कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर
आरटीओ शिबिर कार्यालयातील अनुज्ञप्तीविषयक कामकाज 31 मार्चपर्यंत बंद
बुलडाणा, दि. 18 : कोरोना विषाणूचा होत असलेल्या प्रसारास आळा घालण्यासाठी परिवहन आयुक्त यांच्या निर्देशानुसार 31 मार्च 2020 पर्यंत सर्व शिबिर कार्यालयातील अनुज्ञप्तीविषयक कामकाज बंद करण्यात येत आहे. ज्या अर्जदाराची शिकावू अनुज्ञप्तीची मुदत 31 मार्च 2020 पूर्वी संपणार आहे, त्या अर्जदारांचे पक्क्या अनुज्ञप्तीची चाचणी घेण्यात येईल. एका वेळेस एकच शिकावू अनुज्ञप्तीचे मौखिक चाचणी घेण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात 31 मार्च 2020 पर्यंत केवळ अनुज्ञप्तीचे नुतनीकरण, वाहनाची पुर्ननोंदणी, योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण, परवाना संबंधित कामकाज कार्यालयीन वेळेत करण्यात येणार आहे. बीएस- फोर संबंधी वाहनांच्या नोंदणीसंबंधी कामकाज सुरू राहील. सर्व वाहन वितरक, मोटार ड्रायव्हींग स्कूल संचालक यांनी उपरोक्त बाबींचे काटेकोरपणे पालन करून कार्यालयास नागरिकांनी सहकार्य करावे. परिवहन कार्यालयाचे काम हे जीवनावश्यक बाब नसल्याने परिस्थिती पूर्व पदावर आल्याचे प्रशासनाने जाहीर केल्यानंतरच नागरिकांनी कामकाजाकरीता कार्यालयात यावे. अनावश्यक गर्दी करू नये, कोरेाना विषाणू प्रादुर्भावपासून राबविण्यात येणाऱ्या मोहिमेस शासनास मदत करावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
कोरोना अलर्ट :
जिल्ह्यात विदेशातून आलेले 33 नागरिक ‘होम क्वारंटाईन’
बुलडाणा, दि. 18 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन उपाययोजना करीत आहे. तसेच प्रशासन विषाणूचा प्रसार रोखण्यास सज्ज आहे. जिल्ह्यात विदेशातून आलेल्या नागरिकांचे विलीगीकरण करण्यात येत आहे. त्यानुसार 33 विदेशातून आलेल्या भारतीय नागरिकांना त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आले आहे. यामध्ये चिखली तालुक्यात 11, दे.राजामध्ये 5, खामगांवमध्ये 4, मलकापूरमध्ये 2, जळगांव जामोद 4, लोणार 2, मेहकर 1 आणि सिंदखेड राजा तालुक्यातील 4 नागरिकांचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे दुबई येथून आलेले मलकापूर येथील रहीवासी वय 40 वर्ष यांना बुलडाणा जिल्हा सामान्य रूग्णालयात आयसोलेशन कक्षात संशयीत म्हणून दाखल करण्यात आले आहे. त्यांचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. खामगांव येथील आयसोलेशन कक्षात दाखल तीन नागरिकांना कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्यामुळे घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी दिली आहे.
पुलवामा हल्ल्यातील शहीद सैनिकांच्या अवलंबितांकडे मदतीचे धनादेश सुपूर्द
बुलडाणा, दि. 18 : जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी आतंकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात जिल्ह्याती मलकापूर येथील संजय भिकमसिंह राजपूत व चोरपांग्रा ता. लोणार येथील नितीन शिवाजी राठोड शहीद झाले होते. शहीद संजय राजपूत यांच्या अवलंबित वीरपत्नी श्रीमती सुषमाबाई संजय राजपूत, वीरमाता श्रीमती जिजाबाई भिकमसिंह राजपूत, तर शहीद नितीन राठोड यांच्या अवलंबित वीरपत्नी श्रीमती वंदना नितीन राठोड, वीरपिता शिवलाल रामु राठोड व वीरमाता सौ. सावित्रीबाई शिवलाल राठोड यांना शासनाने घोषीत केल्याप्रमाणे मुख्यमंत्री यांचे निधीमधून वाढीव आर्थिक मदतीचे एकूण 20 लक्ष रूपयांचे धनादेश जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांचेहस्ते आज 18 मार्च रोजी सुपूर्द करण्यात आले.
अशाप्रकरणांमध्ये जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाद्वारे संकलित करण्यात येत असलेल्या सशस्त्र सेना ध्वजदिन निधीमधूनदेखील आर्थिक मदत शहीद सैनिकांच्या अवलंबितांना प्रदान करण्यात येते. धनादेश प्रदान करतेवेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर.जी पुरी, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कर्मचारी पंजाबराव निकाडे, सुर्यकांत सोनटक्के उपस्थित होते. तरी सशस्त्र सेना ध्वजदिन निधीला कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी सढळ हातांनी मदत करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्रीमती सय्यदा फिरासत यांनी केले आहे.
पोषण पंधरवडामधील कार्यक्रम स्थगित
बुलडाणा, दि. 18 : पोषण अभियान अंतर्गत 8 मार्च ते 22 मार्च 2020 या कालावधीमध्ये पोषण पंधरवडा कार्यक्रम राबविणेबाबत निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार राज्यात निर्धारीत वेळापत्रकाप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. तथापि कोरोना विषाणू प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पोषण पंधरवडा अंतर्गत राबविण्यात येणारे सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात येत आहेत, असे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद, बुलडाणा यांनी कळविले आहे.
वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या आरोपीस 2 हजार दंडाची शिक्षा
बुलडाणा, दि. 18 : वनविभागाच्या हनवतखेड ता. बुलडाणा येथील राखीव जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या दोन आरोपीस कोर्ट उठेपर्यंत सजा व प्रत्येकी दोघांना 2 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंड न भरल्यास प्रत्येकी एक महिन्याची साधी कैदेची शिक्षा होणार आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, 2 जुलै 2019 रोजी श्रीमती शिला एस. खरात वनरक्षक रा. चेतना नगर, बुलडाणा यांनी शहर पोलीस स्टेशनला आरोपी रंगनाथ उत्तम वाघ रा. भिमनगर व शे. रफीक शे. करीम रा. इकबाल नगर, बुलडाणा यांच्याविरूद्ध वन विभागाच्या जमिनीचे रक्षण वनरक्षक करीत असतांना शासकीय कामात अडथळा आणला व त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद दिली. या फिर्यादीवरून बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला. सदर प्रकरणामध्ये तपास अधिकारी गजानन तायडे यांनी प्रकरणाचा तपास योग्यरितीने पूर्ण करून आरोपीविरूद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
न्यालयात प्रकरण सुरू झाल्याने सरकार पक्षाने आरोपीवर दोषारोप ठेवून प्रकरण पुराव्यासाठी ठेवण्यात आले. त्यामुळे सरकार पक्षाने प्रकरणात चार साक्षीदार तपासले. त्यामध्ये फिर्यादी सौ. शिला खरात व कमलाकर चव्हाण, वनमजूर यांची साक्षपुरावा महत्वाचा ठरला. तसेच सुनील ठाकूर व तपास अधिकारी गजानन तायडे यांनीसुद्धा त्यांचे पुराव्यामध्ये फिर्यादीचे रिपोर्टचे पृष्ठ्यर्थ योग्य तो पुरावा दिला. त्यानंतर वि. जिल्हा न्यायाधीश न्यायालय क्रमांक 2 ए.ए ढुमणे यांनी दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यांनतर आरोपीस कलम 353, 34 भादंविनुसार कोर्ट उठेपर्यंत सजा दिली व प्रत्येकी दोन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. सदर प्रकरणामध्ये सहा. सरकारी वकील एस.पी हिवाळे, यांनी प्रभावीपणे युक्तीवाद करून शासनाचेवतीने बाजू मांडली. तसेच पैरवी अधिकारी किशोर कांबळे, तपास अधिकारी गजानन तायडे यांनी वेळोवेळी पुरावेदारांना तारखेवर हजर होण्यास सहकार्य केले, असे सहाय्यक सरकारी वकील श्री. हिवाळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
No comments:
Post a Comment