नेहरू युवा केंद्राचा जिल्हास्तरीय युवा उत्सव संपन्न
बुलडाणा, दि. 6 : नेहरू युवा केंद्रातर्फे आयोजित युवा उत्सव सोमवार, दि. 3 ऑक्टोबर रोजी जिल्हा क्रीडा संकुलामध्ये उत्साहात पार पडला. जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी द्विप प्रज्ज्वलन करून युवा उत्सवाचे उद्घाटन केले. जिल्हास्तरीय युवा उत्सवात चित्रकला, कविता लेखन, छायाचित्र, भाषण, युवा संवाद व सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या.
कार्यक्रमाला खासदार प्रतापराव जाधव, जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते ओमसिंग राजपूत उपस्थित होते.
खासदार प्रतापराव जाधव म्हणाले, युवकांतील सुप्त कलागुणांना व्यासपीठ देण्याचे कार्य युवा उत्सवाच्या माध्यमातून होते. देशाचे भवितव्य युवकांच्या हातात आहे. उद्याचा भारत युवकांच्या मनगटातील ताकतीवर घडणार आहे. युवकांना योग्य मार्गदर्शन व चांगले विचार देण्याची गरज आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती म्हणाले, देशात सर्वाधिक संख्या युवकांची आहे. वर्ष 2040 पर्यंत भारत सर्वात जास्त युवाशक्ती असलेला देश राहणार आहे. या युवा शक्तीचा उपयोग राष्ट्र निर्माणासाठी व्हावा.
जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांच्या हस्ते समारोपीय कार्यक्रमात बक्षीस वितरण करण्यात आले. भाषण स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक विजया काळे, द्वितीय अंजली औतकर, तृतीय गायत्री इंगळे यांनी पटकविला. छायाचित्र स्पर्धेत प्रथम भूषण लोढे, द्वितीय विधी राठी, तृतीय साहिल बोराळे यांनी पटकविला. कविता लेखन स्पर्धेमध्ये प्रथम देवानंद निंबाळकर, द्वितीय वेदांत बोबडे, तृतीय गायत्री होगे यांनी पटकविला. चित्रकला, पोस्टर स्पर्धेमध्ये प्रथम गौरव परदेशी, द्वितीय नम्रता सोनोने, तृतीय वैष्णवी पायघन यांनी पटकविला. युवा संवादमध्ये आरती मोरे, पवन निंबाळकर, ऋतुजा वर्मा, मंगेश राजगुरु यांनी बक्षीस पटकविले.
सांस्कृतिक कार्यक्रमात प्रथम गावंडे कॉलेज ऑफ फार्मसी, साखरखेर्डा, द्वितीय स्व. भास्करराव शिंगणे कला महाविद्यालय, साखरखेर्डा, तृतीय नृत्यांजली खामगांव यांनी पटकविला. रणजितसिंग राजपूत यांनी सूत्रसंचालन केले. लेखा व कार्यक्रम पर्यवेक्षक अजयसिंग राजपूत यांनी आभार मानले.
यावेळी जिल्हास्तरीय युवा मंडळ पुरस्कार कृषि समृध्दी मल्टीपर्पज संस्था, सुंदरखेड यांना देण्यात आला. तसेच शाहिरी लोककलामधील योगदानाबद्दल युवा शाहिर विक्रांतसिंग राजपूत, आपत्ती व्यवस्थापन कार्यातील योगदानाबद्दल प्रवीण साखरे, राष्ट्रीय तलवारबाजी कास्य पदक विजेता पौरस देशमुख, विद्यापीठ प्रतिनिधी एनएसएस प्रकाश ब्राम्हणे यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमासाठी धनंजय चाफेकर, विलास सोनोने, अजय सपकाळ, नितीन शेळके, उमेश बावस्कर, राहूल पवनकार, विनायक खरात, सुमित वाकोडे, सुरज बोरसे, रिता वानखेडे, विशाल अंभोरे, शिवाजी हावरे, देवानंद नागरे, इरफान शहा, गणेश सुर्यवंशी, वैभव नालट, शितल मुंढे, शुभम वाठोरे, दिनेश चव्हाण, विजय जाधव यांनी पुढाकार घेतला.
000000
फिट इंडिया फ्रीडम रनमध्ये सहभागी व्हावे
*क्रीडा विभागाचे आवाहन
बुलडाणा, दि. 6 : फिट इंडिया फ्रीडम रन 3.0 किमी धावणे उपक्रमाचे दि. 2 ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत राज्यामध्ये व्यापक स्वरुपात आयोजन करण्यात येणार आहे. यात सहभागी व्हावे, असे आवाहन क्रीडा विभागातर्फे करण्यात आले आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने फिट इंडिया फ्रीडम रन उपक्रमात घरात बसून कामकाज करणाऱ्या युवक-युवती, नागरिक आणि गृहिणी या सर्वांना देखील फ्रीडम रन या उपक्रमात सहभागी करुन घेण्यात येणार आहे.
फिट इंडीया फ्रीडम रनमध्ये सहभागी होण्यासाठी फिट इंडीया फ्रीडम रन या वेबसाईटवर संघटक म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी रजिस्टर करण्यासाठी माहिती भरावी लागणार आहे. उपरोक्त डेटा स्वतंत्रपणे या संकेतस्थळावर मोबाईलद्वारे किंवा इतर ॲपद्वारे अपलोड करावा लागणार आहे. उपरोक्त माहिती अपलोड केल्यानंतर यामध्ये सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र ईमेलद्वारे प्राप्त होणार आहे. सहभागी झालेल्या व्यक्तींनी धावलेले, चाललेले अंतर, मॅरेथॉन फिट इंडिया पोर्टलवर fitindia.gov.in नोंद करावी लागणार आहे.
फिट इंडिया मिशनतर्फे संघटक आणि व्यक्तींना परस्परांमधील अंतर राखण्याच्या निकषांनुसार दि. 2 ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत धावणे, चालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच फिटनेस का डोस आधा घंटा रोज हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात तुम्ही कोठेही चालू शकता, कधीही पळू शकणार आहे. प्रत्येक जण धावणे, चालण्यासाठी आपल्या आवडीचा मार्ग आणि अनुकूल वेळ निवडू शकतील. आवश्यकतेनुसार काही मिनिटांची विश्रांती घेऊनही धावणे, चालणे करु शकणार आहेत. यात सहभागी प्रत्येकास स्वत:च्या वेगाने धावणे, चालण्याची मुभा असणार आहे. स्वयंचलित किंवा कोणत्याही ट्रॅकिंग ॲप किंवा जीपीएस घड्याळाचा वापर करुन धावलेल्या, चाललेल्या अंतराचा मागोवा घेता येणार आहे.
जिल्हास्तरीय उपक्रमांमध्ये सर्व पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र, स्काऊट ॲण्ड गाईड, नेहरु युवा केंद्राचे युवक, एनएसएसचे छात्र, महाविद्यालयीन तसेच शालेय छात्र, खासगी संस्था, कार्यालयातील कर्मचारी, सर्व खेळाडू यांनी व्यापक प्रमाणात सहभागी होण्यास प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment