Tuesday, 11 October 2022

DIO BULDANA NEWS 11.10.2022

 

शनिवारी पंडीत दिनदयाल उपाध्याय महारोजगार मेळावा

*साखरखेर्डात होणार 650 पदांची भरती प्रक्रिया

बुलडाणा, दि. 11 : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन साखरखेर्डा येथे शनिवार, दि. 15 ऑक्टोबर 2022 रोजी आयोजित करण्यात आले आहे.

सदर रोजगार मेळावे साखरखेर्डा, ता. सिंदखेड राजा येथील स्व. भास्करराव शिंगणे कला, प्रा. नारायणराव गावंडे विज्ञान व आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालयात घेण्यात येणार आहे. सदर रोजगार मेळाव्यात नामांकीत खाजगी उद्योजक, कंपनी, त्यांचे प्रतिनिधी 650  पेक्षा अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवतील. यात पात्र पुरूष आणि महिला उमेदवारांच्या मुलाखती घेऊन पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेल्या दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधर पुरुष, महिला उमेदवारांनी दि. 15 ऑक्टोबर 2022 रोजी रोजगार मेळाव्यात प्रत्यक्ष उपस्थित राहून किंवा आपले सेवायोजन कार्डचे युजर आयडी पासवर्डचा वापर करुन आपले लॉगइन मधून ऑनलाईन अर्ज करुनही यात सहभागी होऊन शकतील. या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरीता कार्यालयात येण्याची गरज नाही.

पात्र असलेल्या पुरुष आणि महिला उमेदवार आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा जास्त पदासाठी ऑनलाईन अर्ज करु शकतील. इच्छुक उमेदवारांनी दि. 15 ऑक्टोबर 2022 रोजी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून आपली नाव नोंदणी करावी, तसेच उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधी समवेत मुलाखत द्यावी. याबाबत काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा या कार्यालयाच्या (07262-242342) या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रां. यो. बारस्कर यांनी केले आहे.

00000



कृषि विज्ञान केंद्रात शेडनेट उभारणी, लागवड व्यवस्थापन प्रशिक्षण

बुलडाणा, दि. 11 : नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, फलोत्पादन औषधी वनस्पती मंडळ, सहकार विकास महामंडळ आणि कृषि विज्ञान केंद्रातर्फे दि. १० ते १४ ऑक्टोबर २०२२ दरम्यान शेडनेट उभारणी व लागवड व्यवस्थापन प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्रात घेण्यात येत आहे.

प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी केले. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. अनिल तारू, प्रकल्प विशेषज्ञ उमेश जाधव, डॉ. नरेंद्रकुमार देशमुख, प्रविण देशपांडे, डॉ. भारती तिजारे, डॉ. सुकेशनी वने, डॉ. जगदीश वाडकर, मनेश यदुलवार, सहकार विकास महामंडळाचे प्रशिक्षण अधिकारी हेमंत जगताप आदी उपस्थित होते.

श्री. डाबरे यांनी शेडनेट हाऊस ही काळाची गरज आहे. शेतकऱ्यांनी शेतामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, तसेच परिसरातील शेडनेट हाऊसला शेतकऱ्यांना भेटी देऊन यातील अडचणी समजून त्यावर मात करावी. कृषी विभागातील विविध योजनांचा लाभ घेऊन आर्थिक प्रगती साधावी. शेडनेट उभारणीसाठी विविध योजना असून ५० ते ७५ टक्क्यांपर्यंतचे अनुदान देण्यात येत असल्याचे सांगितले. श्री. देशमुख यांनी शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले.

श्री. जगताप यांनी प्रास्ताविक केले. शुभांगी भोलनकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रवीण देशपांडे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी कृषी प्रकल्प विशेषज्ञ उमेश जाधव, मनुष्यबळ विकास प्रकल्प विशेषज्ञ प्रदीप पवार, पोकराचे विजय जाधव यांनी पुढाकार घेतला.

00000

क्रीडा शिक्षकांसाठी राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर क्रीडा प्रशिक्षण शिबीर

            बुलडाणा, दि. 11 : क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे शिक्षकांसाठी राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर्स क्रीडा प्रशिक्षण शिबीर सन 2022-23 या वर्षात आयोजित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 10 शिक्षकांची निवड करुन राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर क्रीडा प्रशिक्षण शिबीराकरीता पाठविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व अनुदानित व विना अनुदानित उच्च माध्यमिक, माध्यमिक व प्राथमिक शाळा, आश्रमशाळेतील कार्यरत असलेले शिक्षकांची यात निवड करण्यात येणार आहे.यात ॲथलेटीक्स, बास्केटबॉल, खो-खो, टेबल टेनिस, हॅण्डबॉल, तिरंदाजी, सायकलींग, टेनिस, बॉक्सिंग, कबड्डी, ॲक्वेटिक्स, जिम्नॅस्टिक, शुटिंग, हॉकी, रोईंग, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, कुस्ती, फुटबॉल या खेळांमध्ये प्रशिक्षण देण्याचा अनुभव, खेळाची माहिती तसेच वैयक्तिक खेळातील कामगिरी, क्रीडा क्षेत्रात काम केल्याचा अनुभव, एनआयएस पदविका किंवा प्रमाणपत्र आदीबाबतची माहिती सादर करावी लागणार आहे.

पंच परिक्षा प्रमाणपत्र माहिती, पंच, सामनाधिकारी म्हणून काम केले असल्यास ते अनुभव प्रमाणपत्र, यापुर्वी क्रीडा विभागात किंवा इतर खात्यामार्फत मास्टर ट्रेनर म्हणून प्रशिक्षण घेतले असल्यास त्याबाबतचा तपशिल, आपल्या शाळेतील खेळनिहाय असलेल्या क्रीडा सुविधांचा तपशिल, शाळेचे शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये घेण्यात येत असलेल्या सहभाग व प्राविण्याबाबत माहिती आदी बाबींचा विचार करुन जिल्ह्यातील 10 अनुभवी शिक्षकांची मास्टर ट्रेनर करीता निवड करण्यात येणार आहे.

परिशिष्ट ‘अ’ हा परिपूर्ण भरुन, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यामार्फत सादर करावयाचा आहे. अर्जाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहे. परिपूर्ण प्रस्ताव दि. 20 डिसेंबर 2022 पर्यंत स्विकारल्या जातील. अर्जाचा नमुना याच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अनुभवी व क्रीडा क्षेत्रातील तज्‍ज्ञ व्यक्तींनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

00000

गांधी सप्ताहात अवैध दारूचे 70 गुन्हे नोंद

*राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

बुलडाणा, दि. 11 : राज्य उत्पादन शुल्क विभागाने दि. 2 ते 8 ऑक्टोबर 2022 या कालावधीत गांधी सप्ताहानिमित्त जिल्ह्यात अवैध दारू विरोधात धडक मोहिम राबविली. या मोहिमेत एकूण 70 गुन्हे नोंदविण्यात आले. या कारवाईत 67 वारस आणि 3 बेवारस गुन्ह्यांचा समावेश आहे. यात 67 आरोपींना अटक करण्यात आली असून 4 वाहने जप्त करुन 7 लाख 97 हजार 859 मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई निरीक्षक किशोर पाटील, जी. आर. गावंडे, दुय्यम निरीक्षक आर. आर. उरकुडे, ए. आर. आडळकर, आर. के. फुसे, पी. व्ही. मुंगडे, एस. जी. मोरे, एस. डी. चव्हाण, आर. ई. सोनुने,  सहायक दुय्यम निरीक्षक एन. ए. देशमुख. जी. व्ही. पहाडे. एस. आर. एडसकर. जवान एन. ए. सोळंकी, ए. पी. तिवाने, पी. ई. चव्हाण, एस. बी. निकाळजे, एस. डी. जाधव, ए. एस. अवचार, वाहनचालक आर. ए. कुसळकर, एम. एस. जाधव, व्ही. पी. पाटील व प्रफुल्ल साखरे यांनी केली.

अवैध दारुविरूद्ध धडक‍ मोहिम राबविण्यात येत आहे. अवैध मद्य निर्मिती, विक्री व वाहतूक आदीबाबत तक्रारी असल्यास त्या विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर 1800233999 व व्हॉट्स ॲप क्रमांक 8422001133 या क्रमांकावर नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

                                      000000

 

No comments:

Post a Comment