Monday, 9 March 2020

dio news buldana 9.3.2020



हातगाड्यांवरील अन्न पदार्थ विक्रेत्यांना आता ‘ड्रेसकोड’
·         अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते ड्रेसकोड वाटपाचा शुभारंभ
·         ॲप्रॉन, हॅन्डग्लोज व कॅपचे वाटप,  
बुलडाणा, दि. 9 : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या पुढाकारातून व संकल्पनेतून राज्यातील सर्व हातगाड्यांवरील अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना ड्रेस कोड लागू करण्यात येत आहे. . त्यानुसार सदर मोहिमेची सुरूवात आजपासून बुलडाणा शहरातून करण्यात आली. अन्न्‍ व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज चिंचोले चौक, चौपाटी येथे हातगाडीवर पाणीपुरी, पावभाजी, भेळ, चायनीज, आईसस्क्रीम आदी अन्न्‍ पदार्थ व्रिकेत्यांना ॲप्रॉन, हॅन्डग्लोज व कॅपचे या ड्रेसकोडचे वाटप केले. तसेच विक्रेत्यांच्या हातांची, नखांची स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून तपासणी करीत त्यांचे परवानेही तपासले.
    यावेळी  पालकमंत्री म्हणाले, सर्व हातगाडीवरील अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी चांगल्या व स्वच्छ वातावरणात विक्री करावी. त्यासाठी सर्वांनी स्वच्छता पाळावी. यापुढे अन्न्‍ व औषध प्रशासन विभाग राज्यात हातगाड्या तपासण्याची मोहिम राबविणार आहे. यामध्ये हातगाडीवरील विक्रेत्यांना ॲप्रॉन, हॅन्डग्लोज व कॅप घालणे विक्री करतेवेळी बंधनकारक करणार आहे. तरी सर्व विक्रेत्यांनी हातगाडीजवळ स्वच्छता ठेवावी  व अन्न पदार्थ उघड्यावर ठेवू नये. अधिकाऱ्यांनी हातगाडीवरील विक्रेत्यांची  तपासणी करून काही त्वचारोग तर नाही, ना याची खात्री करून घ्यावी, असे निर्देशही मंत्रीमहोदयांनी यावेळी केले. विक्रेत्यांन यापुढे अन्न पदार्थांची विक्री करताना हॅन्डग्लोजचा वापर कटाक्षने करावा. याचा वापर न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. याप्रसंगी सहाय्यक आयुक्त सचिन केदारे, गजानन घिरके, जनसंपर्क अधिकारी संतोष लोखंडे व विक्रेते उपस्थित होते.
                        
                                                                        ********************

कोरोना विषाणू प्रसाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात गर्दी होणारे कार्यक्रम आयोजीत करू नये
·        21 फेब्रुवारीनंतर परदेशातून आलेल्या व्यक्तींनी जिल्हा शल्य चिकित्सक, स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती द्यावी
·        जिल्हा प्रशासनाचे  आवाहन
बुलडाणा, दि. 9 : जगभरात गंभीर संकट घेवून आलेल्या कोरोना विषाणूचा प्रसार भारतातही झाला आहे. सदर विषाणू अत्यंत वेगाने फोफावणारा आहे. कोरोना विषाणूचा प्रसार वेळीच नियंत्रणात आणणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर व्यापक उपाययोजना करण्यात येत आहे. परदेशातून 21 फेब्रुवारीनंतर जिल्ह्यात वास्तवाव्यास असलेल्या व्यक्तींनी स्वत:हून तशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक अथवा स्थानिक आरोग्य अधिकारी यांना द्यावी. भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या सुचनांनुसार कोरोना विषाणू हा संसगर्जन्य असल्याने संबंधित आयोजकांनी जिल्ह्यात गर्दीच्या व सार्वजनिक ठिकाणी यात्रा, जत्रा, मेळावे, महाविद्यालयीन स्नेह संमेलने, प्रदर्शने, होळी सारखे सण, धार्मिक कार्यक्रम, पर्यटनस्थळांवरील कार्यक्रम आयोजित करू नये.
  अशा कार्यक्रमांचे आयोजन केल्यास कोरोना विषाणूचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरिता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कुण्याही आयोजकानी गर्दीच्या ठिकाणी असणारे कार्यक्रम आयोजीत करू नये, असे आवाहन  जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी परिपत्रकान्वये केले आहे. कोरोना विषाणूची लक्षणे ही मुख्यत्वे श्वसन व्यवस्थेशी निगडीत असून साधारणपणे खोकला, सर्दी, श्वास घ्यायला त्रास होणे आदी असतात. कोनोरा विषाणूमुळे होणारा आजार हा सर्वसाधारपणे हवेद्वारे शिंकणे, खोकल्यापासून पसरतो.
अफवांवर विश्वास ठेवू नये
जिल्ह्यात कोरोना विषाणू संदर्भात अर्धवट माहिती असलेले, चुकीचे, भिती उत्पन्न करणारे संदेश सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे. असे कोणतेही संदेश कुणीही अधिकृत स्त्रोतांकडून खात्री केल्याशिवाय पुढे पाठवू नका. तसेच आवश्यक असल्यास नागरिकांनी हेल्पलाईनला फोन करून शंका निरसन करावे. चुकीचे मेसेज पाठवू नये. अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाईचे निर्देश प्राप्त झालेले आहे. तरी कुणीही कोरोना विषाणू संदर्भातील अफवांवर विश्वास ठेवू नये. हेल्पलाईन क्रमांक : राष्ट्रीय कॉल सेंटर 911123978046, राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष 020 26127374 व टोल फ्री क्रमांक 104 वर संपर्क साधावा.  
                                                                                    *******
प्रत्यक्ष कर्ज व कर्जमाफीच्या तफावतीची रक्कम बँका कर्ज खात्यात जमा करतील
·        शेतकऱ्यांनी काळजी करू नये, जिल्हा उपनिबंधक यांचे आवाहन
·        कमी रक्कम दिसत असली तरीही शेतकऱ्यांनी रक्कम स्वीकृत करावी
बुलडाणा, दि. 9 : शासनाने राज्यातील शेतकऱ्यांच्या काही निकषांच्या आधारे 2 लाखापर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय घेऊन महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी सरु केलेली आहे. त्याअनुषंगाने योजनेच्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांची माहिती संबंधीत बँकामार्फत शासनाकडे प्राप्त झालेली असुन योजना अंमलबजावणीमध्ये संगणकीय पोर्टल प्रणालीव्दारे माहितीचे संस्करण करण्यात येऊन शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत.
   सदर योजनेचा लाभ प्राप्त करुन घेण्याकरीता शेतकऱ्यांना आपले सरकार सेवा केंद्र/बँक शाखा यांचेकडे जावून त्यांचा विशिष्ट क्रमांक/आधार क्रमांक नोंदवन त्यांच्या कर्जखात्याचे विवरणाची शहानिशा करुन आधार प्रमाणीकरण करावयाचे आहे. तथापि ज्या शेतकऱ्यांचे खाते थकीत (N.P.A.) आहेत अशा शेतकऱ्यांना महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ पोर्टलवर दिसणारी रक्कम व प्रत्यक्ष थकीत कर्जाची रक्कम यामध्ये फरक असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी रक्कम अमान्य केल्याचे दिसून येत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे अनुत्पादक कर्जावर विशिष्ट प्रमाणात कपात ( haircut) लागु केल्याचे दिसुन येते.
      ही कपात करुन कर्जखाते दि.30 सप्टेंबर 2019 ला N.P.A. असल्यास 85 टक्के, दि. 31 मार्च 2018 ला N.P.A. असल्यास 70 टक्के व दि. 31 मार्च 2017  ला N.P.A. असल्यास ५५ टक्के याप्रकारे वरील सुत्राच्या आधारे करुन (haircut) रक्कम वगळता वरीलप्रमाणे रक्कम संबंधीत कर्जदाराचे कर्जखात्यात जमा होत आहे. खात्यात जमा झालेल्या रकमे व्यतिरीक्त जी रक्कम उर्वरित आहे ती रक्कम बँक स्वत: भरणे अपेक्षित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात त्यांना अपेक्षित असलेल्या रकमेपेक्षा कमी रक्कम दिसत असली तरी ती त्यांनी स्विकृत करुन आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे. उर्वरीत रकमेचा भरणा बँक करणार असल्याने त्यांचे खाती निरंक/बेबांक होईल व त्यांना येणाऱ्या हंगामामध्ये नविन कर्ज मिळण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तरी सर्व खातेधारकांनी कोणतीही शंका किंवा संभ्रम बाळग नये, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक श्री. चव्हाण यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment