समाजाने महिलांना सन्मानाची वागणूक द्यावी
· जागतिक महिला दिनी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे आवाहन
बुलडाणा, दि. 7 : आजचे युग हे स्पर्धचे आहे. या युगात स्त्री – पुरूष हा भेदच राहीला नाही. स्त्री – पुरूष समान आहेत, देशाच्या प्रगतीत स्त्रीयांचाही मोलाचा वाटा आहे. कुठल्याही क्षेत्रात स्त्री ही पुढे आहे. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. प्रत्येक क्षेत्राची यशस्वीता महिलांनी काबीज केली आहे. मात्र तरीही समाजाचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन अजूनही बदललेला दिसून येत नाही. समाजाने महिलांना सन्मानाची वागणूक द्यावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जागतिक महिला दिनी केले आहे.
समाजात अजुनही स्त्रीयांवर अत्याचाराच्या घटना आहेत. कौटुबिक हिंसाचाराच्या घटनाही समोर येत आहे.. मात्र महिलांनी हा सर्व अत्याचार सहन करायची गरज नाही. आपल्यावर होत असलेल्या अन्ययाला वाचा फोडण्यासाठी महिलांनी समोर यावे. जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जावून तक्रार द्यावी. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना आळा बसावा, घडलेल्या गुन्ह्यांमध्ये विनाविलंब आरोपींना कडक शासन व्हावे, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना त्वरित तपास करता यावा, यासाठी राज्य शासन प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलीस स्टेशन स्थापन करीत आहे. जिल्ह्यातही पोलीस विभागाच्या माध्यमातून दक्षता पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. ही पथके चिडीमारांवर कारवाई करून मुलींना संरक्षण देण्याचे काम करीत आहे. राज्य शासन महिलांवरील बलात्काराच्या आरोपींना कमी कालावधीत शिक्षा देण्यासाठी दिशा कायदा राज्यात आणत आहे, असे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे.
राष्ट्रमाता जिजाऊ, माँ रमाई, सावित्रीबाई फुले, प्रथम महिला राष्ट्रपती प्रतीभाताई पाटील, पंतप्रधान इंदिरा गांधी, अंतराळ क्षेत्रातील मोठे नाव कल्पना चावला, सामाजिक व वैद्यकीय सेवा क्षेत्रात नावाजलेल्या मंदाताई आमटे, राज्यातील 400 गड – किल्ले सर करणारी हामीदा खान, देशातील पहिली आंधळी महिला आयएएस अधिकारी प्रांजली पाटील यासोबतच असंख्य विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविलेल्या महिला समाजासमोर आदर्श आहेत. त्यांच्या कार्याने समाजात महिलांचा सन्मान वाढविला आहे. तरी या महिलादिनी मुलींनी अशा महिलांच्या कार्याची प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.
· 8 ते 22 मार्च पर्यंत पंधरवडा, विविध कार्यक्रमांचे आयोजन
बुलडाणा, दि. 7 : जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने राज्यासह जिल्ह्यात 8 मार्च पासून ते 22 मार्च पर्यंत पोषण पंधरवडा राबविण्यात येणार आहे. यबाबत केंद्र शासनाचेही निर्देश प्राप्त झाले आहेत. या पंधरवड्याचा मुख्य उद्देश हा महिला व बालकांच्या पोषणाची स्थिती सुधारण्यावर विशेष भर देणे आवश्यक असल्याचा आहे.
मुख्याध्यापकांनी शाळेमध्ये वर्गनिहाय नियुक्त केलेल्या मॉनीटरला पोषण पंधरवडा कालावधीसाठी पोषण मॉनिटर म्हणून घोषीत करावे. शाळेत मध्यान्ह भोजन काळात पोषण मॉनीटरने मुलांना हात स्वच्छ धुण्याचे महत्व पटवून द्यावे. अंगणवाडी सेविकेच्या मदतीने मुख्याध्यापकांनी गावात पंधरवड्यादरम्यान एकदा तरी प्रभात फेरी काढावी. ॲनीमीया मुक्त भारत कार्यक्रमातंर्गत नियुक्त केलेल्या शाळांच्या नोडल अधिकाऱ्यांच्या मदतीने पोषण पंधरवड्यात नियमितरित्या शाळेतील मुलांना मध्यान्ह भोजन दरम्यान लोहयुक्त् मोळ्यांचे वाटप करावे. प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद शाळेत हिमोग्लोबीन तपासणी कॅम्प घ्यावा. एएनएम व आशा स्वयंसेविका यांनी अतिसाराबाबत जनजागृती करून ओआरएस चा पुरवठा करण्यात येईल. सरपंच अथवा ग्रामसेवक यांनी पोषण अभियानाची जागृतीसाठी गावात पोस्टर, भित्तीचित्रे रंगवावी. या कालावधीत सॅम बालकांच्या व्यवस्थापनासाठी अंगणवाडी स्तरावर ग्राम बाल विकास केंद्राचे आयोजन करण्यात येणार आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
असा राहील पंधरवडा
पोषण पंधरवडा कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. ती पुढीलप्रमाणे दि. 8 मार्च रोजी : ग्रामसभा बैठकीचे आयोजन, ग्राम स्तरावर पंधरवड्याचे उद्घाटन, प्रभात फेरी अथवा पोषण रॅली काढणे, अंगणवाडी सेविकांनी अंगणवाडी स्व्च्छ करून बालकांना हात धुण्यासाठी प्रेरीत करावे, सॅम बालकांसाठी व्हीसीडीसी सुरू करणे, दि 9 मार्च : अंगणवाड्यांनी पूर्व बाल्यावस्थेतील 3 वर्षाखालील मुलांसाठी क्रियाशील सहभागाच्या कृतीचे आयोजन करणे, आहार प्रात्याक्षिकात सक्रीय सहभाग नोंदविणे, शाळा व अंगणवाडीमध्ये न्युट्री गार्डन व रूफ टॉप गार्डन तयार करणे, दि. 10 मार्च : आशा, एएनएम व अंगणवाडी सेविका यांची मिळून गृहभेटी आयोजीत करणे, सायकल रॅली, मातांची पोषणासंदर्भात पाककला स्पर्धा, दि 11 मार्च : लहान बालकांमध्ये रक्तक्षयाला प्रतिबंध करणे, टी 3 कॅम्प आयोजित करून 6 महिने ते 59 महिन्यांमधील बालके, गर्भवती महिला व स्तनदा माता, वडील व पती यांच्या रक्तक्षयाच्या प्रतिबंधासाठी शिबिरांचे आयोजन, आहरातील विविधता व लोहयुक्त आहारासाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेणे, दि. 12 मार्च :समुदाय आधारीत कृतीचे आयोजन करणे, शासकीय कार्यालयात हात धुण्याचे प्रात्याक्षिक करणे, दि 13 मार्च : गृहभेट आयोजन, पालक मेळावा आयोजित करणे, स्तनपान व पोषणाचे १००० दिवस यावर जागरूकता सत्र आयोजीत करणे, शासकीय कार्यालयात जागरूकता सत्र, एनएसएस, स्वयंसेवी संस्था व नेहरू युवा केंद्र प्रतिनिधींना पोषण निरीक्षक नेमने, दि 14 मार्च : पोषण बस, पोषण कार रॅली, गृहभेटीद्वारे बालकांना 6 महिने पुर्ण झाल्यानंतर स्तनपानाबरोबर वरचा आहार सुरू केल्याची खात्री करणे व लोहयुक्त आहाराची तपासणी करणे, दि 15 मार्च : पोषण रॅली, वडीलांना वरचा आहार बनविण्याचे प्रात्याक्षिक व बालकांना भरविण्याचे प्रात्याक्षिक करून दाखविणे, दि 16 मार्च : शाळेत जाणाऱ्या बालकांसाठी रक्तक्षयाच्या प्रतिबंधासाठी शिबिराचे आयोजन करणे, पोषाग्रहीचा वर्ग विकसित करणे, दि 17 मार्च : ग्रामपंचायतमध्ये पोषण पंचायत आयोजीत करणे, दि. 18 मार्च : गावातील पोषण कृतीचा प्रचार व प्रसार करणे, शाळेमध्ये पोषणाचे पाच सुत्र सोगणे. दि. 19 मार्च : लोहयुक्त गोळ्या, अन्न व सिरपचे वाटप करणे, शालेय बालकांसाठी ॲनीमीया शिबिर घेणे, दि. 20 मार्च : दिव्यांग माता व दिव्यांग बालकांची आरोग्य तपासणी, काळजी व सेवांची तरतूद कृतीचे अवलोकन, पोषण व आरोग्यावर चर्चा घडवून आणणे, पोषणावर चर्चा व सुधारणा करण्यासाठी युवा वर्गाची बैठक घेणे, दि. 21 मार्च : आजी, आजोबा व वडीलांची पोषणयुक्त आहार बनविण्याची स्पर्धा आयोजित करणे, समाजातील पोषण चॅम्पीयनचा कौतुक सोहळा आयोजित करणे, दि 22 मार्च : पोषण पंधरवडा सांगता समारंभाचे आयोजन.
‘आकांक्षा’ने अनुभवला एक दिवस परिवहन सेवेचा डोलारा
· आकांक्षा बाहेकर बनली एक दिवसासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
बुलडाणा, दि. 7 : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या एक दिवस गुणवंत मुलगी बनणार अधिकारी या संकल्पनेतून साकारलेल्या उपक्रमातंर्गत 5 मार्च रोजी सुंदरखेड येथील सरस्वती विद्यालयाची इयत्ता 9 वी तील गुणवंत विद्यार्थीनी आकांक्षा सतिष बाहेकर एक दिवसासाठी सांकेतिक स्वरूपात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बनली. आकांक्षाने एक दिवसासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्या मार्गदर्शनात परिवहन सेवेचा डोलारा अनुभवला.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी सन्मानपूर्वक आकांक्षाला आपल्या पदाचा पदभार सोपविला व आपल्या खुर्चीत बसविले. आकांक्षाला उपाप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या शासकीय वाहनाने कार्यालयात आणण्यात आले. कार्यालयाच्या शिष्टाचाराप्रमाणे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आकांक्षाला सलामी दिली. यानंतर सर्व कर्मचाऱ्यांची ओळख करून देण्यात आली व कामकाजाची माहिती दिली. यावेळी आकाक्षांने प्रशिक्षणार्थी चालक परवान्यासाठी आलेल्या नागरिकाशी संवाद साधला व परवाना दिला. तसेच ऑनलाईन नोंदणी कामकाजात प्रत्यक्ष सहभाग घेतला.
याप्रसंगी आकांक्षा म्हणाली, आरटीओ विभाग म्हणजे काय, या विभागामार्फत कोणते कामकाज चालते, याबद्दल जाणून घेण्याची उत्कंठा होती. मात्र आज अधिकारी म्हणून कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्याने माझी ‘आकांक्षा’ पूर्ण झाली. भविष्यात चांगला अभ्यास करून आरटीओ बनायचे आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून मुलींचा आत्मविश्वास वाढविण्याचा जिल्हाधिकारी मॅडमचा प्रयत्न अभिनंदनीय आहे. याप्रसंगी आरटीओ विभागाचे निरीक्षक, अधिकारी, कर्मचारी, प्राचार्य श्री आमोदकर, उपप्राचार्य श्री. शेळके आदींची उपस्थिती होती.
महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन सादर करावे
· समाज कल्याण कार्यालयास मंजूरीकरीता अर्ज पाठविण्याची 8 मार्च अंतिम मुदत
बुलडाणा, दि. 7 : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभाग व बहुजन कल्याण विभागाअंतर्गत येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या योजना महाडीबीटी पोर्टलमध्ये अंतर्भूत आहे. सन 2019 – 20 या शैक्षणिक वर्षातील अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण, परीक्षा शुल्क आदी योजनांचे महाविद्यालय स्तरावर 2277 विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित असल्याचे डॅशबोर्डवरून दिसून येते.
महाडीबीटी पोर्टलवर महाविद्यालय शिष्यवृत्तीचे अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, बुलडाणा कार्यालयास मंजुरीकरीता सादर करण्याची अंतिम तारिख 8 मार्च आहे. तरी महाविद्यालयाच्या प्रचार्यांनी सदर अर्ज या अंतिम तारखेनंतर महाडीबीटी प्रणालीवर सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, बुलडाणा कार्यालयास सादर करावे. शासनाकडून दिलेल्या अंतिम मुदतीनंतर प्रलंबित अर्ज ऑटो रिजेक्ट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थी, पालक व महाविद्यालयाची राहील, याची महाविद्यालयाने गांभीर्याने नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ अनिता राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
पशुपालकांनी त्यांची जनावरे मोकाट – बेवारस सोडू नये
- जिल्हाधिकारी
बुलडाणा, दि. 7 : जिल्ह्यात जनावरांची होणारी अनधिकृत कत्तल, अवैध वाहतुक रोखण्यासाठी पोलीस, परीवहन व पशुसंवर्धन खात्याने नियमानुसार कार्यवाही करावी. भटक्या व मोकाट जनावरांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होवून प्रसंगी अपघातात प्राणहानीसुद्धा होण्याची शक्यता असते. अशा जनावरांपासून मानवी आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी पशुपालकांनी त्यांची जनावरे मोकाट व बेवारस सोडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात ३ मार्च रोजी प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. रामेश्वर पुरी, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बोरकर, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. ठाकरे आदी उपस्थित होते.
मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आवश्यक कार्यवाही करावी. भटक्या व मोकाट कुत्र्यांचे प्रजनन रोखण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पशुसंवर्धन विभागाच्या मार्गदर्शनाखाली निर्बिजीकरण शिबिराचे आयोजन करावे. बंद पडलेले कोंडवाडे सुरू करावे. अपघात व अन्य कारणास्तव मृत पावलेल्या जनावरांची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावावी. मोकाट व बेवारस स्थितीत सापडलेल्या जनावरांच्या मालकावर प्रशासनाने नियमानुसार कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्ह्यात श्वान प्रजनन विपनन नियम 2017 व पाळीव प्राणी दुकान नियम 18 नुसार तपासणी करण्यासाठी त्रिस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. बैठकीला समिती सदस्य सुरेश मोदी, शंतनु पाटील, श्रीकांत अंधारे, विलसराव मारोडे, वसंत अंबडकर, भारतीय जीवजंतु कल्याण बोर्डाचे जिल्हा प्रतिनिधी राजेश पिंगळे आदी उपस्थित होते, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
आचल तायडे व मीरा रहाणे यांनी एक दिवसासाठी अनुभवला शिक्षण विभागाचा कारभार….!
· जिल्हा परिषदेच्या पान्हेरा खेडी शाळेच्या विद्यार्थीनी
बुलडाणा, दि. 7 : महिला सक्षमीकरणासाठी कौतुकास्पद ठरलेल्या व राज्यभर दखल घ्यावयास भाग पाडणाऱ्या एक दिवस गुणवंत विद्यार्थीनी अधिकारी उपक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या संकल्पेतून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमात विविध विभागांचे विभागप्रमुख जुळले आहे. शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक या दोन्ही पदांवर एक दिवसासाठी शिक्षणाधिकारी म्हणून गुणवंत विद्यार्थीनीला सांकेतिक स्वरूपात पदभाराचा उपक्रम राबविण्यात आला. सांकेतिक स्वरूपात मोताळा तालुक्यातील पान्हेरा खेडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या इयत्ता 9 वीच्या विद्यार्थीनी कु. आचल तायडे हिने शिक्षणाधिकारी (माध्यमिक) पदाच्या कारभाराचा अनुभव घेतला. तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पदाचा सांकेतिक स्वरूपात कु. मिरा राहणे यांनी एक दिवसासाठी कारभार सांभाळला.
आचल तायडे हिच्या पदभारावेळी शिक्षणाधिकारी माध्यमिक श्रीराम पानझाडे उपस्थित होते. त्यांनी आचलला सन्मान पूर्वक पदाची सुत्रे दिली व कामाचा परिचय करून दिला. सध्या सुरू असलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेची माहिती दिली. त्यानंतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांची ओळख करून दिली. परीक्षा सुरू असल्यामुळे आचलने शिक्षणाधिकारी श्री. पानझाडे यांच्यासमवेत परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. कॉपीमुक्त अभियानाच्या यशस्वीतेची माहिती घेतली.
प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाची सांकेतिक स्वरूपातील एक दिवसासाठी सुत्रे कु. मिरा राहणे हिने स्वीकारली. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ई. झेड खान, उपशिक्षणाधिकारी उमेश जैन, सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रभाकर वानखेडे, राजेश वाईनदेशकर, सुभाष थोंबाळे, श्री. साळवे, श्री. काळे आदी उपस्थित होते.
कु. आचल तायडे याप्रसंगी प्रतिक्रीया देताना म्हणाली, आम्ही ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचा कारभार या कार्यालयातून चालतो हे आज मला माहिती पडले. शिक्षणाधिकारी सरांनी मला आज ही संधी दिली त्यबद्दल मी त्यांची आभारी आहे. आमच्या मुलींच्या मनात दहावीच्या परीक्षेबद्दल खूप भिती असते. कॉपी करू देत नाहीत.. पण ती कॉपी आमच्या भविष्यासाठी घातक आहे. शासन खरचं कॉपीमुक्त अभियान राबवून आमच्यासाठीच चांगले काम करीत आहे.
मीरा म्हणाली, या कार्यालयाबद्दल शाळेत ऐकले होते. मात्र आज प्रत्यक्ष पाहता आले. मी खूप मेहनत घेवून अभ्यास करणार आहे. मलाही प्रशासनात येवून शिक्षण विभागात काम करायचे आहे. शिक्षणाचा दर्जा सुधारून चांगली शिक्षण व्यवसथा निर्माण करावयाची आहे. यानंतर या दोन्ही विद्यार्थीनीला त्यांच्या दैदिप्यमान यशाबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या.
ढोरकाकडा अर्थात निळ्या फुलाचे गवताने जनावरांस होवू शकते विषबाधा
· जनावरांना गवत खाण्यापासून रोखावे, पशुसंवर्धन विभागाचे आवाहन
बुलडाणा, दि. 7 : जनावरांस विषारी वनस्पती, किटकनाशके, तृणनाशके, कारखान्याचे सांडपाणी आदी विषारी पदार्थ खाण्यात आल्यास त्यापासून जनावरास विषबाधा होवू शकते हे माहिती आहे. मात्र ढोरकाकडा अर्थात निळ्या फुलाचे गवत खाल्यानेसुद्धा जनावरांना विषबाधा होते, याबाबत पशुपालक अनभिज्ञ आहेत. तरी पशुपालकांनी ढोरकाकडा गवत खायला देवू नका, असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्धशाळा विषय समिती सभापती व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी केले आहे.
नोव्हेंबर ते फेब्रुवारी व मार्च महिन्यात शेतकरी कापूस पिकाला पाणी देतात. तसेच रब्बी पिकांनाही ओलीत केल्या जाते. अशा ओलीताच्या जमिनीवर ढोरकाकडा या तणाची वाढ चांगली होते. ही वनस्पती अचानक जास्त् प्रमाणात खाण्यात आल्यास त्यापासून जनावरांना विषबाधा होते. जनावरांमध्ये हे गवत खाण्यात आल्यास जनावर सुस्तावते, शारिरीक तापमानात किंचीत वाढ होते, जनावर खाणे – पिणे बंद करते, लाळ गाळणे व तोंडातून फेस येतो, जनावर रवंथ करीत नाही, शेण घट्ट व कडक असून त्यास रक्त चिकटलेले असते, थेंब थेंब लघवी होते किंवा होत नाही, जनावरांच्या मांड्यांच्या मागील बाजूस द्रवयुक्त सुज येते, जनावर एकाच ठिकाणी थांबते, शेवटी जनावरात शक्तीपात होवून श्वसनास त्रास होतो व जनावर दगावते. ही लक्षणे बाधीत जनावरांत दिसून येते.
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जनावरांना ढोरकाकडा वनस्पती खावू देवू नये, बुरशीयुक्त कडबा किंवा कुटार खावू घालणे बंद करावे, असे कुटार खावू न घालणे शक्य नसल्यास त्यावर चुन्याची निवळी शिंपडून व नंतर वाळवून खावू घालावे.
अशा जनावरांना दिवसातून तीन वेळेस एक किलो कळीचा चुना व 10 लीटर पाणी असलेली चुन्याची निवळी मोठ्या जनावरांसाठी 5 ते 7 लीटर व वासरास 5 लीटर दिवसातून पाजावी. अघाडा, पुर्ननवा व गोखरू या वनस्पतीचा रस 100 मिली रोजी द्यावा, पशुवैद्याकच्या सल्ल्याने मायफेक्स, कॅल्शीयम व ग्लुकोजची इंजेक्शन द्यावीत.
खेलो होली…. ईको फ्रेंडली
· पर्यावरणपूरक होळी खेळण्याचे सामाजिक वनीकरण विभागाचे आवाहव
बुलडाणा, दि. 7 : दरवर्षी राज्यात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करून होळी जाळण्यात येते. त्यामुळे हवेमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन वायूमुळे प्रदुषण निर्माण होते. तसेच धुळवडीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात रासायनिक रंग वापरण्यात येतात. जे मनुष्यासाठी अतिशय घातक असून आरोग्यासाठी अपायकारक आहेत. त्यामुळे सामाजिक वनीकरण विभाग व राष्ट्रीय हरित सेना यांचे संयुक्त विद्यमाने खेलो होली.. ईको फ्रेंडली होळी सण साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एक गाव एक होळी यासारखा उपक्रम राबविण्यात यावा. होळीसाठी लाकडांचा व गोवऱ्यांचा वापर कमीत कमी करा. होळनिमित्त वृक्षपुजन करावे, होळीमध्ये जाळण्यासाठी एरंडीच्या झाडांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्याएैवजी एरंडीच्या बिया गोळा करून योग्य ओलाव्यांच्या जागी, गावातील नाल्याकाठी बी पेरणी करावी. रासायनिक रंगामध्ये ऑक्साईड, कॉपर सल्फेट, ॲल्युमिनीयम ब्रोमाईड, पर्शियन निळ, मर्क्युरी सल्फाईट आदी आरोग्यास अपायकारक रंग न वापरता नैसर्गिक रंग वापरावेत. बीट, बेलफळे, झेंडूची फुले, आवळा, जास्वंदाची फुले, पळसाची फुले, गुलाबाची फुले आदीपासून बनविण्यात आलेले ईको फ्रेंडली रंग वापरावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.
विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांचा दौरा
बुलडाणा, दि. 7 : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर दि. 8 मार्च 2020 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे : दि. 8 मार्च रोजी सायं 4.45 वाजता औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व शासकीय वाहनाने चिखलीकडे प्रयाण, सायं 6.11 वाजता अंकुशराव पाटील यांचे चिरंजीव ऋषभ यांच्या शुभविवाहास उपस्थिती, रात्रौ 8 वा मलकापूर कडे शासकीय वाहनाने प्रयाण करतील, रात्रौ 10.10 वा मलकापूर रेल्वे स्थानक येथून विदर्भ एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.
No comments:
Post a Comment