नव्या पिढीने संकल्प करुन कर्तव्यभावनेने शांतीदूत व्हावे
-अरुणभाई गुजराथी
*जिल्हास्तरीय युवा संसद कार्यक्रम संपन्न
बुलडाणा, दि. 27 : आजचा युवक अत्यंत हुशार आणि बुद्धिमान आहे. त्यांच्यात प्रचंड शक्ती आणि उर्जा आहे. युवकांच्या हातात सर्व शक्ती, सर्व प्रेरणा, सर्व चेतना, सर्व उर्जा आहे. एकता आणि एकात्मता जपण्यासाठी नव्या पिढीने संकल्प करून कर्तव्यभावनेने जगात शांती नांदावी यासाठी शांतीदूत व्हावे, असे आवाहन विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी यांनी केले.
नेहरु युवा केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने जिल्हास्तरीय युवा संसद कार्यक्रम शनिवार, दि. 25 मार्च रोजी सहकार ऑडीटोरियम येथे पार पडला. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, राधेश्याम चांडक, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. राजेश बुरंगे, रासेयो जिल्हा समन्वयक डॉ. विष्णू पडवाल, प्राचार्य डॉ. विजय नागरे, नायब तहसिलदार कल्याण काळदाते उपस्थित होते.
श्री. गुजराथी म्हणाले, युवकांनी चांगल्या कार्यासाठी पुढे यावे. स्वामी विवेकानंद यांनी सांगितल्याप्रमाणे एकच ध्येय ठेवावे. ते गाठण्यासाठी जिद्द, चिकाटीने सतत प्रयत्न करावे. जीवनात संधी ही अत्यंत महत्वाची आहे. युवकांनी श्वास, विश्वास, आणि आत्मविश्वास या तीन बाबी जपाव्यात, असे त्यांनी सांगितले.
खासदार श्री. जाधव यांनी, युवा संसदेच्या माध्यमातून चांगले युवा वक्ते तयार होत आहेत. यातून संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बोलण्याची संधी मिळणार आहे. शिस्तबद्ध जीवन लोकांसाठी त्याग करणारा, नैसर्गिक आपत्ती आणि संकटाच्या वेळी धावून जाणारा युवक घडावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
श्री. चांडक यांनी, युवकांनी स्वत:चे गुरु स्वत: व्हावे. आपल्याला भारतमातेचे काही देणे आहे. देशाने, निसर्गाची परतफेड म्हणून आपले ही काही देणे आहे, याचा विचार करावा. पाण्याचा अपव्यय टाळावा, मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करताना वृक्ष जगविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
नांद्राकोळी येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज संस्थेस वर्ष 2022-23चा जिल्हास्तरीय युवा मंडळ पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष सतिष उबाळे यांना देण्यात आला. तसेच ‘कॅच द रेन पोस्टर’चे विमोचन करण्यात आले. वर्ष 2021-22 मधील उत्कृष्ठ स्वयंसेवक म्हणून शेगाव येथील सुरज बोरसे, लाखनवाडा, ता. खामगाव येथील सुमित वाकोडे, लोणार येथील शितल मुंडे यांना गौरविण्यात आले.
जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी प्रास्ताविक केले. रणजितसिंग राजपूत यांनी सूत्रसंचालन केले. रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर कांदे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी धनंजय चाफेकर, विलास सोनोने, देवानंद नागरे, अजय सपकाळ, विनायक खरात यांनी पुढाकार घेतला.
00000
विशेष लोक अदालतीमध्ये 13 लाखांची नुकसान भरपाई
बुलडाणा, दि. 27 : राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वकील संघच्या वतीने शनिवार, दि. 25 मार्च रोजी विशेष लोकअदालत पार पडली. यात 13 लाख 35 हजार रूपयांचा विमा दावा अदा करण्याबाबत आदेश देण्यात आले.
लोकअदालतीमध्ये 18 प्रकरणे ठेवण्यात आली होती. यातील एक दावा निकाली काढण्यात आला. यात 13 लाख 35 हजार रूपयांचा नुकसान भरपाईचा दावा विमा कंपनीने अर्जदारास अदा करण्याबाबत आदेश देण्यात आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्नील खटी यांच्या अध्यक्षतेखाली पॅनेलप्रमुख म्हणून सहदिवाणी न्यायाधीश वरीष्ठस्तर डी. बी. हंबीरे, सहायक पंच म्हणून ॲड. आर. ई. निकम होते. लोकअदालतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव हेमंत भुरे, अधीक्षक एस. एस. अवचार, व्ही. डी. बोरेकर, सुनिल मुळे, आकाश अवचार, गजानन मानमोडे, वैभव मिलके यांनी पुढाकार घेतला.
000000
No comments:
Post a Comment