शासनाच्या कर्जमाफी निर्णयामुळे 40 लाख शेतकऱ्यांचा
7/12 होणार कोरा
- कृषिमंत्री
* जिल्हा परिषदेत कर्जमाफीबद्दल सत्कार कार्यक्रम
* शेतकऱ्यांना खरीप हंगामात होणार लाभ
बुलडाणा, दि.27 - राज्य शासनाने ऐतिहासिक निर्णय घेत राज्यातील
शेतकऱ्यांची 30 हजार कोटी रूपयांची कर्जमाफी केली आहे. या कर्जमाफीमुळे शेतकरी
आनंदीत झाला असून येणाऱ्या खरीप हंगामात मोठा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. या
निर्णयाचे अनेक फायदे होणार आहे. त्यापैकी राज्यातील जवळपास 40 लक्ष शेतकऱ्यांचा
7/12 कोरा होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषि व फलोत्पादन मंत्री तथा
जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज केले.
कर्जमाफीचा निर्णय झाल्यानंतर कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे
पहिल्यांदाच बुलडाणा शहरात आगमन झाले. त्यानिमित्ताने जिल्हा परिषद
प्रशासनाच्यावतीने त्यांचा सत्कार कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी
महाराज सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पालकमंत्री सत्काराला उत्तर
देताना बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जि.प अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे,
माजी आमदार धृपदराव सावळे, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस, जि.प
महिला व बालकल्याण सभापती श्रीमती श्वेता महाले आदी उपस्थित होते.
कर्जमाफीचा निर्णय हा सहजा-सहजी झाला नसल्याचे सांगत कृषिमंत्री म्हणाले, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी या विषयाची गंभीरता लक्षात घेवून उच्चस्तरीय
मंत्रीगटाची स्थापना केली. या मंत्रीगटाने आंदोलनकर्त्या संघटनेच्या
पदाधिकाऱ्यांशी, सुकाणू समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर सरसकट दीड
लक्ष रूपयापर्यंतच्या पीक कर्जाला माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या
निर्णयामुळे राज्यातला कर्जामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी सुखावला आहे. शासनाने
सर्व तांत्रिक कारणे निकाली लावून सर्वंकष असा हा निर्णय घेतला आहे. कुठल्याही
प्रकारच्या जमिनीची अट शासनाने यामध्ये ठेवली नाही. सरसकट दीड लाख रूपयापर्यंतची
कर्जमाफी दिली. तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देत 25 हजार रूपये अनुदान
देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ते पुढे म्हणाले, या निर्णयामुळे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा
मिळणार आहे. याआधीच्या कर्जमाफी निर्णयांमध्ये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा
कुठल्याही प्रकारचा विचार करण्यात आलेला नव्हता. या निर्णयात मात्र नियमित कर्ज
भरणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रकर्षाने विचार करण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांना खरीप
हंगामाची पेरणी करण्यासाठी तातडीने 10 हजार रूपये मदत देण्यात येत आहे. या
निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी जि.प अध्यक्षा उमाताई तायडे यांनी
आपले मनोगत व्यक्त केले. संचलन चंद्रशेखर जोशी यांनी तर आभार प्रदर्शन जि.प सदस्य
संजय वडतकर यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषदेच्यावतीने जि.प अध्यक्षा
यांनी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सत्कार केला. तसेच जि.प
प्रशासनाच्यावतीनेही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे पदाधिकारी,
सदस्य, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****
कोलवडच्या जिल्हा परिषदेत शाळेत जिल्हाधिकारी यांनी
केले नवागतांचे स्वागत
बुलडाणा,दि.27- जिल्ह्यात आजपासून शाळा सुरू झाल्या. लहानग्यांना घेवून
मोठ्या लगबगीने पालकांनी शाळा गाठल्या. शाळांमध्ये आजपासून ही किलबिल सुरू झाली.
त्याला जिल्हा परिषदेच्या शाळाही अपवाद नाहीत. कोलवड ता. बुलडाणा येथील जिल्हा
परिषदेच्या मराठी उच्च माध्यमिक प्राथमिक शाळेत आज जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत
पुलकुंडवार यांनी भेट दिली. त्यांनी नवोगत विद्यार्थ्यांचे, चिमुकल्यांचे स्वागत
केले आणि त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सभापती शंकर जाधव, गटशिक्षणाधिकारी श्री.
आंधळे यांनी जिल्हाधिकारी यांचे स्वागत केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी यांच्याहस्ते
इयत्ता 1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
जिल्हाधिकारी यांनी चिमुकल्यांना विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली. यावेळी
मुख्याध्यापक श्री. वाघ, श्रीमती बोर्डे, श्रीमती
राठोड, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. मटोले, केंद्रप्रमुख आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी, शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी
प्रयत्न केले.
*****
कर्जमाफीमुळे जिल्हा बँकेला मिळणार नवसंजीवनी
-
पालकमंत्री
·
जिल्हा
केंद्रीय सहकारी बँकेत सत्कार कार्यक्रम
बुलडाणा, दि. 27 – बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक ही आर्थिक
अडचणीत असणारी बँक होती. मात्र नाबार्ड व
केंद्र सरकारने दिलेल्या आर्थिक मदतीने बँक अडचणीतून बाहेर यायला लागली. बँकिंगचा
परवाना मिळाल्यानंतर बँकेचे व्यवहार सुरू झाले. यावर्षीही बँकेने सीआरएआर 10.84
टक्के एवढा राखून चांगली कामगिरी बजावली आहे. कर्जमाफीच्या निर्णयानंतर जिल्हा
बँकेला सर्वात जास्त लाभ मिळणार आहे. ही कर्जमाफी जिल्हा बँकेला मिळालेली
नवसंजीवनी असल्याचे मत पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज व्यक्त केले.
जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या सभागृहात कर्जमाफीच्या निर्णयानंतर
पहिल्यांदा बुलडाणा शहरात आगमनप्रसंगी पालकमंत्री यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित
करण्यात आला होता. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी
तथा प्राधिकृत अधिकारी चंद्रकांत पुलकुंडवार, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.
अशोक खरात, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, बँकेचे अति. मुख्य कार्यकारी
अधिकारी अरूण चव्हाण, नाबार्डचे सुभाष बोंदाडे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक
श्री. श्रोते आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पालकमंत्री यांनी याप्रसंगी
जिल्हा बँकेच्या कृषि कर्ज वितरणाचा आढावा घेतला.
शासनाच्या ऐतिहासिक
कर्जमाफीच्या निर्णयामुळे जिल्हा बँकेचे खातेदार असलेला शेतकरी उत्साहित झाला
असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, जिल्हा बँक ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची बँक
आहे. बँकेच्या अथक परिश्रमामुळे व शेतकऱ्यांनी वसुलीमध्ये दिलेल्या भरपूर
सहकार्यामुळे बँक उर्जितावस्थेकडे वाटचाल करीत आहे. लवकरच बँकेला राज्य सहकारी
बँकेकडून आर्थिक मदत मिळणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने द्यावयाचे 10 हजार
रूपये बँकेमार्फत देण्यात येतील.
कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री यांचा जिल्हा बँक प्रशासन व कर्मचारीवृंद, जिल्हाधिकारी,
उपनिबंधक यांनी सत्कार केला. प्रास्ताविक डॉ. अशोक खरात यांनी केले. ते म्हणाले, बँक
प्रशासनाने बँकेच्या सर्व शाखा संगणकीकृत करण्यासाठी मुख्यालयीन डेटा सेंटर केले
आहे. त्याशिवाय डेबीट/क्रेडीट कार्डचे वाटप करण्यात आले आहे. या कर्जमाफीचा लाभ
बँकेच्या 59 हजार 450 शेतकरी खातेदार सभासदांना होणार आहे. त्यांची 285.94 कोटी
रूपयांची कर्जमाफी झाली आहे. तसेच दीड लाखाचे वरील 1870 शेतकऱ्यांचे 35.98 कोटी
रूपयांची मागणी बँकेची आहे. या शेतकऱ्यांना 28.05 कोटी रूपयांची रक्कम प्रत्यक्षात मिळणार आहे. अशाप्रकारे
बँकेला या कर्जमाफीच्या निर्णयामुळे 317.53 कोटी रूपयांचा लाभ होणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार श्री
इथापे यांनी मानले. कार्यक्रमाला बँकेचे अधिकारी, सहकार विभागाचे अधिकारी,
कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment