जिजामाता प्रेक्षागार मैदान झाले.. योगमय..
- मैदानावर प्राणायाम, कपालभारती
- विविध आसने करून योग दिन साजरा
बुलडाणा, दि. 21 - योग.. निरामय आयुष्याचा सच्चा साथीदार. करा योग रहा
निरोग.. अशी बरिचशी योगाविषयीची महती आपण ऐकत असतो. योगामुळे मन व शरीर शुद्ध करून
सुदृढ आयुष्य जगता येते. तसेच योगामुळे आयुष्य सकारात्मतेने जगता येते. त्यामुळे
प्रत्येकाने आयुष्यात योग करावा. त्याच अनुषंगाने संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा
दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले. त्यानुसार जिल्ह्यात
जागतिक योग दिन आज थाटात साजरा करण्यात आला. जिजामाता प्रेक्षागार मैदानावर योगमय वातावरण
निर्माण झाले होते.
जिजामाता
क्रीडा व व्यापारी संकुलाच्या मैदानावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती उमाताई
तायडे, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मुख्य कार्यकारी अधिकारी एस
षण्मुखराजन, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांचेहस्ते दिपप्रज्वलन करून योग
दिन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हाधिकारी
यांनी यावेळी योगाचे महत्व सांगितले. योग दिन कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा नेहरू युवा
केंद्र, शिक्षणाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. सकाळी 7.00
ते 8.00 या वेळेत विविध योगासने घेण्यात आली. या योगासनाकरीता योग साधक भगवान
सावळे, सचिन खाकरे, अंजली परांजपे,
आर्ट ऑफ लिव्हींग परिवाराचे
संजय पोतदार, श्रीमती कुंदा पंधाडे, प्रशांत लहासे यांनी योग प्रात्याक्षिक केली. स्वामी विवेकानंद जिल्हा योग केंद्र, पर्यावरण
मित्र, वन्यजीव सोयरे परीवार, आयएमए संघटना, सुर्योदय योगा ग्रुप, जिजामाता नर्सिंग
महाविद्यालय, आरोग्य भारती, एएसपीएम आयुर्वेद मेडीकल महाविद्यालय, शासकीय औद्योगिक
प्रशिक्षण संस्था, बुलडाणा, पतजंली ग्रुप यांनी योगसाधनेमध्ये सहभाग घेतला. शेवटी प्रार्थना व संकल्प घेऊन या कार्यक्रमाची
सांगता झाली.
कार्यक्रमाला
विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, शहरातील नागरीक, पोलीस
कर्मचारी, एन.सी.सी. विद्यार्थी, युवा
मंडळाचे पदाधिकारी, पत्रकार, विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने
उपस्थित होते. संचलन चंद्रशेखर जोशी यांनी केले. याप्रसंगी पर्यावरण संवर्धणासाठी
वृक्ष लागवडीची प्रतिज्ञा घेण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षणाधिकारी कार्यालय, नेहरु युवा केंद्र, आर्ट ऑफ
लिव्हींग, पतंजली योग समिती व विविध सामाजीक संघटनांनी
प्रयत्न केले.
*****
जागतिक सिकलसेल दिन साजरा
बुलडाणा दि. 21 - राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात
19 जून रोजी जागतिक सिकलसेल दिन साजरा करण्यात आला. त्यानुसार प्राथमिक आरोग्य
केंद्र, हतेडी येथे कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत
बढे, जिल्हा सिकलसेल समुपदेशक ज्ञानेश्वर गाडेकर, तालुका सिकलसेल सहाय्यक महेंद्र
नाफडे, डॉ. शिंदे, डॉ. इंगळे आदींसह आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका व सिकलसेल
रूग्ण उपस्थित होते.
यावेळी डॉ. बढे यांनी सिकलसेल आजाराची लक्षणे व उपचार याबद्दल मार्गदर्शन
केले. सिकलसेल हा आजार अनुवंशिक असून प्रत्येक व्यक्तीने आपली तपासणी केल्यावरच या
आजाराचे निदासन समजत असते. तरी सिकल सेल सोल्युब्लिटी नावाची तपासणी करणे आवश्यक आहे.
कार्यक्रमावेळी सिकलसेल रूग्णांची तपासणी
करण्यात आली. तसेच सिकलसेलग्रस्त रूग्णांना मोफत रक्त संक्रमण कार्ड, संजय गांधी निराधार
योजना, मोफत एस.टी प्रवास पास, 50 टक्के रेल्वे प्रवास सवलत कार्ड वितरीत करण्यात आले.
सिकलसेलग्रस्त रूग्णांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. संचलन
श्रीमती खानझोडे यांनी केले.
*****
महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण या विषयावर
कार्यशाळेचे आयोजन
·
23 जून
रोजी अमरावती येथे विभागीय कार्यशाळा
बुलडाणा दि. 21 - महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम 2013 कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी
करण्यासाठी कार्यालयात महिलांच्या तक्रार निवारणार्थ तक्रार निवारण समित्या स्थापन
करणे अनिवार्य आहे. राज्य महिला आयोगाने सदर कायद्याच्या अंमलबजाणीकरीता व जागृती निर्माण
करण्याच्या उद्देशाने विभागीय स्तरावरील विभाग, जिल्हा, तालुका स्तरावरील सर्व शासकीय
कार्यालय प्रमुख व त्यांचे अधिनस्त कार्यालयातील तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष, दोन सदस्य यांचेकरीता कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
सदर कार्यशाळा 23 जून 2017 रोजी सकाळी 9.30 ते 5 वाजेदरम्यान संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक
भवन, मोर्शी रोड, अमरावती येथे करण्यात आले आहे.
कार्यशाळेसाठी सर्व कार्यालय प्रमुख,
अंतर्गत तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष व दोन सदस्य यांनी उपस्थित राहणे बंधनकारक
आहे. कार्यशाळेला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर उपस्थित
राहणार असून विशेष पोलीस महानिरीक्षक, विभागातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त,
पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. कार्यशाळेस येताना कार्यालयातील
कार्यरत असलेल्या अंतर्गत तक्रार निवारण समितीची संपूर्ण माहिती सोबत आणणे
अनिवार्य आहे. कार्यशाळेला गैरहजर राहणाऱ्या संबंधितांची राज्य महिला आयोगामार्फत गंभीर
दखल घेण्यात येणार आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.
*****
चिखली येथील शासकीस वसतीगृह येथे प्रवेश देण्यास प्रारंभ
बुलडाणा, दि. 21
: चिखली येथील मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास
मुलींच्या शासकीय वसतिगृहात रिक्त
झालेल्या जागांवर सन 2017-18 या शैक्षणिक सत्रामध्ये गुणवत्तेनिहाय व प्रवर्ग
निहाय प्रवेश देणे सुरू आहे. इयत्ता 7 वी,
10 वी व 12 वी पास तसेच अपंग, अनाथ, विशेष मागास प्रवर्ग, अनुसूचित जमाती, विजाभज,
आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थीनींना प्रवेश देण्यात येत आहे. मध्यतरीच्या
वर्गातील शिकत असलेल्या विद्यार्थींनींना प्रवेश देता येत नाही.
विहीत
नमुन्यातील प्रवेश अर्जाचा नमुना संबंधित वसतीगृहात सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत उपलब्ध
आहे. प्रवेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या सामाजिक आरक्षण व
नियमावलीअन्वये करण्यात येणार आहे. तरी गरजू विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज घेवून
जावून आवश्यक त्या कागदपत्रांसह विहीत कालावधीत वसतीगृहात जमा करावे. वसतिगृहामध्ये
मोफत भोजन, अंथरून, पांघरून, शैक्षणिक पुस्तके, स्टेशनरी साहित्य, निर्वाह भत्ता,
गणवेश रक्कम आदी सुविधा विनामुल्य देण्यात येतात, तरी मुलींनी लाभ घ्यावा, असे आवाहन
गृहपाल श्रीमती पुनम राठोड यांनी केले आहे.
*****
अनुसूचित जाती प्रवर्गातील मुला-मुलींच्या शासकीय शाळेत शिक्षकांकरीता अर्ज
आमंत्रित
·
तासिका तत्वावरील 5 शाळांमधील पदे
·
10 जुलै 2017 रोजी मुलाखतीचे आयोजन
बुलडाणा, दि. 21 : अनुसूचित
जाती व नवबौद्ध प्रवर्गातील मुला/मुलींच्या शासकीय शाळेमध्ये तासिका तत्वावरील शिक्षकांकरीता
अर्ज मागविण्यात येत आहे. जिल्ह्यातील कोलवड, वळती ता. चिखली, घाटपुरी ता. खामगांव,
शेगांव व लोणार येथील शाळांमध्ये सन 2017-18 वर्षाकरीता शिक्षकांची आवश्यकता आहे.
कोलवड ता. बुलडाणा येथील शाळेत इयत्ता 6 ते 8
वी करीता तासिका तत्वावर डि.एड पदवीकाधारक मराठी व सामाजिक शास्त्रविषयांकरीता,
इयत्ता 9 – 10 करीता बी.ए, बी.एड पदवीधारक उमेदवार इंग्रजी व सामाजिक शास्त्र विषयांसाठी
एकूण दोन जागांकरीता शिक्षक पाहिजे आहे. तसेच वळती ता. चिखली येथील शाळेत इयत्ता
9-10 साठी बीए, बीएड पदवीधारक उमेदवार इंग्रजी व सामाजिक शास्त्र विषयांकरीता एकूण
दोन शिक्षक हवी आहेत. त्याचप्रमाणे शेगांव येथील शाळेत इयत्ता 9-10 करीता पात्रता
बीए, बीएडधारक भाषा विषयाकरीता एक, बीएससी बीएड गणित विषयाकरीता एक, बी.ए बीएड
पात्रधारक उमेदवार भाषा व सामाजिक शास्त्र विषयाकरीता एक असे एकूण तीन शिक्षकांची
आवश्यकता आहे.
लोणार येथील शाळेत इयत्ता 6
ते 8 वी करीता तासिका तत्वावर डि.एड पदवीकाधारक मराठी भाषाकरीता एक व सामाजिक
शास्त्रविषयांकरीता एक, गणित विषयासाठी एक, इयत्ता 9 – 10 करीता भाषा एक, सामाजिक शास्त्र
एक, विज्ञान व हिंदी यासाठी प्रत्येकी एक अशाप्रकारे पाच शिक्षक पदांकरीता अर्ज
मागविण्यात येत आहे. घाटपुरी ता. खामगांव
येथील शाळेकरीता इयत्ता 9-10 साठी भाषा, इंग्रजी, सामाजिक शास्त्र व विज्ञान
विषयांसाठी प्रत्येकी एक अशाप्रकारे एकूण चार बीए बीएडधारक शिक्षकांची आवश्यकता
आहे. तसेच इयत्ता 6 ते 8 करीता डि. एड पदवीकाधारक उमेदवार विज्ञान, इंग्रजी
प्रत्येकी एक याप्रमाणे शिक्षकांची गरज आहे.
याप्रमाणे तासिका तत्वावरील शिक्षकांसाठी
पात्र उमेदवारांनी 10 जुलै 2017 रोजी आपल्या परिपूर्ण मुळ कागदपत्रांसह सहायक
आयुक्त, समाज कल्याण, बुलडाणा या कार्यालयात सकाळी 11 वाजता मुलाखतीसाठी उपस्थित
रहावे. पात्र उमेदवारांना 2017-18 करीता तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक देण्यात
येणार आहे. तसेच शासन निर्णयानुसार प्रशिक्षीत पदवीधर उमेदवारांना मानधन अनुदेय
राहणार आहे. उमेदवारांना सेवेत कायम करण्याचा दावा करणार नाही, असे बंधपत्र लिहून देणे
बंधनकारक असणार आहे. शैक्षणिक अर्हता व यापूर्वीच्या कामाचा अनुभव असणाऱ्या
उमेदवारांना, यापूर्वी निवासी शाळेवर तासिका तत्वावर काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य
देण्यात येईल, असे सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले
आहे.
*****
आदिवासी आश्रम शाळांमध्ये 27 जून रोजी प्रवेशोत्सव
·
अकोला प्रकल्पातंर्गत 8 शासकीय, तर 19 अनुदानित आश्रमशाळा
·
वस्तू व साहित्याचा निधी थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार
बुलडाणा,
दि. 21 :
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, अकोला अंतर्गत येणाऱ्या
शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 27 जून 2017 रोजी
प्रवेशोत्सव साजरा केल्या जाणार आहे. शाळांमधील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी सर्व
भौतिक सुविधा मिळतात किंवा नाही, याची तपासणी केल्या जाणार आहे. अकोला प्रकल्पातंर्गत
8 शासकीय, तर 19 अनुदानित आश्रमशाळा आहेत. शासकीय आश्रमशाळांमध्ये 2479 विद्यार्थीसंख्या
असून अनुदानितमध्ये 8248 विद्यार्थी संख्यो आहे.
आश्रमशाळामधील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या भौतिक
सुविधांमध्ये इमारत, विद्युत, पाणीपुरवठा, शौचालय, स्नानगृह वापर, वसतीगृह सुविधा,
भोजन व्यवस्था आदी तपासल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती जाणून घेण्यासाठी
संपर्क अधिकारी नेमले आहेत. आदिवासी आश्रमशाळांमधून शिकणाऱ्या बहुतांश पालकांना त्यांच्या
पाल्यांच्या शाळेतील सोयी-सुविधा, परिसर शिक्षक, शिक्षक व शालेय सुट्टयाविषयी माहिती
नसते. पालकांनी विद्यार्थ्यांची सुटी काढून घरी नेल्याने त्यांचे होणारे शैक्षणिक
नुकसान टाळण्यासाठी व इतरही उपक्रमांची माहिती व्हावी या उद्दात्त हेतून प्रकल्प
अधिकारी श्रीमती विनिता सोनावणे यांनी प्रवेशोत्सव उपक्रम साजरा करण्याचे ठरविले आहे.
आदिवासी विकास विभागाचे सचिव मनीष वर्मा, आयुक्त आर.जी कुळकर्णी, अप्पर आयुक्त गिरीश
सरोदे यांच्या मार्गदर्शनात शाळा प्रवेशोत्सव उपक्रम हाती घेतला आहे. त्यातुन आदिवासी
पालकांमध्ये शाळेबाबत जिव्हाळा वाढविण्यात येणार आहे, असे प्रकल्प अधिकारी श्रीमती
विनिता सोनवणे यांनी कळविले आहे.
*****
पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांचा दौरा
बुलडाणा, दि.21 : जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर गुरूवार, दि. 22 जून 2017
रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : 22 जून 2017
रोजी सकाळी 5.28 वाजता शेगांव रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय मोटारीने खामगावकडे
प्रयाण, सकाळी 6 खामगांव येथे आगमन, राखीव व मुक्काम असेल.
****
देगलुर
येथील प्रौढ अपंग प्रशिक्षण
संस्थेत
प्रवेश घेण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 21 : अपंग कल्याण आयुक्तालयाच्या अधिनस्थ
असलेल्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील शासकीय प्रौढ अपंग, मूकबधीर प्रशिक्षण
संस्थेमध्ये सन २०१७-१८ या वर्षासाठी विविध अभ्यासक्रमात प्रवेश प्रक्रिया सुरू
झाली आहे. या अभ्यासक्रमासाठी प्राचार्य, तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,
शिवनेरी नगर, रामपूर रोड, देगलूर, ता.देगलूर, जि. नांदेड येथे ३० जुन २०१७ पर्यंत प्रवेश
अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, अपंगत्व असल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्यांचे
प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला यांच्या झेरॉक्स प्रती सोबत पाठवाव्यात.
या
प्रशिक्षण संस्थेमध्ये संगणक प्रशिक्षण, वेल्डर आणि सीट मेटल, शिवण व कर्तन कला, वायरमन
व प्लंबर, सीटीसी, सौंदर्यशास्त्र या
अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिल्या जाणार आहे. या प्रवेशासाठी वयोमर्यादा १५ ते ३५ वर्ष
असावे, संस्थेत अपंग व कर्णबधीर मुलांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. या
अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षण, निवासाची व भोजनाची विनामूल्य व्यवस्था आहे. प्रवेश
अर्ज विनामूल्य असून पदवी शिक्षणाकरीता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत
सोय करण्यात आली आहे. प्रवेशितांना प्रतिमाह विद्यावेतन देण्यात येणार आहे. अधिक
माहितीसाठी प्राचार्य, तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, शिवनेरी नगर, देगलूर,
ता. देगलूर, जि. नांदेड येथे किंवा ९९६०९००३६९ व ९१७५४४६४११, ७२७६३२०५७८
क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्रशिक्षण केंद्राद्वारे कळविण्यात आले आहे.
******
No comments:
Post a Comment