राष्ट्रीय
स्पर्धेत मोनालीला सुवर्ण, प्रथमेशला कास्य पदक
बुलडाणा, दि. 14 : गुजरात येथे आयोजित 36व्या राष्ट्रीय
स्पर्धेत बुलडाणाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. यात खेळाडूंनी एक सुवर्ण व
एक कास्य पदक पटकाविले आहे. धनुर्विद्या खेळात कंपाऊंड या प्रकारात मोनाली जाधवने
सुवर्ण पदक, तर प्रथमेश जवकार याने कास्य पदक प्राप्त केले.
मोनाली जाधव हिने याआधी धनुर्विद्या खेळात जागतिक पोलिस क्रीडा
स्पर्धेत दोन सुवर्ण, एक कास्य पदक पटकाविले आहे. सिनिअर नॅशनल स्पर्धेत रजत पदक व
तीन कास्य पदक मिळविले आहे. तसेच सिक्स ऑल इंडिया पोलिस स्पर्धेत कास्य पदक, सेवन
ऑल इंडिया पोलिस स्पर्धेत चार सुवर्ण पदक व एक कास्य पदक पटकाविले आहे.
प्रथमेश जवकार याने यापुर्वी चार आंतरराष्ट्रीय स्पर्धा
खेळल्या आहे. याच वर्षी एशिया कप स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. त्याने
आतापर्यंत राष्ट्रीय स्पर्धेत बारा पदके मिळविली आहेत. खेलो इंडीयाचा तो स्कॉलर
खेळाडू असून, विविध स्पर्धेत उत्तम कामगिरी करत आहे.
मोनाली जाधव व प्रथमेश जवकार हे जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालयाच्या तालुका क्रीडा संकुलात आर्चरी प्रशिक्षण केंद्रात चंद्रकांत इलग
यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय चंद्रकांत
इलग, आई-वडील आणि जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश
जाधव यांना दिले.
या खेळाडूंना जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती, भारतीय धनुर्विद्या
संघटनेचे अध्यक्ष प्रमोद
चांदूरकर, महाराष्ट्र ऑलिंपीक संघटनेचे सचिव प्रशांत देशपांडे, क्रीडा उपसंचालक
विजय संतान, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, जिल्हा आर्चरी असोसिएशन अध्यक्ष ॲड.
राजेश लहाने, सचिव प्रा. डॉ. मनोज व्यवहारे, ॲड. दळवी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
00000
निर्यातक्षम द्राक्ष बागांच्या नोंदणीसाठी ग्रेपनेट
प्रणाली कार्यान्वित
बुलडाणा, दि. 14 : युरोपियन आणि इतर देशांना द्राक्ष निर्यातीकरिता
निर्यातक्षम द्राक्ष बागांची नव्याने नोंदणी करण्यात येत आहे. यातील जुन्या
भागाच्या नोंदणीसाठी ग्रेपनेट ही कार्यप्रणाली दि. 5 ऑक्टोबर 2022 पासून
कार्यान्वित करण्यात आली आहे.
गेल्या
वर्षात सन 2021- 22 मध्ये सर्वाधिक 2 लाख 63 हजार 75 मेट्रिक टन द्राक्षाची
निर्यात झाली. त्यापैकी 1 लाख 5 हजार 827 मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात युरोपियन
देशांत झाली. इतर देशात 1 लाख 57 हजार 248 मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात झाली.
याचे मुल्य दोन हजार 302 कोटी आहे.
युरोपियन
देशांनी किडनाशक नियंत्रणाबाबतचे निकष अत्यंत कडक केले आहे. त्या बाबीची पूर्तता
करण्याकरिता तसेच युरोपियन देशांच्या अटी व शर्ती पूर्ततेची हमी देण्यासाठी सन
2003-04 पासून राज्यात अपेडाच्या मार्गदर्शनाखाली युरोपियन युनियन व इतर देशांना
द्राक्ष निर्यातीकरिता किडनाशक उर्वरित अंश नियंत्रण कार्यप्रणाली तयार करण्यात
आली व त्याची अंमलबजावणी कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.
सदर
कार्यप्रणालीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता ग्रेपनेट ही ऑनलाईन
कार्यप्रणाली अपेडाद्वारे विकसित करून या कार्यप्रणालीमध्ये सर्व भागीदारी
संस्थांना समावेश करून त्याद्वारे निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी ते
फायटोसॅनिटरी प्रमाणीकरणाची ही सर्व कामे ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे.
युरोपियन
युनियन व इतर देशांना कीडनाशक उर्वरित अंश तसेच युरोप कीड व रोग मुक्तची हमी
देण्यासाठी निर्यातक्षम द्राक्ष बागांची ग्रेपनेट अंतर्गत नोंदणी करणे बंधनकारक
करण्यात आले आहे. तसेच नोंदणीकृत द्राक्ष बागेतील द्राक्ष निर्यात करणे
निर्यातदारांना ही बंधनकारक करण्यात आले.
निर्यातक्षम द्राक्ष बागांच्या
नोंदणीची सद्यस्थिती
ग्रेपनेट
अंतर्गत सन 2021 -22 मध्ये मध्ये 44 हजार 180 भागांची नोंदणी करण्यात आली त्यापैकी
महाराष्ट्रात 44 हजार 123 व कर्नाटक मध्ये 57 द्राक्ष बागांची नोंदणी झाली.
महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यात 34 हजार 295, सांगली 4 हजार 862, पुणे 1 हजार
238, सोलापूर 641, अहमदनगर 871, सातारा 432, उस्मानाबाद 550, लातूर 128, बुलडाणा
42, जालना 18 निर्यातक्षम बागांची ग्रेपनेटद्वारे
नोंदणी करण्यात आली आहे.
सन 2022-23
मध्ये अपेडा नवी दिल्ली यांनी ट्रेड नोटिशीनुसार युरोपियन देशांना द्राक्ष
निर्यातीकरिता निर्यातक्षम द्राक्ष बागांचे ग्रेपनेटद्वारे नोंदणी करण्याकरिता दि.
1 ऑक्टोबर 2022 ते 31 डिसेंबर 2022 ग्रेपनेट कार्यप्रणाली करिता सूचना निर्गमित
केल्या आहेत.
ग्रेटनेटद्वारे निर्यातक्षम द्राक्ष
बागांची नोंदणी
निर्यातक्षम
द्राक्ष बागाची नवीन नोंदणी, नूतनीकरण करण्याकरिता दि. 1 ऑक्टोबर 2022 ते 31
डिसेंबर 2022 या कालावधीत ग्रेपनेटद्वारे सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे.
निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी व नूतनीकरण करण्याकरिता प्रपत्र - 2 मध्ये
अर्ज व अर्जासोबत सातबाराची प्रत, तसेच 50 रुपये शुल्क भरून अर्ज संबंधित कृषी
सहाय्यक यांच्याकडे करावे लागणार आहे.
निर्यातक्षम
द्राक्ष बागांची ऑनलाइन नोंदणी करण्याकरिता फार्म रजिस्ट्रेशन मोबाईलॲप
कार्यान्वित करण्यात आले आहे. या ॲपद्वारे द्राक्ष बागायतदारांना ऑनलाइन अर्ज
करण्याच्या सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्याकरिता शेतकऱ्यांनी मोबाईलॲप गुगल
प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करून अर्ज करावा.
निर्यातक्षम
द्राक्ष बागांची नोंदणी करण्याकरिता शेतकऱ्यांनी करावयाच्या अर्जामध्ये
शेतकऱ्यांनी त्यांचे संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर, सातबारा क्रमांक,
द्राक्षाची जात, क्षेत्र छाटणीची तारीख, तसेच काढण्याची तारीख व अंदाजे अपेक्षित
उत्पन्न त्याचबरोबर बागेस ग्लोबल गॅप प्रमाणपत्र असल्यास त्याचा तपशील देणे आवश्यक आहे
ऑनलाइन अर्ज
प्राप्त झाल्यानंतर कृषी विभागामार्फत संबंधित निर्यातक्षम द्राक्ष बागांची
प्रत्यक्ष पाहणी करून प्रपत्र चारमध्ये शिफारस करून निर्यातक्षम द्राक्ष बागांची
द्राक्ष बागास ऑनलाइन नोंदणी प्रमाणपत्र प्रोसेस करून संबंधित द्राक्ष
बागायतदारांना देण्यात येते. निर्यातक्षम द्राक्ष बागांचे नोंदणी केल्यानंतर प्रथम
शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर ऑनलाइनद्वारे बागेचे नोंदणी, नुतनीकरण
केल्याबाबतचा संदेश पाठविला जातो.
निर्यातक्षम
द्राक्ष बागांची नोंदणी झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या कृषी
सहाय्यकाकडे संपर्क साधून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावा लागणार आहे.
नोंदणी केलेल्या द्राक्ष बागायतदारांचा तपशील दररोज अपेडाच्या वेबसाईटवर
एमआयएसमध्ये सर्वांसाठी उपलब्ध आहे. तसेच डिरेक्टरीमध्ये नोंदणी केलेल्या सर्व
शेतकऱ्यांची शेतकरी व गावनिहाय तसेच नोंदणी प्रमाणपत्र क्रमांक व मोबाईल नंबर
इत्यादी तपशील दिला आहे त्यामध्येही संबंधित शेतकऱ्यांची माहिती उपलब्ध आहे.
कीडनाशके उर्वरित अंश नियंत्रणाबाबत
घ्यावयाची दक्षता
राष्ट्रीय
द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी यांनी निर्यातक्षम द्राक्ष बागेवरील कीड रोगाचे
नियंत्रण करण्याकरिता प्रपत्र - 5 मध्ये निर्धारित केलेल्या लेबल क्लेम औषधाची
फवारणी करणे आवश्यक आहे. तसेच त्याचा रेकॉर्ड प्रपत्र - 2 मध्ये ठेवणे आवश्यक आहे.
सन 2021-22
या वर्षाकरिता केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी
समिती फरीदाबाद यांनी द्राक्ष पिकावरील किडी व रोगाचे नियंत्रणाकरिता 68 औषधांची
लेबल क्लेम मंजूर केले आहे. त्याची माहिती राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी पुणे यांनी दि. 8 सप्टेंबर
2021-22 अन्वये प्रपत्र - 5 मध्ये अंतिम केली आहे. त्याची माहिती अपेडाच्या
वेबसाईटवर ग्रेपनेटमध्ये उपलब्ध करून दिली आहे. त्यामध्ये एमआरएलच्या मर्यादा व प्री हार्वेस्ट
इंटर्वल कालावधी दिला आहे.
निर्यातक्षम
द्राक्ष बागेतील कीडनाशके उर्वरित तपासणीकरिता सतरा कीडनाशके उर्वरित अंश तपासणी
प्रयोगशाळेना परवानगी दिली आहे. सदर प्रयोगशाळेच्या प्रतिनिधीद्वारे आपल्या बागेचा
4 बी मध्ये तपासणी केल्यानंतरच द्राक्षाचा नमुना तपासून त्याचा अहवाल ऑनलाइन केला
जातो. त्याची एक प्रत संबंधित शेतकऱ्यांना दिली जाते.
कीडनाशक
तपासणीचा अहवाल संबंधित शेतकऱ्यांना त्वरित उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून
अपेडाच्या साइटवर डाउनलोड अनालिसिस रिपोर्टवर क्लिक करून आपल्या बागेचा नोंदणी
क्रमांक व 4 बी क्रमांक भरल्यानंतर संबंधित द्राक्ष बागायतदारांना आपल्या बागेचा
द्राक्ष तपासणीचा अहवाल डाऊनलोड करुन घेण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आले
आहे.
निर्यातक्षम
द्राक्षाच्या नमुन्याची तपासणी करण्याकरिता 268 औषधांची एमआरएल सहित प्रपत्र- 9
मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. सन 2022 – 23 मध्ये ग्रेपनेट द्वारे ६० हजार निर्यातक्षम द्राक्षबागांची नोंदणी करण्याचा लक्षांक जिल्हानिहाय वितरीत
करण्यात आला आहे. चालू वर्षी द्राक्ष बागायतदारांनी आपल्या बागांची वेळेत नोंदणी
करून लेबल क्लेमप्रमाणे औषधांचा वापर करून निर्याती बरोबरच स्थानिक बाजारपेठेतील
ग्राहकांनाही चांगल्या दर्जाचे व कीडनाशक उर्वरित अंशमुक्त द्राक्ष पुरवठा करून
त्याद्वारे आपल्या मालास अधिक मोबदला मिळण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे.
याबाबत अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व जिल्हा
अधीक्षक कृषी अधिकारी तसेच आयुक्तालय स्तरावर कृषी निर्यात कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात
आले आहे.
00000
No comments:
Post a Comment