Wednesday, 12 October 2022

DIO BULDANA NEWS 12.10.2022

अतिवृष्टीमुळे नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत

पंचनाम्यातून नुकसानग्रस्त शेतकरी सुटू नये याची दक्षता घ्यावी

*पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

बुलडाणा, दि. 12 : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील काही मंडळात अतिवृष्टी झाली आहे. यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत. या पंचनाम्यातून एकही नुकसानग्रस्त शेतकरी सुटू नये, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

जिल्ह्यात दि. 10 ऑक्टोबर 2022 रोजी सर्वदूर पाऊस झाला. मेहकर तालुक्यातील मेहकर मंडळात 107 मिमी आणि नायगांव मंडळात 107 मिमी, तर लोणार तालुक्यातील सुलतानपूर मंडळात 105 मिमी पाऊसाची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीमुळे दोन तालुक्यातील सुमारे 19 हजार 65 हेक्टर आर शेतीपिकाचे नुकसान झाले आहे. याबाबतची माहिती मिळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. या तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहे. या पंचनाम्यातून नुकसानग्रस्त एकही शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले. यावेळी आमदार संजय रायमुलकर उपस्थित होते.

सद्यस्थितीत मेहकर आणि लोणार तालुक्यातील शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आले आहे. येत्या दहा ते बारा दिवसात पंचनामे पूर्ण करण्यात येऊन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनास अंतिम अहवाल सादर करण्यात येणार आहे.

000000

 जिल्हा रुग्णालयात मानसिक आरोग्य सप्ताहास सुरूवात

बुलडाणा, दि. 12 : जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयात सप्ताहाची सुरूवात करण्यात आली. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांनी सप्ताहाचे उद्घाटन केले. दि. 17 ऑक्टोबर 2022 पर्यंत जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या मानसिक आरोग्य कार्यक्रम पथकातर्फे मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. यात प्रमिली दिदी यांनी मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. भुसारी यांनी मानसिक आरोग्याबाबत माहिती दिली. मानसोपचार तज्‍ज्ञ डॉ. कुणाल शेवाळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. विश्वास खर्चे यांनी कार्यक्रमाची रुपरेषा, ब्रीदवाक्य याबाबत माहिती दिली. मानसोपचार तज्‍ज्ञ डॉ. महेश बाहेकर यांनी मानसिक आजाराचे प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत उपचार पद्धती पोहचण्याबाबत माहिती दिली. जिल्हा सल्लागार डॉ. लता भोसले यांनी असंसर्गजन्यरोग नियंत्रणात जनजागृतीची माहिती दिली. जिल्हा रुग्णालाय नर्सिंग स्कुलच्या विद्यार्थ्यांनी ‘मी पागल नाही, आजारी आहे’ यावर पथनाट्य सादर केले. व्हीजन नर्सिंग  विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले.

 पुनम क्षीरसागर सूत्रसंचालन केले. सिद्धार्थ जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी डॉ. जुनेद मिर्झा, ज्ञानेश्वर मुळे, हरिदास अंभोरे, लक्ष्मण सरकटे, अर्चना आराख, चंद्रकांत जमधडे, भालचंद्र राऊत यांनी पुढाकार घेतला. यावेळी जिल्हा रुग्णालय येथील नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य श्रीमती खेडेकर, श्रीमती उईके उपस्थित होते. मानसिक आजाराबाबत कोणतेही लक्षणे आढळल्यास लपवू नका, घाबरु नका, तात्काळ जिल्हा रुग्णालयातील मनासोपचार विभाग येथे भेट देऊन तज्‍ज्ञांकडून योग्य समुदपेदशन आणि औषधपचार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000




शुक्रवारी महाराष्ट्र स्टार्टअप स्टार्टअप बुट कँपचे आयोजन

बुलडाणा, दि. 12 : नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात आले. यातील नवउद्योजकांच्या संकल्पनांचे सादरीकरण स्पर्धा शुक्रवारी, दि. 14 ऑक्टोबर 2022 रोजी पंकज लद्धड इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी येथे आयोजित केली आहे.

सदर यात्रेत नवउद्योजक आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेऊन त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नवसंकल्पनांना तसेच सुरुवातीच्या टप्प्यातील नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्‍ज्ञ मार्गदर्शन, निधी व आवश्यक पाठबळ पुरविणे, तसेच उद्योजकता व नावीन्यपूर्ण परिसंस्थांना बळकट करण्यात येणार आहे. नागरिकांच्या नवसंकल्पनांसाठी तालुकास्तरीय प्रचारप्रसिद्धी आणि जनजागृती अभियानांतर्गत प्रत्येक तालुक्यामध्ये लोकसमूह एकत्रित होण्याच्या जागेवर स्टार्टअप यात्रेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी वाहनाच्या माध्यमातून यात्रेबाबतची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

यात्रेतील पुढील टप्प्यातील प्रशिक्षण शिबिरामध्ये नवउद्योजकता बाबतची माहिती सत्र, स्थानिक उद्योजक आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांची व्याख्याने होणार आहेत. तसेच नोंदणी केलेल्या नवउद्योजकांच्या संकल्पनांची सादरीकरण स्पर्धा दि. 14 ऑक्टोबर 2022 रोजी पंकज लद्धड इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलाजी येथे होणार आहे. नोंदणी केलेल्या उमेदवारांनी सकाळी 9.30 वाजता सादरीकरणासाठी उपस्थित राहावे लागणार आहे.  सदर स्पर्धेकरीता नोंदणीची प्रक्रिया दि. 14 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

याबाबत अधिक माहिती आणि सहभागासाठी www.msins.in किंवा www.mahastartupyatra.in या लिंकवर नोंदणी करावी लागणार आहे. जिल्हास्तरावर सर्वोत्तम कल्पना सादर करणाऱ्यांना २५ हजार रुपयांपर्यंतचे पारितोषिक मिळणार आहे. प्रत्येक सादरीकरण सत्रातील उत्तम १० कल्पना राज्यस्तरीय तज्ज्ञ समितीसमोर सादरीकरण करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय विजेत्यांना १ लाख रुपयांपर्यंतचे रोख अनुदान, तसेच आवश्यक पाठबळही पुरविण्यात येतील.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुक नवउद्योजकांनी महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे. 

याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा या कार्यालयाचे नंदू मेहत्रे मो. क्र. 9975704117, शफीउल्ला सय्यद मो. क्र. 7620378924 आणि गोपाल चव्हाण मो. क्र. 8108868403 यांच्याशी तसेच कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक  07262-242342 / 299342 संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

एकविध खेळ संघटनांनी संलग्नता प्रमाणपत्र सादर करावेत

*क्रीडा विभागाचे आवाहन

बुलडाणा, दि. 12 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या यावर्षीच्या एकूण 93 खेळांच्या शालेय क्रीडा घेण्यात येणार आहे. विविध वयोगटातील तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजनास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्यासाठी अधिकृत राज्यस्तर एकविध खेळ संघटनेचे प्रमाणपत्र तथा धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी असलेले प्रमाणपत्र दि. 15 ऑक्टोबर 2022 रोजीपर्यंत सादर करावे, असे आवाहन क्रीडा विभागातर्फे करण्यात आले आहे.

एकविध खेळ संघटनांच्या तांत्रिक सहकार्याने 49 खेळ प्रकारांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. उर्वरित 42 खेळ प्रकारचे आयोजन हे एकविध खेळ संघटनांच्या तांत्रीक व आर्थिक सहकार्याने करण्यात येणार आहे. क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एकविध खेळ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची सभा पार पडली. 

यात फिल्ड आर्चरी, बिच व्हॉलीबॉल, टार्गेट बॉल, फुटबॉल, कर्फबॉल, टेबल सॉकर, हुप कॉन दो, युग मुंदो, ओवीना, ड्रॉप रो बॉल, जित कुने दो, फुटबॉल टेनिस, चॉयक्वांदो, पेट्यांक्यु, कुडो मार्शल आर्ट, हापकिडो बॉक्सींग, कुराश आदी खेळ संघटनांचे पदाधिकारी बैठकीस उपस्थित नव्हते. त्यामुळे या एकविध खेळ संघटना जिल्ह्यात कार्यरत असल्याबाबत बोध झाला नाही.

या संघटना जिल्ह्यात कार्यरत असल्यास त्यांनी महाराष्ट्र ऑलिंम्पिक संघटनेला संलग्नित असलेल्या अधिकृत राज्यस्तर एकविध खेळ संघटनेचे प्रमाणपत्र  आणि धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेले प्रमाणपत्र या कार्यालयास सादर करावे. प्रमाणपत्र सादर केले नसल्यास उपरोक्त एकविध खेळ संघटना जिल्ह्यात कार्यरत नाही, असे मानून खेळांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन केल्या जाणार नाही, असे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी कळविले आहे.

00000

12 ग्रामपंचायतींच्या मतदार याद्यांच्या

प्रभागनिहाय विभाजनाचा कार्यक्रम जाहीर

 बुलडाणा , दि. 12 : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ऑक्टोबर ते  डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे 7 हजार 649 ग्रामपंचायती, तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राबविण्यात येणारा मतदार याद्यांचा प्रभागनिहाय विभाजन करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

निवडणूका असलेल्या ग्रामपंचायती सावळा, सुंदरखेड, सव, येळगाव, गिरडा, इरला, मौढाळा, चिखला, उमाळा, रुईखेड मायंबा, हतेडी खुर्द, दत्तपूर, ढालसावंगी या आहेत. मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दि. 31 मे 2022 राहणार आहे. प्रभाग निहाय प्रारूप मतदारयादी गुरुवार, दि. 13 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यावर गुरुवार, दि. 13 ऑक्टोबर 2022 ते मंगळवार, दि. 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहे. यात शनिवार, दि. 15 ऑक्टोबर 2022 रोजी हरकती स्वीकारण्यात येतील, प्रभागनिहाय अंतिम मतदारयादी शुक्रवार, दि. 21 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. याबाबत तालुक्यातील नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन बुलडाणा तहसिलदार रुपेश खंडारे यांनी केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment