बचतगटांनी उत्पादित वस्तूंच्या प्रदर्शनीचे उद्घाटन
*महिला आर्थिक विकास महामंडळाचे आयोजन
बुलडाणा, दि. 25 : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत बचतगटांनी उत्पादीत वस्तू आणि खाद्यपदार्थांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आज जिजामाता प्रेक्षागार येथे पार पडले.
खासदार प्रतापराव जाधव आणि जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांच्या हस्ते भव्य प्रदर्शनी आणि विक्रीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विभागीय सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी केशव पवार, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुमेध तायडे उपस्थित होते.
सुरवातीला माँ जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
तीन दिवस चालणाऱ्या या भव्य प्रदर्शनीमध्ये शंभराहून अधिक महिला बचतगटांनी सहभाग नोंदविला आहे. या बचत गटांनी स्वतः उत्पादित वस्तू आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल याठिकाणी लावले आहेत. नागरिकांनी प्रदर्शनीला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
पंडीत दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन
*दि. 25 ते 28 मार्च 2023 या कालावधीत ऑनलाईन मुलाखती
बुलडाणा, दि. 25 : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे पंडीत दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन दि. 25 ते 28 मार्च 2023 या कालावधीत करण्यात आले आहे.
सदर रोजगार मेळाव्यामध्ये खामगाव येथील हिंदुस्थान लिव्हर कंपनीने रोजगार मेळाव्यासाठी पदे अधिसुचित केली आहेत. सदर कार्यालयाकडे नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.. या मेळाव्याद्वारे हिंदुस्थान लिव्हर कंपनी प्रतिनिधीद्वारे गरजू व रोजगार इच्छुक उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेऊन त्यांची प्राथमिक निवड करतील. तसेच जिल्ह्यातील उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेल्या दहावी आणि बारावी पास पुरुष, महिला उमेदवारांनी आपले सेवासोजन कार्डचा आयडी आणि पासवर्डचा वापर करुन आपले लॉगइनमधून ऑनलाईन अर्ज (Apply) करुन यात सहभागी व्हावे. या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरीता कार्यालयात येण्याची गरज नाही. उमेदवार जेथे असतील त्याच ठिकाणावरुन आपल्या सेवायोजन (Employment) कार्डचा युझर आयडी आणि पासवर्डचा उपयोग करुन आपल्या लॉगइनमधून ऑनलाईन रोजगार मेळाव्यात ऑनलाईन पध्दतीने सहभागी होऊ शकतील.
पात्र उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा जास्त पदांकरीता अर्ज करु शकतील. दि. 25 ते 28 मार्च दरम्यानच्या मेळाव्याबाबत अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा या कार्यालयाशी प्रत्यश संपर्क साधावा, तसेच अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयाच्या (07262-242342) या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.
00000
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा दौरा
बुलडाणा, दि. 25 : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे रविवार दिनांक 26 मार्च रोजी सायंकाळी 6.45 वाजता शेगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल आणि त्यानंतर ते मुक्काम करतील. सोमवारी दिनांक 27 मार्च रोजी सकाळी आठ वाजता श्रींचे दर्शन घेतील. त्यानंतर नऊ वाजता शेगाव येथून अकोला कडे प्रयाण करतील.
00000
No comments:
Post a Comment