सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केली पिडीतेची विचारपूस
·
सामान्य रूग्णालयात जावून घेतली भेट
·
एक लक्ष रूपयांची दिली प्राथमिक मदत
·
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लक्ष रूपयांची देणार मदत
बुलडाणा, दि.10 : बुलडाणा तालुक्यातील रूईखेड मायंबा येथील 2 जून 2017 रोजी
घडलेल्या घटनेतील पिडीत महिलेच्या प्रकृतीची विचारपूस आज 10 जून 2017 रोजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केली.
सामान्य रूग्णालयाच्या विशेष कक्षात दाखल असलेल्या या पिडीत महिलेची भेट त्यांनी
घेतली व एकंदरीत झालेल्या घटनेची त्यांच्याकडून चौकशी केली.
याप्रकरणी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन सामाजिक न्याय मंत्री यांनी
दिले. त्यांनी पिडीतेला ॲट्रासिटी कायद्यातंर्गत विविध कलमान्वये दाखल
गुन्ह्याप्रमाणे प्राथमिक मदतीचा एक लक्ष रूपयांचा धनादेश दिला. पिडीत महिलेने
त्यांच्याबाबत घडलेल्या घटनेचे कथन केले. यावेळी पोलीस प्रशासनाने दाखल केलेल्या
गुन्ह्यांनुसार कडक कारवाई करण्याच्या सूचना सामाजिक न्याय मंत्री यांनी दिल्या. याप्रसंगी
प्रतिक्रिया देताना सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले म्हणाले, ही घटना दुर्देवी
असून अशाप्रकारच्या घटना घडणे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही. जिल्हा
प्रशासनाने अशा घटनांवर वचक निर्माण करण्यासाठी आरोपींवर कठोर कारवाई करावी. तसेच
समाजानेही जातीय तेढ निर्माण करणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष करून जातीय सलोखा अबाधीत
ठेवावा. याप्रकरणी शासन सर्वतोपरी मदत पिडीत कुटूंबाला करेल.
याप्रसंगी अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे सदस्य सी. एल थुल, जि. प अध्यक्षा
श्रीमती उमाताई तायडे, माजी आमदार धृपदराव सावळे, विजयराज शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत
पुलकुंडवार, जिल्हा पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त दिपक
वडपुते, प्र. सहाय्यक आयुक्त निलेश यावलीकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज
मेरत,अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे आदी उपस्थित होते.
*****
पिडीत कुटूंबाच्या मदतीची त्वरित कार्यवाही करा
-
राजकुमार बडोले
·
जिल्हा प्रशासनासोबत बैठक
·
ॲट्रासिटी कायद्यातंर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यांनुसार मदत द्या
बुलडाणा, दि.10 : रूईखेड मायंबा येथील उंबरकर कुटूंबियांसोबत घडलेली घटना ही
दुर्देवी आहे. या
घटनेमुळे उंबरकर कुटूंबियांची झालेली हानी मोठी आहे. या प्रकरणात ॲट्रासिटी
कायद्यातंर्गत पोलीसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांनुसार शासन निर्णयाप्रमाणे सर्व
मदत उंबरकर कुटूंबीयांना द्यावी. याबाबत त्वरित कार्यवाही करावी, अशा सूचना
सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी आज दिल्या.
रूईखेड मायंबा येथील प्रकरणाबाबत आयोजित बैठकीत आढावा घेताना ते बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे सदस्य सी. एल थूल, जिल्हाधिकारी
डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराज एस,
जिल्हा पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त
दिपक वडपुते, सहायक आयुक्त निलेश यावलीकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत, अप्पर
जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वराडे आदी उपस्थित
होते.
ॲट्रासिटी कायद्यातंर्गत विविध कलमान्वये पोलीसांनी गुन्हा दाखल केला
असल्याचे सांगत सामाजिक न्याय मंत्री म्हणाले, मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच
लक्ष रूपयांची मदत पिडीत कुटूंबाला देण्यात येणार आहे. तसेच गावात कायदा व
सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीसांनी बंदोबस्त ठेवावा. या प्रकरणाची कसून
तपासून त्वरित अन्य शासकीय योजनांची मदत पिडीत कुटूंबाला देण्याच्या सूचनाही
त्यांनी दिल्या.
याप्रकरणी अनु. जाती, अुन. जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अंतर्गत आरोपींवर
गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच 23 आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती
जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी दिली. प्रादेशिक उपायुक्त श्री. वडपुते यांनी संपूर्ण
माहिती यावेळी दिली. याप्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित
होते.
******
No comments:
Post a Comment