सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी यांना अभिवादन
बुलडाणा, दि. 31 : सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज दि. 31 ऑक्टोबर 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना एकात्मतेची शपथ देण्यात आली.
जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी सरदार वल्लभभाई पटेल जयंती आणि इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, उपजिल्हानिवडणूक अधिकारी गौरी सावंत, तहसीलदार शामला खोत, प्रिया सुळे, पुष्पा डाबेराव, नायब तहलिदार संजय बंगाळे, श्री. नाईक आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. तुम्मोड यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.
00000
राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने एकता दौड संपन्न
बुलडाणा, दि. 31 : जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरु युवा केंद्र आणि जिजामाता महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस-एकता दौड आज दि. 31 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुलात पार पडली.
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 147व्या जयंतीनिमित्ताने नागरिक, युवकांमध्ये देशभक्ती व राष्ट्रीय एकतेची भावना वृद्धींगत होण्यासाठी एकता दौडचे आयोजन करण्यात आले. आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांच्या हस्ते एकता दौडला हिरवी झेंडी दाखविली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे, तहसिलदार रुपेश खंडारे, नगर पालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, प्राथमिक शिक्षणाधिकारी किशोर पागोरे, वीज मंडळाचे उपअभियंता बद्रीनाथ जायभाये, उपशिक्षणाधिकारी उमेश जैन, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, महासैनिक प्रशिक्षण केंद्राचे कमांडर. सुहास देशमुख, नेहरु युवा केंद्राचे लेखा व कार्यक्रम पर्यवेक्षक अजयसिंग राजपूत उपस्थित होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी एकतेची शपथ दिली. त्यानंतर एकता दौडची सुरुवात करून जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुलात समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांतर्गत चिखली तालुका क्रीडा संकुल येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया तलवारबाजी प्रशिक्षण केंद्राचे खेळाडू, महासैनिकी प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षणार्थी, जिजामाता महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनाचे विद्यार्थी, विद्यार्थीनी, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे धनुर्विद्याचे खेळाडू, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र मैदानी, कबड्डी, विविध शाळेतील विद्यार्थी, सुर्योदय योगा ग्रुप, शासकीय व निमशासकीय कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, पोलिस विभाग, खेळाडू, विविध एकविध खेळ संघटनांचे पदाधिकारी, नागरिकांनी एकता दौडमध्ये सहभाग घेतला.
रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रभाकर वारे, प्रा. डॉ. डी. जे. कांदे, प्रा. पवन ठाकरे, प्रा. डॉ. मनोज व्यवहारे, प्रा. नंदूकुमार गायकवाड, प्रा. गजेंद्रसिंह राजपूत, प्राचार्य संजीवनी शेळके, नायब तहसिंलदार श्री. डब्बे, श्रीमती जानोरकर, संदिप पाटील, विनोद शिरखंडे, वासुदेव तायडे, मन्जीतसिंग राजपूत, जीवन उबरहंडे, ईश्वर वाघ, ॲड. सुमित सरदार, विजय वानखेडे, समाधान टेकाळे, राजेश डिडोळकर, विठ्ठल इंगळे, निलेश शिंदे, अक्षय गोलांडे, शुभम सुरडकर, राजेश शेळके उपस्थित होते.
क्रीडा अधिकारी रविंद्र धारपवार यांनी सूत्रसंचालन केले. राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर, तालुका क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे, विजय बोदडे, विनोद गायकवाड, गणेश डोंगरदिवे, कृष्णा नरोटे, गोपाल गोरे, भीमराव पवार, नेहरु युवा केंद्राचे सहाय्यक धनंजय चाफेकर, विलास सोनोने, राष्ट्रीय युवा स्वयंसेवक अजय सपकाळ यांनी पुढाकार घेतला.
00000
निवृत्तीवेतनधारकांनी बँकेतील यादीवर स्वाक्षरी करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 31 : निवृत्तीवेतनधारकांनी ह्यातीसाठी बॅकेतील यादीवर स्वाक्षरी करावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
राज्य शासनाचे सर्व निवृतीवेतनधारक, कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांचे माहे नोव्हेंबरमध्ये ह्यातीचे दाखले बँकेत सादर करण्यात येतात. त्यानुसार ह्यात प्रमाणपत्राची संगणकीकृत यादी कोषागारातून बँकेत पाठविण्यात आली आहे. सर्व निवृत्तीवेतनधारक, कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी ह्यात असल्याचे प्रमाणपत्र दि. 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत संबंधित बँकेत जाऊन यादीमध्ये स्वाक्षरी करावी, तसेच स्वाक्षरी सोबत पॅन क्रमांक नमूद करावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी ऋषिकेश वाघमारे यांनी केले आहे.
00000
बेरोजगार युवकांनी बँकेत संपर्क साधण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 31 : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामध्ये बेरोजगार युवक, युवतींनी अर्ज दाखल केले आहेत, त्यांनी कर्ज प्रकरणाबाबत बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामीण व शहरी भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतींसाठी स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु केलेला आहे. या योजनेस जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. पोर्टलवर दाखल होणाऱ्या कर्ज प्रकरणांना विविध बँकांच्या माध्यमातून मंजुरी मिळत आहे.
ऑनलाईन पोर्टलवर युवक, युवतींनी कर्जप्रस्ताव सादर केले आहेत, त्यांनी पोर्टलवर अपलोड केलेले मुळ कागदपत्र, तसेच ज्या जागेवर उद्योग व्यवसाय सुरु करणार आहे, त्या जागेचा उतारा, भाड्याची जागा असल्यास मालकाचे संमतीपत्र, मशिनरी, फर्निचर व इतर वस्तूंसाठी लागणारे दोन-तीन प्रकारचे तुलनात्मक कोटेशन्स, वीज जोडणी सुविधा उपलब्ध असल्याबाबत अलीकडील वीज बील भरल्याची पावती, पाणीपुरवठा सुविधा, आवश्यकतेप्रमाणे परवाने आदी कागदोपत्रासह अर्ज केलेल्या बँक शाखेत तातडीने संपर्क साधावा. बँक अधिकारी आवश्यक कागदोपत्राची छाननी करुन कर्जमंजुरीसाठी त्वरीत निर्णय घेतील. याबाबत सूचना अध्यक्ष जिल्हास्तरीय कार्यबल समिती मुरोनिक तथा जिल्हाधिकारी यांनी जिल्हास्तरीय कार्यबल समिती सभेत अंमलबजावणी यंत्रणा व सर्व बँक अधिकारी यांना सुचना दिल्या आहेत, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी कळविले आहे.
00000
भ्रष्टाचार विरोधात दक्षता जनजागृती सप्ताह
बुलडाणा, दि. 31 : केंद्रीय दक्षता आयोग प्रतिवर्षी दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करतो. त्यानुसार राज्यात दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. सप्ताह कालावधीत विविध माध्यमाद्वारे भ्रष्टाचार विरोधातील कारवाईबाबत नागरिकांशी संपर्क साधून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
भ्रष्टाचार विरोधात महसूल, नगर परिषद, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, तहसिल कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस, विद्युत महामंडळ, व्यवसाय विभाग, आयकर, नगर रचना विभाग, जिल्हा उपनिबंधक, दुय्यम उपनिबंधक, कोषागार, सहकारी पतसंस्था, राज्य परिवहन महामंडळ, उपप्रादेशिक परिवहन विभाग, शासनाकडून अनुदान मिळणाऱ्या सर्व संस्था व शैक्षणिक संस्था, सर्व शासकीय कार्यालय तसेच अन्य सर्व महामंडळे, सर्व लोकसेवक व खाजगी व्यक्ती यांच्या विरूद्ध तक्रार करता येते.
भ्रष्टाचाराच्या मार्गाने अधिकारी, कर्मचारी, लोकसेवकांनी बेहिशेबी संपत्ती जमविण्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर त्यातील सत्यता व विश्वासर्हता पडताळल्यानंतर कार्यवाही करण्यात येते. तक्रारकर्त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येते. जनतेमध्ये भ्रष्टाचारविरोधी जनजागृती करण्याचे उद्देशाने भ्रष्टाचारासंबधी माहिती असल्यास अथवा लाच मागणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचारी लोकसेवकांबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा कार्यालयाच्या 07262-242548, मोबाईल क्रमांक 8888768218, 8668627737 व टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा, असे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक विभागोच पोलिस उपअधिक्षक संजय चौधरी यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment