Friday, 10 March 2023

DIO BULDANA NEWS 10.03.2023

 गुरूवारपासून जलजागृती सप्ताहास सुरवात

बुलडाणा, दि. 10 : नागरिकांमध्ये पाण्याबाबत जागृती करण्यासाठी दरवर्षी जलजागृती सप्ताह राबविण्यात येतो. यावर्षी या सप्ताहास गुरूवार, दि. 16 मार्चपासून सुरूवात होणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांच्या उपस्थितीत जलजागृती सप्ताहास सुरूवात करण्यात येणार आहे. यावेळी जलपुजन आणि जलप्रतिज्ञेचे सामुदायिक वाचन करण्यात येणार आहे. सोमवार, दि. 20 मार्च रोजी सकाळी 7 वाजता जिजामाता प्रेक्षागा येथे जलदौड स्पर्धा घेण्यात येणार आहे. या सप्ताहाचा बुधवार, दि. 22 मार्च रोजी सकाळी 11 वाजता पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाच्या प्रांगणात समारोप करण्यात येणार आहे. यात नागरिकांनी सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले आहे.

00000

लाभार्थी निवडीसाठी सोमवारी ईश्वर चिठ्ठी

बुलडाणा, दि. 10 : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे विशेष घटक योजनेंतर्गत पिठाची चक्की, गिरणीच्या लाभार्थी निवडीसाठी सोमवार, दि. 13 मार्च रोजी ईश्वरचिठ्ठी काढण्यात येणार आहे.

एबाविसेयो प्रकल्पात बुलडाणा, चिखली, मेहकर, सिंदखेडराजा, मोताळा, खामगाव मधील विशेष घटक योजनेंतर्गत सन 2022-23 या वर्षात राबविण्यासाइी पात्र लाभार्थीमधून अंतिम लाभार्थीची निवड ईश्वरचिठ्ठीने करण्यात येणार आहे. यातील पात्र लाभार्थ्यांनी जिल्हा परिषदेतील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सकाळी 11.30 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

लघु तृणधान्य पिकांची लागवड करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 10 : भारतीय कृषि संस्कृतीचा अनिवार्य घटक असलेल्या तृणधान्याला जागतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लघू तृणधान्य पिकांच्या लागवडीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संयुक्त राष्ट्र संघाने २०२३ हे वर्ष जागतिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. भारताने यासंबंधीचा ठराव मांडला होता. यापूर्वी देखील कृषी शास्त्रज्ञ एम. एस. स्वामिनाथन यांनी तृणधान्याला पौष्टिक धान्य संबोधून अन्नधान्य सुरक्षा कायद्यामध्ये तृणधान्याचा समावेश करण्याचा सल्ला दिला आहे, देशात नाचणी, ज्वारी, बाजरी ही मुख्य तृणधान्य उत्पादित होतात.

तृणधान्य आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या पिकांमध्ये सर्व प्रकारची पौष्टिक गुणधर्म, खनिजे, जीवनसत्वे संतुलित आणि जास्त प्रमाणात आहेत. कमी ग्लायसेमिक इंडेक्स, उच्च कॅल्शियम, लोह, प्रथिने तसेच फायबर जास्त प्रमाणात असतात. त्यामुळेही पिके आरोग्याच्या दृष्टीने आणि भविष्यात मागणी असणारी आहेत.

तृणधान्य वातावरणाशी सुसंगत आहे. तृणधान्य पिकांची वाढ कोरडवाहू जमिनीसह पर्जन्यवृष्टी असलेल्या परिस्थितीत सुद्धा होते. अगदी निकृष्ट दर्जाच्या मातीतही तृणधान्य घेता येतात. वातावरणात कार्बनडायऑक्साइड उत्सर्जित करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

आयसीएआर संस्थेने तृणधान्य क्षेत्रातील संशोधनामध्ये विस्तृत काम केले आहे. संस्थेने अधिक उत्पन्न देणाऱ्या तृणधान्य वाणाचे मागील वर्षात देशाच्या विविध भागात वाटप केले आहे. कर्नाटकसह देशातील सर्वाधिक उत्पादन राज्याचे स्थान वरचे आहे. तृणधान्यांची आता शहरी ग्राहकांमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. तृणधान्याचे योग्य उत्पादन घेऊन आर्थिक उत्पन्न वाढवत येते. अजूनही आपल्या देशाची खरेदी प्रणाली तांदूळ आणि गहू या पिकावरच लक्ष केंद्रीत करीत आहे.

कमी कलावधी, कमी पाणी आणि हलक्या जमिनीत येणारे लघू तृणधान्य पिकामधील शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदेशीर ठरणारे आहे.

 

लघु तृणधान्य पिकांमधील नाचणी, राळा, कुटकी, वरई, सावा, भगर, कोद्रा, कोदो मध्ये प्रथिने, चरबीयुक्त पदार्थ, पिष्टमय पदार्थ, तंतुमय पदार्थ, ऊर्जा विपुल प्रमाणात असल्याने लघू तृणधान्य पिके घ्यावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.

000000

 

No comments:

Post a Comment