Thursday, 29 June 2017

NEWS 29.6.2017 DIO BULDANA


जिल्हाधिकारी कार्यालयात
3 जुलै रोजी लोकशाही दिन
  बुलडाणा, दि.29 : नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा जलदगतीने व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार या महिन्याचा लोकशाही दिन सोमवार, दि. 3 जुलै 2017 रोजी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आला आहे.  या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करणार आहेत. तसेच तालुका स्तरावर तहसील कार्यालयात महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे.
         जिल्ह्यातील शासकीय, निम शासकीय कार्यालयातील अडचणी व तक्रारी संबंधी ज्या नागरिकांना आपली निवेदने लोकशाही दिनी सादर करावयाची आहेत, त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज करावा. विहित नमुन्यातील अर्ज व सोबत अर्जाची आगाऊ प्रत जोडून लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी पाठविणे आवश्यक आहे. अर्जदाराने लोकशाही दिनाच्या दिवशी मूळ अर्जासोबत उपस्थित रहावे. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनी संबंधीत नागरिकांनी उपस्थित राहून दोन प्रतींमध्ये आपली निवेदने जिल्हाधिकारी यांना सादर करावीत. अन्य व्यक्तीमार्फत पाठविलेली निवेदने स्विकारली जाणार नाहीत. तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही.
   तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्‍या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात, प्राधिकाऱ्यांकडील, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी 8 दिवसात पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल,  असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
                                                                                                ******
राहेरी पुलाच्या दुरूस्तीपोटी कंत्राटदाराच्या देयकाची अदायगी नाही
·        पुलाच्या ‘एक्स्पान्शेंन जॉईंट’चे काम पूर्ण
·        क्युरींग पिरेड पूर्ण होण्यापूर्वी वाहतूक सुरू करणे अत्यावश्यक
·        कंत्राटदारास 70 लक्ष रूपयांचे देयक नाही
  बुलडाणा, दि.29 : सिंदखेड राजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीवरील राहेरी गावाशेजारील पुलाचे एक्स्पान्शंन जॉईंट व बेअरींग दुरूस्तीचे काम पुर्ण करण्यात आले आहे. सदर पुल वाहतूकीसाठी 28 एप्रिल 2017 रोजी खुला करण्यात आलेला आहे. पुलाच्या दुरूस्तीपोटी कंत्राटदाराला 70 लक्ष रूपयांचे देयक अदा केल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या, मात्र या पुलाच्या दुरूस्तीपोटी 26.31 लक्ष रूपयांचे देयक असून त्याची अदायगी अद्याप केलेली नाही, असा खुलासा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे.  
    या पुलाच्या एक्स्पान्शेंन जॉईंटचे काम करण्यात येत असताना एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आलेली होती. एका बाजूचे एक्स्पान्शन जॉईंटचे क्रॉक्रींटीकरण करण्यात आलेले होते व ते पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या बाजूचे काँक्रीटीकरण करण्यात आलेले होते. या कामाचा ‘क्युरींग पीरेड’ पूर्ण होण्यासाठी वाहतूक सुरू करणे अत्यावश्यक होते. त्यामुळे काँक्रीटच्या जाँईटला तडे जावून ते थोडे क्षतिग्रस्त झाल्याचे निदर्शनास आले. सदर काँक्रीटची मोजमापे 7.09 घनफूट इतके असून त्याची किंमत 45 हजार एवढी आहे. काँक्रीटच्या कामाचे देयक अद्याप अदा करण्यात आलेले नाही. सदरच्या दुरूस्तीविषयी कंत्राटदारास अवगत करण्यात आलेले आहे.  सदर काम करीत असताना वाहतुक  सुरू असल्यामुळे काँक्रीटला बळकटी येण्यापूर्वी वाहतूक सुरू करावी लागली. त्यामुळे काँक्रीटचा काही भाग क्षतिग्रस्त झाला, असे कार्यकारी अभियंता, सा.बां, बुलडाणा यांनी कळविले आहे.
*****
पशुसंवर्धन विभागाच्यावतीने जिल्ह्यात पशुसमृद्धी सप्ताहाचे आयोजन
·        5 जुलै 2017 पर्यंत राबविण्यात येणार सप्ताह
  बुलडाणा, दि.29 : राष्ट्रीय विकास योजनेतंर्गत विदर्भ व मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये महादूध ही विशेष दुग्ध विकास योजना मंजरू करण्यात आली आहे. या योजनेची सुरूवात जिल्ह्यातही करण्यात आली आहे. योजनेतंर्गत प्रकल्प क्षेत्रातील गावांमध्ये पशुसंवर्धन विभागामार्फत पशुसमृद्धी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. सदर सप्ताह 5 जुलै 2017 पर्यंत राबविण्यात येणार आहे.
  सप्ताहादरम्यान निवडलेल्या गावांमध्ये पशुवैद्यकीय उपचार शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. सदर शिबिरांमध्ये गावातील जनावरांना नाममात्र एक रूपया सेवाशुल्क आकारून कृत्रिम रेतन, आजारी जनावरांना उपचार, वंध्यत्व तपासणी, शस्त्रक्रीया, गर्भ तपासणी, गोचिड, गोमाशा औषध फवारणी करण्यात येणार आहे. दुध संकलन, दुध उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन व विक्रीकरीता आवश्यक सुविधा महादूध या योजनेतंर्गत निर्माण करण्यात येणार आहे.  राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाच्या सहकार्याने ही योजना कार्यान्वीत करण्यात आली आहे. हा शासनाचा अत्यंत महत्वांकांक्षी प्रकल्प असून याद्वारे पशुपालकांचे उत्पन्न वाढणार आहे. पशुवैद्यकीय सेवा या योजनेतंर्गत मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच दुधाळ जनावरे वाटप, वैरण बियाणे, ठोंब वाटप, लसीकरण करण्यात येणार आहे, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी कळविले आहे.
                                                                        *****
क्रीडा प्रबोधीनीमध्ये खेळनिहाय कौशल्य चाचणीचे आयोजन
  बुलडाणा, दि.29 : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या अधिपत्याखालील शिवछत्रपती क्रीडापीठातंर्गत सन 2017-18 मध्ये ॲथेलेटीक्स, जलतरण, जिन्मॅस्टीक, हॉकी, फुटबॉल, हॅण्डबॉल, आर्चरी, ज्युदो, बॉक्सींग, कुस्ती, बॅडमिंटन, टेबल टेनिस, वेटलिफ्टिींग व शूटींग या खेळनिहाय कौशल्य चाचण्यांचे आयोजन 7 व 8 जुलै 2017 रोजी विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती येथे करण्यात येणार आहे.
   या खेळांमध्ये जे खेळाडू राज्याचे रहिवासी आहेत व राज्यस्तरावर सहभागी झालेले 19 वर्षाच्या आतील खेळाडू सदर चाचणीस पात्र असणार आहे. सहभागी होणाऱ्या खेळाडूंची केवळ निवास व्यवस्था करण्यात येणार असून त्यांचेसोबत येणारे पालक व क्रीडा मार्गदर्शकांची निवासव्यवसथा करण्यात येणार नाही. सदर खेळाडूंनी प्रवास, भोजन खर्च स्वत: करावयाचा आहे, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी कळविले आहे.
                                                                                    ****
शासकीय जाहीरात धोरणाबाबत 5 जुलै पर्यंत हरकती/सूचना आमंत्रित
            बुलडाणा, दि. 29 : शासकीय जाहिरात धोरणात बदल करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या दि. 24 जानेवारी 2017 रोजीच्या शासन निर्णय क्रमांक : पीयुबी-2016/प्र.क्र.36/34 नुसार अभ्यासगटाची नियुक्ती करण्यात आली आहे. हे धोरण तयार करण्याकरिता विषयवार उपसमित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
            महाराष्ट्र शासनामार्फत वृत्तपत्रे व नियतकालिकांना देण्यात येणाऱ्या वर्गीकृत व दर्शनी जाहिरातींच्या वितरण धोरणाची नियमावली तयार करुन ती दिनांक 1 मे 2001 च्या शासननिर्णयानुसार अंमलात आली आहे. तथापि गेल्या पंधरा वर्षात जाहिरात क्षेत्रात झालेले बदल व सोशल मीडियासह उदयाला आलेली नवीन प्रसारमाध्यमे लक्षात घेता नवीन सर्वंकक्ष जाहिरात धोरण तयार करण्यात येणार आहे.
या अनुषंगाने वृत्तपत्रे व अन्य मुद्रित माध्यमांना अपेक्षित असणारे बदल व सूचना (मुद्यांच्या स्वरुपात) त्यांनी दिनांक 5 जुलै 2017 पर्यंत jahidhoran2017@gmail.com या ई-मेलवर पाठवाव्यात असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे करण्यात येत आहे.
                                                                                    ***

4 कोटी वृक्षलागवड मोहिमेसाठी वृक्षदिंडीचे आयोजन
            बुलडाणा, दि. 29 : राज्य शासनाचा अत्यंत महत्वांकांक्षी उपक्रम असलेली 4 कोटी वृक्षलागवड मोहिम 1 जुलै ते 7 जुलै 2017 अशी सप्ताहाभर राबविण्यात येणार आहे.या मोहिमेच्या जनजागृतीसाठी वृक्ष दिंडीचे आयोजन आज शहरात करण्यात आले. सदर वृक्षदिंडीला जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस, उपवनसंरक्षक बी.टी भगत, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक आदी उपस्थित होते. सदर वृक्षदिंडीचे आयोजन सामाजिक वनीकरण विभाग, वन विभाग व राष्ट्रीय हरीत सेना यांच्यावतीने करण्यात आले होते. याप्रसंगी राष्ट्रीय हरीत सेनेचे शिक्षकही उपस्थित होते.
                                                

No comments:

Post a Comment