Tuesday, 21 March 2023

DIO BULDANA NEWS 21.03.2023







 जलजागृती सप्ताहानिमित्‍त जलदौड स्पर्धा उत्साहात 

बुलडाणा, दि. 21 : जलसंपदा विभागातर्फे दि. 16 ते 22 मार्च 2023 या कालावधीत जिल्ह्यात जलजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहानिमित्त जिजामाता प्रेक्षागार येथे जलदौड स्पर्धा घेण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी दौड स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवली. यावेळी उपस्थितांना जलप्रतिज्ञा देण्यात आली.

व्यापारी संकुलात दि. 20 मार्च रोजी सकाळी 7.30 वाजता वॉटर रन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत 18 वर्षाखालील मुलींमध्ये प्रथम गौरी राठोड, चिखली, द्वितीय ज्योती आराख, तिसरा क्रमांक पुजा मुखमाले हिने स्थान पटकावले. 18 वर्षावरील मुली, महिला गटात पहिला क्रमांक स्नेहल ऊमाळे, दुसरा प्रज्ञा सरकटे, तर तिसरा क्रमांक कोमल हिवाळे यांनी मिळविला.

18 वर्षाखालील मुलांच्या गटात प्रथम प्रणय टिचुकले, द्वितीय तेजस कानडजे, तिसरा क्रमांक शिवकुमार राठोड यांनी पटकाविला. 18 वर्षावरील गटात पहिला आकाश बारवाल, द्वितीय गजानन नागवे, तिसरा क्रमांक वैभव बरडे यांनी प्राप्त केला. खेळाडुंना प्रोत्साहन दिल्याबद्दल सिद्धी सोनुने ही चिमुकली, तर 75 वर्षे वयाचे मोहनसिंग तोमर यांचा जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावेळी कार्यकारी अभियंता प्रशांत संत, अमोल चोपडे, एस. एस. सोळंके, सहायक अधिक्षक अभियंता तुषार मेतकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे प्रमुख उपस्थित होते. यावेळी स्पर्धकांना जलप्रतिज्ञा देण्यात आली. पाणीटंचाईची निवारणासाठी उपलब्ध जलस्त्रोताचे संरक्षण आणि संवर्धन तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून मनोज श्रीवास, विजय वानखेडे, दिपक जाधव, हर्षल काळवाघे, राजेश डिडोळकर, रविंद्र गणेशे यांनी काम पाहिले. चंद्रकांत साळुंके  यांनी सूत्रसंचालन केले.

जलजागृती सप्ताहानिमित्त गेल्या आठवडाभरात विविध उपक्रम राबविण्यात आले. यात सोमवार, दि. 20 मार्च रोजी मोताळा बसस्थानक येथे जलप्रतिज्ञा वाचन आणि पाण्याचे महत्व याबाबत पत्रक वाटप करण्यात आले. तसेच रविवार, दि. 19 मार्च रोजी रोहना, ता. देऊळगाव राजा येथे उपविभागीय अधिकारी खडकपुर्णा धरण व्यवस्थापन उपविभाग, देऊळगाव मही यांनी जलजागृती सप्ताहानिमित्त माहिती देऊन पाणी बचतीचे महत्व सांगितले. संग्रामपूर येथे जिगाव प्रकल्प पुनर्वसन उपविभाग, शेगाव यांनी जलजागृती केली.

रोहडा आणि कोलारा या गावाच्या लाभ क्षेत्रातील नागरिकांकरिता जलजागृती सप्ताहांतर्गत सिद्धेश्वर संस्थान कोलारा येथे शनिवार, दि. 18 मार्च रोजी वसुंधरा पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष शेणफडराव घुबे यांनी पाणी बचतीबाबत व्याख्यान दिले. तसेच जिगाव प्रकल्प उपविभाग शेगाव, जळगाव जामोदतर्फे शाळांमध्ये जल प्रतिज्ञा घेण्यात आली. मेहकर पाटबंधारे उप विभागातर्फे दुसरबीड येथील जीवन विकास विद्यालयात ‘पाण्याची बचत काळाची गरज’ विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. तसेच लोकहित पाणी वापर संस्था मांडवा प्रकल्प व संत तुकाराम पाणी वापर संस्था दुसरबीड, दुसरबीड कोपबंचे अध्यक्ष, संचालक व पदाधिकारी समवेत बैठक घेण्यात आली. यात सिंचन कायदा आणि पाण्याच्या बचतीबाबत चर्चा करण्यात आली.

000000

नेहरू युवा केंद्रातर्फे रोजगार मार्गदर्शन

बुलडाणा, दि. 21 : नेहरू युवा केंद्रातर्फे खामगांव येथील गो. से. विज्ञान कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात शनिवार, दि. 18 मार्च रोजी रोजगाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

जळंब येथील सुरभी सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या सहकार्याने हा कार्यक्रम घेण्यात आला. प्राचार्य डॉ. डी. एस, तलवणकर अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून चिरायू पॉवर प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक करण चोपडा, युवाराष्ट्र परिवाराचे डॉ. निलेश पाटील, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे अनिल पाटील, उपप्राचार्य  डॉ. पी. वी. उबाळे, एकनाथ एकडे उपस्थित होते.

यात श्री. चोपडा यांनी रोजगाराबाबत मार्गदर्शन करताना जिद्द आणि चिकाटीतून व्यवसाय उभारता येतो. वर्तमानस्थितीत भारतीय युवकांची नोकरी भिमुख शिक्षण पद्धतीने व्यवसाय शिक्षण पद्धतीकडे वाटचाल होत आहे. उद्योजक जन्माला येत नाही तर तो घडविता येतो, याची अनेक उदाहरणे देऊन युवकांनी उद्योजकतेकडे वळावे, असे आवाहन केले. 

डॉ. निलेश पाटील यांनी व्यवहारातील काटेकोरपणा, प्रबळ इच्छाशक्ती, कामाची लाज न बाळगता व्यवसायाची संधी असलेल्या ठिकाणी जाण्याची तयारी, घरातील व्यक्तीचा सहभाग, लोक काय म्हणतील याची भीती न बाळगता पैशाचे मूल्य राखणे, हे गुण व्यवसायासाठी आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

प्राचार्य श्री. तळवळकर यांनी महाविद्यालयाच्या रोजगार प्लेसमेंट आणि करीयर गाईडन्स विभागातून सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येते. तसेच करीअरसाठी आजचा कार्यक्रम विद्यार्थ्यांना वेगळी वाट दाखवेल, असे मत व्यक्त केले.

उद्धव नेरकर यांनी सूत्रसंचालन केले. विद्याधर अठवार यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी केशव नेरकर, लक्ष्मण भोपळे, योगिता कोठाळे, सुवर्णा शिंदे यांनी पुढाकार घेतला.

000000

मत्स्य विभागाच्या निर्लेखित वाहनाची विक्री

बुलडाणा, दि. 21 : सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयाच्या निर्लेखित वाहनाची विक्री करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मत्स्य व्यवसाय विभागाचे जीप वाहन क्रमांक एमएच01 बी 8904 ही महिंद्रा पिजोड जीप  निर्लेखित करण्यात आली आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या प्रमाणपत्रानुसार  हे वाहन निर्लेखित करण्यात आले आहे. या वाहनाची विक्री परिवहन विभागाने ठरविलेल्या किमतीपेक्षा अधिक किंमतीने विक्री करावयाची आहे. हे वाहन खरेदी करू इच्छीणाऱ्यांनी दि. 24 मार्च 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय (तां), बुलडाणा, प्रशासकीय इमारत, पहिला माळा, बसस्थानकासमोर, बुलडाणा यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

000000

ओबीसी महामंडळाचे थकीत कर्ज भरणाऱ्यांना

व्याज रकमेत 50 टक्के सवलत

बुलडाणा, दि. 21 : इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळातर्फे विविध कर्ज योजनेंतर्गत लाभार्थ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. यात थकीत कर्ज रकमेचा एकरकमी भरणा करणाऱ्यांना व्याज रकमेत 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे.

इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळातर्फे स्वयंरोजगार उभारण्यासाठी अल्प व्याजदराने कर्ज वितरीत करण्यात आलेले आहे. या कर्जाच्या वसुलीबाबत संपुर्ण थकीत कर्ज रकमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थीच्या रकमेत 50 टक्के सवलत देण्याबाबत सुधारीत एकरकमी परतावा योजना कार्यान्वित केली आहे. ही योजना 31 मार्च 2023 पर्यंत राबविण्यात येणार आहे. महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थींनी या योजनेचा लाभ घ्यावा, यासाठी इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड बुलडाणा येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक भीमराव मुगदल यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment