Friday, 5 March 2021

DIO BULDANA NEWS 5.3.2021

 कोरोना अलर्ट : प्राप्त 822 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 108 पॉझिटिव्ह

  • 356 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.5: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 930 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 822 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 108 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 37 व रॅपीड टेस्टमधील 71 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 38 तर रॅपिड टेस्टमधील 784 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 822 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव शहर : 31, खामगांव तालुका : शिर्ला नेमाने 1, सुटाळा बु 1, घाटपुरी 1, अंत्रज 1, चिखली शहर : 17, चिखली तालुका : मेरा बु 1, पेठ 1,खैरव 1, कोलारा 1, उंद्री 1, लोणार शहर : 5, लोणार तालुका : पांगरा दराडे 2, जळगांव जामोद शहर : 4, जळगांव जामोद तालुका : आसलगांव 1, खेर्डा 1, वडशिंगी 1, सिं. राजा शहर : 5, सिं. राजा तालुका : दुसरबीड 1, रताळी 1, शेंदुर्जन 1, साखरखेर्डा 2, बुलडाणा शहर : 7, बुलडाणा तालुका : साखळी 1, करडी 5,  मोताळा तालुका : शेलापूर 1, नांदुरा तालुका : निमगांव 1,धानोरा 1, दे. राजा तालुका : जांभोरा 1, सिनगांव जहागीर 3, दे. मही 2,  दे. राजा शहर : 2, मूळ पत्ता औरंगाबाद 1, खासगांव जि. जालना 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.  अशाप्रकारे जिल्ह्यात 108 रूग्ण आढळले आहे.

      तसेच आज 356 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  चिखली : 65, खामगांव : 34, बुलडाणा : सिद्धीविनायक हॉस्पीटल 2, अपंग विद्यालय 77, मुलींचे वसतीगृह 4, सहयोग हॉस्पीटल 1,  दे. राजा : 37, मेहकर : 1, लोणार : 3, जळगांव जामोद : 43, सिं. राजा : 12, नांदुरा : 3, मलकापूर : 33, शेगांव : 20, मोताळा : 10, संग्रामपूर : 10,

   तसेच आजपर्यंत 145068 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 17649 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 17649 आहे. 

  आज रोजी 9030 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 145068 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 20088 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 17649 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 2244 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 195 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

*****  

          शासकीय हरभरा खरेदी सुरू; 5100 प्रति क्विंटल हमी भाव

  • जिल्ह्यात 10 खरेदी केंद्रांना मान्यता  

बुलडाणा,(जिमाका) दि. 5 : जिल्ह्यात चालू हंगाम 2020-21 मध्ये केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने हरभरा खरेदी हमीदर 5100 रुपये प्रती क्विंटल प्रमाणे खरेदी करणे सुरू झाले आहे. हरभरा खरेदीसाठी जिल्ह्यात 10 खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातंर्गत बुलडाणा तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादीत, देऊळगांवराजा तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादीत, लोणार तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादीत, मेहकर तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादीत, शेगांव तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादीत, संग्रामपुर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादीत, संत गजानन कृषी विकास शेतकी उत्पादन कंपनी मोताळा, सोनपाऊल ॲग्रो प्रोडयुसर कंपनी सुलतानपुर केंद्र साखरखेर्डा ता. सिं.राजा, मॉ जिजाऊ फार्मर प्रोडयुसर कंपनी सिंदखेडराजा, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था चिखली केंद्र उंद्री ता. चिखली, अशी 10 खरेदी केंद्रांना हरभरा खरेदी करीता मान्यता देण्यात आली आहे.

जिल्ह्यात हरभरा खरेदी करण्याकरीता हेक्टरी उत्पादकता 15.82 क्विटल देण्यात आली आहे.  तरी शेतकऱ्यांनी हमीभावाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा यासाठी उपरोक्त संस्थांकडे नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

******

कोविड नियंत्रणासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवून चाचण्यांचे प्रमाण वाढवा

-         विभागीय आयुक्त पियुष सिंग

बुलडाणा,(जिमाका) दि. 5 : कोविड या साथरोगाने पुन्हा उचल खाल्ली आहे. विभागातील जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांमध्ये कोविड रूग्णसंख्या वाढली आहे. तरी यंत्रणेने बाधीत रूग्णाच्या निकट व बाह्य संपर्कातील व्यक्ती ट्रेस करून कोरोना चाचणी करावी. कोविड नियंत्रणासाठी कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग वाढवून कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, अशा सूचना विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी आज दिल्या.  जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कोविड संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी आढावा घेताना विभागीय आयुक्त बोलत होते.  याप्रसंगी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे, अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते आदी उपस्थित होते.            

     स्वॅब घेण्याचे प्रमाण जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये वाढविण्याचे आदेशीत करीत विभागीय आयुक्त म्हणाले, ग्रामीण भागातही स्वॅब घेण्याचे प्रमाण वाढवावे. बाधीत व्यक्तीच्या संपर्कातील कुणीही सुटता कामा नये. बाधीत रूग्णांना कोविड केअर सेंटरलाच भरती करून घ्यावी.  होम आयसोलेशनची सुविधा बंदच ठेवावी.  होम क्वारंटाईन असलेल्या रूग्णांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारावा. जेणकरून सदर बाधीत रूग्ण बाहेर फिरत असल्यास दिसून येईल. ज्या रूग्णांकडे विलगीकरणाची स्वतंत्र व्यवस्था आहे, अशा रूग्णांना होम आयसोलेशन दिले असल्यास त्यांच्या घरावर विलगीकरण केल्याच्या तारखेसह स्टीकर चिकटवावे. आरोग्य यंत्रणेतील सर्व कर्मचाऱ्यांचे टेस्टींग करून घ्यावे. कोविड केअर सेंटरमध्ये सर्व सुविधा असाव्यात. जेवणाचा दर्जा चांगला ठेवावा. स्वच्छतेच्या बाबत कुठलीही तडजोड नसावी. दुर्धर आजाराने ग्रस्त रूग्णांचे आठवड्याला तपासणी करून घ्यावी.

   लसीकरणाबाबत आढावा घेताना विभागीय आयुक्त म्हणाले, आरोग्य यंत्रणेतील सर्वांचे लसीकरण करून घ्यावे. सुपर स्प्रेडरच्या कोविड चाचण्या बंधनकारक कराव्यात. शासकीय कार्यालयामधील अधिकारी व कर्मचारी यांच्या नियमित कोरोना चाचण्या कराव्यात. सार्वजनिक ठिकाणी प्रत्येकाने मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टसिंगचा नियम पाळावा व हात वारंवार धुवावे या त्रि सुत्रींचा कटाक्षाने पालन झाले पाहिजे. मास्कचा वापर न करणाऱ्यांवर दंडनीय कारवाई करण्यात यावी. बैठकीला संबंधीत विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी  पॉझीटीव्ही रेट, मृत्यू दर, ऑक्सीजन बेड, आयसीयु बेड आदींचाही आढावा विभागीय आयुक्त यांनी घेतला.

                                                                                              **********

‘त्या’ उमेदवारांच्या जात वैधता प्रमाणपत्रांची फेर तपासणी होणार

  • सन 2011-12 मधील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीतील उमेदवार
  • जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात यादी प्रसिद्ध
  • यादीत नाव असणाऱ्या उमेदवारांनी कागदपत्रे सादर करावी

बुलडाणा,(जिमाका) दि. 5 : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सन 2011-12 या कालावधीतील निर्गमीत केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या जात वैधता प्रमाणपत्रांची फेर तपासणी करण्यात येणार आहे. त्यानुसार जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाने संबंधीत उमेदवाराना वारंवार पत्र पाठवुनसुद्धा संबंधीत उमेदवारांनी फेरतपासणीला कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही.  अशा उमेदवारांची यादी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, बुलडाणा येथे नोटीस बोर्डवर लावण्यात आलेली आहे. तरी ज्या उमेदवारांचे नाव नोटीस बोर्डमधील यादीत आहे, अशा उमेदवाराने त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र, जातीचा दाखला व जातीविषयक सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रतींसह 8 दिवसाचे आत सदर कार्यालयात सादर करावेत.

     या उमेदवारांनी 8 दिवसाचे आत कागदपत्रे सादर न केल्यास त्यांची गुणवत्ता खुली ठेवून प्रकरण नस्तीबद्ध करण्यात येईल.  तसेच सन 2011-2012 मधील त्यांचेकडे उपलब्ध असलेले जात वैधता प्रमाणपत्र भविष्यात वापरता येणार नाही. याची संपूर्ण दक्षता संबंधीत उमेदवाराने घ्यावी. तसे आढळून आल्यास संबंधीत व्यक्ती महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग अधिनियम 2000 व नियम 2012 मधील कलम 11 नुसार प्रशासकीय व फौजदारी कार्यवाहीस पात्र राहणार आहे, असे  संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा जात प्रमाणपत्र पडतळणी समिती मनोज मेरत यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

**

जिल्ह्यात रविवारला संचारबंदी

बुलडाणा,(जिमाका) दि.5: जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता यापूर्वीच नगर परिषदांचे क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे. तसेच प्रतिबंधीत क्षेत्र वगळून सर्व प्रकारचे बाजार, बाजारपेठ क्षेत्रातील दुकाने ही सोमवार ते शनिवार नियमितपणे सकाळी 9 ते सायं 5 वाजेपर्यंत सुरू आहेत. मात्र रविवारला होणारी गर्दी लक्षात घेता जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी संचारबंदीचे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे.

  त्यानुसार जिल्ह्यात दुध विक्रेते, दुध वितरण केंद्र सकाळी 6 ते दुपारी 3 व सायं 6 ते रात्री 9 वाजे पर्यंत नियमितपणे सुरू असतील.  या औषधी सेवा, दवाखाने, रूग्णवाहिका सेवा, एस टी वाहतूक 50 टक्के प्रवासी क्षमतेसह, माल वाहतूक, पेट्रोल पंप 24 तास सुरू असतील. टायर पंक्चरची दुकाने नियमित सुरू असतील. पुर्वनियोजीत परीक्षा वेळापत्रकानुसार होतील. बँकाचे कामकाज त्यांचे नियमित वेळेनुसार सुरू राहील. या व्यतिरिक्त अन्य सर्व दुकाने, आस्थापना, प्रतिष्ठाने बंद राहतील. जिल्ह्यात सदर आदेश शनिवार 6 मार्च रेाजी  सायं 6 पासून ते सोमवार 8 मार्च 2021 चे सकाळी 8 वाजेपर्यंत लागू राहील. या कालावधीत संचारबंदी लागू असल्याने नागरिकांना विनाकारण बाहेर फिरण्यास मनाई राहील. आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याअन्वये कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नागरीकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. कोरोना संसर्ग नियमांचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.

*******

No comments:

Post a Comment