रोजगार हमीमध्ये उत्कृष्ट कार्याचे जिल्ह्याला मिळाले दोन पुरस्कार
*जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांचा होणार सन्मान
बुलडाणा, दि. 1 : राज्याने देशपातळीवर दिलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामकाज केल्याबद्दल जिल्ह्याला दोन पुरस्कार मिळाले आहेत. वेळेत मजुरी प्रदान करणे आणि सर्वात कमी व्यवहार नकारल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांच्यासह अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
सन 202-21 पासून योजनेत उल्लेखनीय कामकाज केल्याबद्दल वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येतो. यावर्षी योजनेंतर्गत मजुरांची वेळेत देयके प्रदान करण्यामध्ये बुलडाणा जिल्हा अव्वल आहे. जिल्ह्याने वेळेवर 100 टक्के मजुरी प्रदान केली असल्याने जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा एमआयएस समन्वयक सचिन श्रीवास्तव यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्याचा व्यवहार नकारण्याचे प्रमाण सर्वात कमी म्हणजेच फक्त 0.9 टक्के आहे. सर्वात कमी व्यवहार नकारल्याबद्दल रोहयो उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरूण मोहोड, जिल्हा एमआयएस समन्वयक सचिन श्रीवास्तव यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.
रोहयोमध्ये 2020-21 पासून कुशल आणि अकुशल कामे करून राज्याने सतत अग्रेसर भुमिका राखली आहे. या कामांमधून मोठ्या प्रमाणावर मत्ता निर्माण करण्यात आली आहे. योजनेतून सार्वजनिक अणि वैयक्तिक स्वरूपाची कामे करण्यात येतात. सुविधा संपन्न कुटुंब मिशन आणि सर्वांगीण ग्रामसमृद्धी योजनेची अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हास्तरापासून गावपातळीवर रोजगार सेवकांपर्यंत आहे. त्यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी यांचा सन्मान करण्यात येतो.
रोहयोमधून प्रामुख्यान सार्वजनिक कामांमध्ये अंगणवाडी बांधकाम, गायगोठा, शेळी मेंढी पालन शेड, कुक्कुटपालन शेड, शेततळे, गोदाम बांधकाम, सिंचन विहिरी, नाडेप, वर्मी कंपोस्ट बांधकाम, वनीकरण, सामाजिक वनीकरण, शाळेला भिंत बांधकाम करणे, रेशीम उत्पादन, शोषखड्डे ही राबविण्यात येतात. सुविधा संपन्न कुटुंब मिशन आणि सर्वांगिण ग्रामसमृद्धी योजनेची अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हास्तरापासून ते गावपातळीपर्यंत अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी व रोजगार सेवकांपर्यंत असल्याने त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
00000
हमीदराने चणा खरेदीसाठी नोंदणीस सुरूवात
*जिल्ह्यात आठ खरेदी केंद्र
बुलडाणा, दि. 1 : जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत नाफेडतर्फे हमीदराने चणा खरेदीसाठी दि. २७ फेब्रुवारी २०२३ पासून नोंदणी सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये चणा खरेदीसाठी ८ खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे.
जिल्ह्यात तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादित बुलडाणा, लोणार, मेहकर, शेगाव, संग्रामपूर, सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी, अंजनी खु. केंद्र साखरखेर्डा, संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी, मोताळा, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था, चिखली या केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा पणन अधिकारी यांनी आठ खरेदी केंद्रांवर चणा नोंदणी सुरु करण्याचे आदेश दिले आहे.
शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करणेसाठी, आधारकार्ड, रब्बी २०२२-२३ चा सातबारा ऑनलाईन पिक पेऱ्यासह, आधारलिंक असलेल्या बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स, मोबाईल क्रमांक घेऊन कागदपत्रे स्कॅन करुन शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. हाताने लिहिलेले सातबारा आणि खाडाखोड केलेली कागदपत्रे स्विकारण्यात येणार नाहीत. नेमून दिलेल्या कालावधीतच शेतकऱ्यांची नोंदणी होणार असल्यामुळे दररोज नोंदणीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज त्याच दिवशी पोर्टलवर नोंदणी करुन घेण्यात येणार आहे. यात ऑफलाईन अर्ज स्विकारल्या जाणार नाहीत. तसेच ऑनलाईन सातबारावरील चणा पिक पेऱ्यापेक्षा जास्त क्षेत्रावर नोंदणी करण्यात येणार नाही. याची जबाबदारी खरेदी केंद्रावर राहणार आहे, असे जिल्हा पणन अधिकारी एम. जी. काकडे यांनी कळविले आहे.
00000
क्रीडा गुण सवलतीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 1 : यावर्षी दहावी, बारावीची परीक्षा देणाऱ्या खेळाडूंनी क्रीडा गुण सवलतीसाठी दि. 5 एप्रिल 2023 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन क्रीडा विभागाने केले आहे.
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा देणाऱ्यांनी जिल्हा, विभाग, राज्य स्तरावरील क्रीडा स्पर्धेत प्राविण्यप्राप्त, तसेच राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या आणि सहभागी झालेल्या खेळाडूंना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्यात येणार आहे. शाळा, खेळाडूंनी शासन निर्णयाचे अवलोकन करून प्रस्ताव सादर करावा लागणार आहे.
अमरावती विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी दिलेल्या विहित नमुन्यात शालेय किंवा संघटनेद्वारा आयोजित जिल्हा, विभागीय, राज्य व राष्ट्रीयख् आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या, सहभागी झालेल्या खेळाडूंचे प्रस्ताव, विहित नमुन्यात योग्य माहिती, आधार क्रमांक नमूद करून, परिक्षेचे प्रवेशपत्र, मान्यताप्राप्त खेळाचे प्रमाणपत्र प्रमाणित करून संबंधित शाळांचे, मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्यातर्फे दोन प्रतीत प्रस्ताव सादर करावे लागणार आहे. तसेच प्रती खेळाडू २५ रूपयांप्रमाणे एकूण खेळाडूचे शुल्क् जिल्हा क्रीडा अधिकारी बुलढाणा यांच्या नावे धनाकर्ष तयार करून शाळेने पाठवावे. दहावी आणि बारावी करीताचे प्रस्ताव स्वतंत्ररित्या सादर करावे लागणार आहे.
एकविध खेळाच्या अधिकृत संघटनांनी जिल्हा, विभाग, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे अहवाल dsobld@gmail.com या ईमेल वर पाठवावेत. त्याशिवाय संबंधित क्रीडा स्पर्धांचे प्रस्ताव विभागीय सचिव यांचेकडे सादर करता येणार नाही. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment