Wednesday, 8 March 2023

DIO BULDANA NEWS 08.03.2023

 


रोहयोमध्ये मजुरांची मजुरी अदा करण्यात जिल्हा अव्वल

*राज्यपाल, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव

बुलडाणा, दि. 8 : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणाऱ्या मजुरांची मजुरी त्यांच्या बँक खात्यामध्ये आठ दिवसाच्या आत जमा करण्याच्या बाबतीत जिल्ह्याने राज्यात पहिले स्थान पटकाविले. त्यानिमित्ताने मुंबई येथील यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये झालेल्या विशेष समारंभात जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांचा राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत कामाची मागणी करणाऱ्या गावातील मजुरांना गावात काम उपलब्ध करून देणे आणि त्या माध्यमातून गावामध्ये शाश्वत विकासाची कामे निर्माण करणे, तसेच पात्र लाभार्थ्यांना निकषानुसार वैयक्तिक कामे उपलब्ध करून देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे यासाठी ही योजना राबवली जाते.

मागील चार वर्षांपासून जिल्ह्याने या योजनेंतर्गत मजुरी करणाऱ्या मजुरांची मजुरीची रक्कम आठ दिवसांच्या मुदतीत त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याच्या बाबतीत कमालीचे सातत्य आणि तत्परता दाखवली आहे, त्याबद्दल हा सन्मान मिळवून जिल्ह्याने महाराष्ट्रात लौकिक मिळविला आहे.

जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मोहोड, उपजिल्हाधिकारी रोहयो अनिल माचेवाड, चिखली, खामगाव, संग्रामपूर येथील गटविकास अधिकारी, तसेच एमआयएस समन्वयक सचिन श्रीवास्तव यांचा सन्मान करण्यात आला.

00000

बुलडाण्यात शनिवारी रोजगार मेळावा

* 15 पेक्षा अधिक उद्योजकांकडून नोकरीची संधी

बुलडाणा, दि. 8 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने बुलडाणा येथे शनिवार, दि. 11 मार्च 2023 रोजी सकाळी 10 वाजता रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे. हा मेळावा चिखली रोडवरील रामजी सेलिब्रेशन मंगल कार्यालय येथे घेण्यात येणार आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये 15 पेक्षा अधिक उद्योजकांनी 1 हजार 52पेक्षा अधिक रिक्त पदे अधिसुचित केली आहेत. नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी रोजगार मेळाव्याचे योजन केले आहे. मेळाव्यात महिंद्रा, हिताची, डी. एम. एन्टरप्रायझेस यासारख्या नामांकित कंपनीचे प्रतिनिधी गरजू आणि रोजगार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन प्राथमिक निवड करतील. तसेच जिल्ह्यातील उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. जस्ट डायल, डी. एम. एन्टरप्रायझेस, पीपल ट्री ऑनलाईन, उत्कर्ष बँक, तोरणा महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी, टेक्नोक्राप्ट प्रायव्हेट लिमीटेड यासारख्या नामांकित कंपनीमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणाची संधी या मेळाव्याद्वारे उपलब्ध होणार आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेल्या दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधर पुरुष, महिला उमेदवारांनी मेळाव्याला प्रत्यक्ष उपस्थित राहावे. या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरीता कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही.

 पात्र, गरजू आणि नोकरी इच्छुक महिला आणि पुरुष उमेदवार शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा जास्त पदाकरिता अर्ज करु शकतील. मुलाखतस्थळी आवश्यक त्या कागदपत्रांसह उपस्थित राहून नाव नोंदणी करावी आणि उपस्थित कंपनींच्या प्रतिनिधीसमवेत मुलाखत द्यावी. जिल्ह्यातील उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे. याबाबत अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 07262-242342 वर संपर्क साधावा, असे कळविले आहे.

000000

No comments:

Post a Comment