे यंत्र प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर यांचे असल्याचे निदर्शनास आले. या यंत्रामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, असा अहवाल तहसीलदार चिखली यांनी दिला आहे. तसेच सदर हवामान यंत्र ताब्यात घेण्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत सहायक संचालक, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांना कळविण्यात आले आहे.

हवामान तपासण्याकरीता प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांच्याकडून हवामान यंत्र नियमितपणे अवकाशात सोडले जातात. सदर हवामान यंत्र हे कोरियन निर्मितीचे आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये. तसेच अशा प्रकारचे हवामान यंत्र आढळून आल्यास स्थानिक प्रशासन व जिल्हा प्रशासनाला कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

*****

5 डिसेंबरला बुलढाण्यात जिल्हास्तरीय युवा महोत्सव

 5 डिसेंबरला बुलढाण्यात जिल्हास्तरीय युवा महोत्सव

युवक-युवतींनी सहभागी होण्याचे आवाहन

बुलढाणा, दि. 3 (जिमाका) : जिल्हा क्रीडा परिषद तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व  नेहरु युवा केंद्र ‘मेरा युवा भारत’ यांच्या संयुक्त विद्यामाने गुरुवार, दि. 5 डिसेंबर रोजी   जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल, जांभरून रोड, बुलढाणा येथे करण्यात आले आहे. या महोत्सवात जिल्ह्यातील युवक-युवतींनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या महोत्सवात समूह लोकनृत्य,  समूह गीत, कविता लेखन, कथालेखन, मोबाईल फोटोग्राफी, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व विज्ञान मेळावा (समूह व वैयक्तिक) युथ आयकॉन आदींचे आयोजन करण्यात आले आहे. यातील विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षीस, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यातील समूह लोकनृत्यासाठी प्रथम बक्षीस 7000 रुपये, द्वितीय  5000 रुपये व तृतीय 3000 रुपये, समूह लोकगीतासाठी प्रथम बक्षीस 5000 रुपये, द्वितीय  3000 रुपये व तृतीय 2500 रुपये, कविता लेखन व मोबाईल फोटोग्राफी स्पर्धेकरीता प्रथम बक्षीस 2500 रुपये, द्वितीय  1500 रुपये व तृतीय 1000 रुपये,  कथा लेखनासाठी प्रथम बक्षीस 3000 रुपये,   द्वितीय  2000 रुपये व तृतीय 1500 रुपये,  चित्रकला स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस 5000 रुपये,   द्वितीय  3000 रुपये व तृतीय 2000 रुपये,  वक्तृत्व स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस 5000 रुपये,   द्वितीय  2500 रुपये व तृतीय 1500 रुपये, विज्ञान मेळाव्यासाठी (समूह) प्रथम बक्षीस 7000 रुपये, द्वितीय  5000 रुपये व तृतीय 3000 रुपये व विज्ञान मेळाव्यासाठी (वैयक्तिक)  प्रथम बक्षीस 3000 रुपये,  द्वितीय  2000 रुपये व तृतीय 1500 रुपये या प्रमाणे बक्षीस देण्यात येणार आहे.    

यामधील विज्ञान मेळावा ही स्पर्धा राजर्षि शाहू अभियांत्रिकी  महाविद्यालय, बुलढाणा येथे आयोजित करण्यात आलेला आहे.   या महोत्सवात युवक-युवतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व  नेहरु युवा केंद्र, बुलढाणातर्फे करण्यात आले आहेत. अधिक माहितीकरीता क्रीडा  अधिकारी रविंद्र धारपवार (9970118797) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.  

*****