Thursday, 12 March 2020

DIO NEWS BULDANA 12.3.2020

मारहाण करून जखमी करणाऱ्यास आरोपीस तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा
बुलडाणा, दि. 12 : मारहाण करून जखमी करणाऱ्यास  आरोपीस बुलडाणा न्यायालयाने तीन महिने सक्त मजुरी व 100 रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. प्रकाश रोहीदस गुळवे व रमेश रोहीदास गुळवे रा. येळगांव ता. बुलडाणा असे आरोपीचे नाव आहे.  
   याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी उषा दिलीप झिने येळगांव येथील रहिवाशी असून 16 डिसेंबर 2019 रोजी सोमवारला शेळ्या चारण्यासाठी त्यांनी सकाळी 11 वाजता शेतात नेल्या व सायं 6 वाजेला शेळ्या परत घेवून आल्या. या शेळीतील एक शेळी रमेश रोहीदास गुळवे याचे दारात गेली असता त्याने फिर्यादी उषा दिलीप झिने हीस शिवीगाळ केली व शेळीला काठी मारली. फिर्यादीने रमेश यास शिवीगाळ करून शेळीला काठी का मारली विचारले असता आरोपी प्रकाश रोहीदास गुळवे याने फिर्यादी उषा दिलीप झीने यांच्या डोक्यात काठी मारून जखमी केले व फिर्यादीचा मुलगा निलेश दिलीप झिने हा सोडविण्यास आला असता आरोपी रमेश गुळवे यांने निलेश यांच्या हाताच्या अंगठ्याला चावा घेवून जखमी केले. तसेच जोरजोरात ओरडत शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून फिर्यादी याने बुलडाणा शहर पोलीस स्टेशन येथे आरोपी विरूद्ध तक्रार दिलीवरून गुन्हा नोंदविण्यात आला.
    त्यावरून मुख्य न्यायदंडाधिकारी बुलडाणा यांचेसमक्ष फौजदारी खटला चालविण्यात आला. ज्यात अभियोग पक्षाद्वारे फिर्यादी, जखमी साक्षीदार व इतर साक्षीदारांच्या पुराव्याच्या आधारे मुख्य न्यायदंडाधिकारी ना.रा. तळेकर यांनी आरेापी प्रकाश गुळवे व रमेश गुळवे यांना दोषी धरून 3 महिने सक्तमजुरी व 1000 रूपये दंड, दंड न भरल्यास 15 दिवस कारावासाची शिक्षा सुनावली. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता अनिलकुमार वर्मा यांनी कामकाज पाहिले. तपास अधिकारी हवालदार  अशोक गाढवे, किशोर कांबळे, ना.पो.कॉ गजानन मांटे यांनी सहकार्य केले, असे सहाय्यक सहकारी अभियोक्ता, बुलडाणा यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                                    ******
अंत्योदय लाभार्थ्यांसाठी धान्याचे वाहतूक आदेश पारीत
  • 31 मार्च 2020 पर्यंत करावी लागणार धान्याची उचल
बुलडाणा,दि‍ 12 - राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत एप्रिल 2020 चे नियतनातील अंत्योदय योजने करीता गहू धान्याची भारतीय अन्न महामंडळाच्या वखार महामंडळ टेंभूर्णा, खामगांव यांचे गोदामातून शासकीय गोदामात वाहतूक करण्याचे आदेश पारीत करण्यात आले आहे. सदर धान्याची उचल गोदामातून 31 मार्च 2020 पर्यंत करावी लागणार आहे. या लाभार्थ्यांसाठी वाटपाचे दर गहू 2 रूपये प्रतिकिलो,  तर परिमाण प्रति लाभार्थी 15 किलो गहू किलो आहेत.
     गोदामनिहाय धान्याची वाहतूक खालीलप्रमाणे करावी.   चिखली गोदामासाठी गहू 469 क्विंटल, बुलडाणा : गहू 1018  क्विंटल,  दे.राजा गोदामाकरीता गहू 400, अमडापूर : गहू 159  क्विंटल, मोताळासाठी गहू 835  क्विंटल, नांदुरासाठी गहू 898 क्विंटल, खामगांव गोदामकरीता गहू 711, शेगांवकरीता गहू 448, जळगांव जामोदकरीता गहू 753, संग्रामपूर गोदामाकरीता गहू 896,  मेहकरसाठी गहू 618 , लोणारकरीता गहू 982, सिंदखेड राजाकरीता गहू 405 क्विंटल,  मलकापूर : गहू 670, साखरखेर्डा गहू 224, आणि डोणगांव करीता गहू 194  क्विंटल असणार आहे. अशाप्रकारे एकूण गहू 9680 क्विंटल  पूरवठा करण्यात येणार  आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                                *****
प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांसाठी धान्याचे वाहतूक आदेश पारीत
  • 31 मार्च 2020 पर्यंत करावी लागणार धान्याची उचल
बुलडाणा,दि‍ 12 - राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत एप्रिल 2020 चे नियतनातील प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजने करीता गहू धान्याची भारतीय अन्न महामंडळाच्या वखार महामंडळ टेंभूर्णा, खामगांव यांचे गोदामातून शासकीय गोदामात वाहतूक करण्याचे आदेश पारीत करण्यात आले आहे. सदर धान्याची उचल गोदामातून 31 मार्च 2020 पर्यंत करावी लागणार आहे. या लाभार्थ्यांसाठी वाटपाचे दर गहू 2 रूपये प्रतिकिलो,  तर परिमाण प्रति लाभार्थी 3 किलो गहू आहेत.
     गोदामनिहाय धान्याची वाहतूक खालीलप्रमाणे करावी.   चिखली गोदामासाठी गहू 4222 क्विंटल, बुलडाणा : गहू 5124  क्विंटल,  दे.राजा गोदामाकरीता गहू 1965, अमडापूर : गहू 1373 क्विंटल, मोताळासाठी गहू 3100 क्विंटल, नांदुरासाठी गहू 3081 क्विंटल, खामगांव गोदामकरीता गहू 4701, शेगांवकरीता गहू 2625, जळगांव जामोदकरीता गहू 2954, संग्रामपूर गोदामाकरीता गहू 2467,  मेहकरसाठी गहू 3401 , लोणारकरीता गहू 1964, सिंदखेड राजाकरीता गहू 1597 क्विंटल,  मलकापूर : गहू 3040, साखरखेर्डा गहू 1212, आणि डोणगांव करीता गहू 1204  क्विंटल असणार आहे. अशाप्रकारे एकूण गहू 44030 क्विंटल  पूरवठा करण्यात येणार  आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                                *****
बाल न्याय मंडळाच्या बैठकीचे आज जळगांव जामोद येथे आयोजन
  बुलडाणा, दि. 12 : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 मधील अधिकारान्वये राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 मधील नियमानुसार मंडळाची फिरती बैठक आयोजित करण्यात येते. येत्या शुक्रवार, 13 मार्च 2020 रोजी पंचायत समिती सभागृह, जळगांव जामोद येथे मंडळाच्या फिरत्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत मंडळासमोर त्या- त्या भागातील विधी संघर्षग्रस्त बालकांची प्रकरणे सुनावणीसाठी घेण्यात येणार आहे. तरी या बैठकीला संबंधितांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शासकीय मुलांचे निरीक्षणगृह / बालगृह अधिक्षक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
                                                                        ******
तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे 16 मार्च रोजी आयोजन
  बुलडाणा, दि. 12 : नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा जलदगतीने व्हावा, यासाठी मोताळा तहसिल कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा तालुकास्तरीय लोकशाही दिन दि. 16 मार्च 2020 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे.  या दिवशी तहसलिदार व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करणार आहेत.
         जिल्ह्यातील शासकीय, निम शासकीय कार्यालयातील अडचणी व तक्रारी संबंधी ज्या नागरिकांना आपली निवेदने लोकशाही दिनी सादर करावयाची आहेत, त्यांनी तहसिलदार यांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज करावा. विहित नमुन्यातील अर्ज व सोबत अर्जाची आगाऊ प्रत जोडून लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी अर्ज करावा. अर्जदाराने लोकशाही दिनाच्या दिवशी मूळ अर्जासोबत उपस्थित रहावे. तहसिल कार्यालयात लोकशाही दिनी संबंधीत नागरिकांनी उपस्थित राहून दोन प्रतींमध्ये आपली निवेदने जिल्हाधिकारी यांना सादर करावीत. अन्य व्यक्तीमार्फत पाठविलेली निवेदने स्विकारली जाणार नाहीत.
तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही. तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्‍या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात, प्राधिकाऱ्यांकडील, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी 8 दिवसात पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल,  असे तहसिलदार, मोताळा यांनी कळविले आहे.
                                                            *******
यशवंतराव चव्हाण यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
बुलडाणा, दि. 12 : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी  कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.
    जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी भुषण अहीरे, गौरी सावंत, जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री. मारबते, जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश बेल्लाळे, तहसिलदार प्रिया सुळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते. उपस्थितांनी यावेळी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
                                                            *****

No comments:

Post a Comment