Wednesday, 4 March 2020

मलकापूरची सहरिश कंवल एक दिवसासाठी बनली जिल्हा पोलीस अधिक्षक



  • ‘होईल मी स्वयंसिध्दा’पर्यंत मुलींना पोहचविण्यासाठी कार्य करण्याचा मनोदय
बुलडाणा, दि. 4 : महिला व बालकांवरील अत्याचाराला पायबंद घालून प्रत्येक मुलींला 'होईल मी स्वयंसिध्दा' या ध्येयापर्यंत पोहचविण्यासाठी आपण सक्रीय कार्य करू, अशी कटीबध्दता आज बुलडाणा जिल्ह्याच्या सांकेतिक स्वरूपात पदभार घेणाऱ्या जिल्हा पोलीस अधिक्षक सहरिश कंवल हीने व्यक्त केली.
     जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर  जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात सर्वदूर महिला सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्त विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी महिला व बालकांवरील अत्याचाराला प्रतिबंध घालण्यासाठी सामाजिक व सामुदायिक उत्तरदायित्वाची भूमिका रूजविण्यासाठी एक दिवसाची जिल्हा पोलीस अधिक्षक म्हणून मलकापूर येथील जिल्हा परिषद उर्दू हायस्कुलची विद्यार्थीनी सहरिश कंवल हिच्याकडे सांकेतिक स्वरूपात जिल्हा पोलीस अधिक्षक पदाचा पदभार सोपविला.
     जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात होत असलेल्या अनेक उपक्रमांची रेलचेल होत असतांना बुलडाणा जिल्ह्यात महिला सप्ताह निमित्त  होत असलेला हा वैविध्य व नाविण्यपूर्ण उपक्रम संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरला आहे. ग्रामीण भागातील मुलींना प्रेरणा व संदेश देण्याच्या उदे्देशाने सुरू असलेल्या या उपक्रमा अंतर्गत दररोज विविध तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील किशोरवयीन मुलींना जिल्हा मुख्यालयाच्या स्तरावरील जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या वरीष्ठ पदावर सांकेतिक स्वरूपात कारभार पाहण्याची संधी दिल्या जात आहे. महिला सक्षमीकरणाची प्रेरणा या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात रूजविली जात आहे.
        या अनुषंगानेच आज जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी मलकापूर येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेतील इयत्ता 9 वी ची विद्यार्थिनी असलेल्या कु. सहरिश कंवल या विद्यार्थिनीला सांकेतिक स्वरूपात आपला पदाचा पदभार सोपविला. सर्वसाधारण कुटूंबातील असलेल्या सहरिश कंवलचे वडील अब्दूल आसिफ हे गॅरेज मेकॅनिक तर आई समिना शिरीन गृहिणी आहे. पोलीस अधिक्षकांच्या अंबर दिव्याच्या गाडीत आज सहरिश कंवल चे जिल्हा पोलीस मुख्यालयात ऐटीत आगमन झाले. यावेळी पोलीस दलाच्या प्रचलित शिष्टाचारानूसार  पोलीस दलाच्या सशस्त्र तुकडीने सहरिश कंवलला मानवंदना दिली. मानवंदनेनंतर सहरिश कंवलने महिला व पुरूष पोलीस जवानांच्या तुकडीचे निरीक्षण केले. त्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी जिल्हा पोलीस मुख्यालयातील सर्व वरीष्ठ अधिकाऱ्यांचा परिचय करून दिला. यावेळी गृह पोलीस उपअधिक्षक बळीराम गीते, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख, जिल्हा विशेष शाखेच्या पोलीस निरीक्षक श्रीमती कायके, कार्यालयीन अधिक्षक सुनिल पवार व अन्य कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
    त्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयीन दालनात डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी सांकतिक स्वरूपात आपल्या पदाचा पदभार कु सहरिश कंवल कडे हस्तांतरीत केला. या पदग्रहण समारंभानंतर स्थानापन्न जिल्हा पालीस अधिक्षक कु. सहरिश कंवल यांना पोलीस विभागाच्या विविध शाखा व उपशाखांची माहिती तसेच आढावा देण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी बुलडाणा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने  महिला व मुलींच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने  महिला व मुलींवरील अत्याचार प्रतिबंधासाठी राबविण्यात येणाऱ्या कळी उमलतांना, महिला तक्रार निवारण पेटी, महिला दक्षता समिती, दामिनी पथक, निर्भया पथक, स्वयंसिध्दा पथक, महिला हेल्प लाईन, चाईल्ड हेल्प लाईन, स्वसंरक्षण, सायबर सेफ वुमेन इत्यादी विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. तसेच सामुदायिक उत्तरदायित्व या भावनेने बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन हे महिलांना आपल्या माहेरासारख वाटेल या उदात्त विचारधरेकडे जिल्हा पोलीस प्रशासनाची वाटचाल राहील असा विश्वास व्यक्त केला.
    यावेळी बोलतांना जिल्हा पोलीस अधिक्षक म्हणून सांकेतिकरित्या स्थानापन्न झालेल्या कु. सहरिश कंवल हिने आपल्या आयुष्यातील ही अभूतपूर्व संधी असून आजच्या या उपक्रमामुळे पोलीसांबद्दल आपल्या मनात असलेले भय निघून गेल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्यातील कोणत्याही महिलेने अत्याचाराला प्रतिबंध घालण्यासाठी मनात कुठलीही भिती न ठेवता पोलीस विभागाच्या अनेक महत्वपूर्ण उपक्रमांचा आधार घ्यावा, असे आवाहन केले. सोबतच महिला व बालकांवरील अत्याचाराला पायबंद घालून प्रत्येक मुलींला होईल मी स्वयंसिध्दा या ध्येयापर्यंत पोहचविण्यासाठी आपण यापुढे सक्रीय कार्य करू, अशी ग्वाही सुध्दा दिली.
    दरम्यान महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. शन्मुगराजन, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी वरीष्ठ पातळीवरून सुरू केलेले संयुक्त प्रयत्न निश्चितच उल्लेखनीय ठरत आहेत.
*******    

No comments:

Post a Comment