Friday, 23 June 2017

news 23.6.2017 DIO BULDANA

खरीप हंगाम 2017 करीता प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू
  • 31 जुलै 2017 पर्यंत शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घ्यावा
  • कर्जदार शेतकऱ्यांना पिक विमा बंधनकारक, कापूस व सोयाबिनला 40 हजार रूपये विमा संरक्षण
  • प्रति हेक्टरी कापसाला 2000, तर सोयाबीनला 800 रूपये हप्ता
  • जिल्ह्यासाठी भारतीय कृषि विमा कंपनी नियुक्त
बुलडाणा, दि. 23 -  खरीप हंगाम 2017 साठी जिल्ह्यात प्रधानमंत्री  पिक विमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेनुसार  पिकांना मिळालेल्या विमा संरक्षणामुळे नैसर्गिक आपत्ती, किड व रोगामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देता येणार आहे. तसेच पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधीत राखून शेतकऱ्यांना नुकसान झाल्यास आर्थिक मदतीची शाश्वती मिळणार आहे. जिल्ह्यातील खरीप ज्वारी, मका, तूर, मुग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, तीळ आणि कापूस पिकाला विमा लागू करण्यात आला आहे. विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होवून आपल्या पिकांचा विमा उतरवून घ्यावा, असे आवाहन राज्याचे कृषि व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले आहे.
     जिल्ह्यातील कर्जदार शेतकऱ्यांना अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी पिक विमा बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडे पट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यासाठी पात्र आहेत. शेतकऱ्यांवरील विम्याच्या हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी दोन टक्के, रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के व नगदी पिकांसाठी 5 टक्के मर्यादीत ठेवण्यात आला आहे. योजनेतील विमा उतरविलेल्या पिकांसाठी जोखिम स्तर 70 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे. या योजनेसाठी जिल्ह्याकरीता भारतीय कृषि विमा कंपनी लि. मुंबई, क्षेत्रीय कार्यालय, स्टॉक एक्सेंज टावर्स, 20 वा मजला, पुर्व खंड, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई ही कंपनी कार्यान्वीयन यंत्रणेला नियुक्त करण्यात आली आहे. अधिसूचीत क्षेत्रात, अधिसुचीत पिक घेणारे (कुळाने अगर भाडे पट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यासाठी पात्र आहेत.  शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव बँकेकडे सादर करण्याची अंतिम तारिख 31 जुलै 2017 पर्यंत आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न बघता जास्तीत जास्त प्रमाणात पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संपर्कासाठी टोल फ्री क्रमांक 18001030061 वर संपर्क साधावा.
-         या नुकसानीला मिळणार विम्याचा लाभ-
पिक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत उत्पादनात येणारी घट, पिक पेरणी पूर्व/लावणी पूर्व नुकसान भरपाई, हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, काढणी पश्चात झालेले नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्ती -मुळे होणारे नुकसान, या बाबींमुळे होणाऱ्या नुकसानीला आता विम्यापोटी भरपाई मिळणार आहे.
-         असा आहे विम्याचा हप्ता
  पिक विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता रक्कम प्रति हेक्टर खालीलप्रमाणे
खरीप ज्वारी : विमा संरक्षीत रक्कम 24 हजार, हप्ता 480 रूपये (प्रति हेक्टर), मका : विमा संरक्षीत रक्कम 25 हजार, हप्ता 500 रूपये, तुर : विमा संरक्षीत रक्कम 30 हजार, हप्ता 600 रूपये, मुग : विमा संरक्षीत रक्कम 18 हजार, हप्ता 360 रूपये, उडीद : विमा संरक्षीत रक्कम 18 हजार, हप्ता 360 रूपये, भुईमुग : विमा संरक्षीत रक्कम 30 हजार, हप्ता 600 रूपये, सोयाबीन : विमा संरक्षीत रक्कम 40 हजार, हप्ता 800 रूपये, तीळ : विमा संरक्षीत रक्कम 22 हजार, हप्ता 440 रूपये आणि कापूस पिकासाठी विमा संरक्षीत रक्कम 40 हजार, हप्ता 2000  रूपये राहणार आहे.
                                                                                *******                  
सामाजिक न्याय दिन कार्यक्रमाचे आयोजन
बुलडाणा दि 23 - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने सोमवार, 26 जून 2017 रोजी सकाळी 11.30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 वाजता समता दिंडीचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी 7 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
   कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याहस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर असणार आहेत. तसेच प्रमुख उपस्थितीत खासदार प्रतापराव जाधव, श्रीमती रक्षाताई खडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे असणार आहे. कार्यक्रमाला विशेष आमंत्रित म्हणून आमदार सर्वश्री गोपीकिशन बाजोरीया, श्रीकांत देशपांडे, चैनसुख संचेती, डॉ. संजय कुटे, डॉ. संजय रायमूलकर, राहूल बोंद्रे, डॉ. शशिकांत खेडेकर, आकाश फुंडकर, हर्षवर्धन सपकाळ व नगराध्यक्षा श्रीमती नजमुन्नीसा मो. सज्जाद असणार आहेत. प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी डॉ.  चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना,  समाज कल्याण सभापती डॉ. गोपाल गव्हाळे तर मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस असणार आहेत. तरी कार्यक्रमास उपस्थित राहून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त अमोल यावलीकर व जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी केले आहे.
*****
पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना जाहीर
·        शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन
·        पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना सहभाग बंधनकारक
·        डाळींब उत्पादक शेतकऱ्यांनी 14 जुलै पर्यंत बँकांना प्रस्ताव सादर करावे

     बुलडाणा, दि.23 : प्रधानमंत्री कृषि पीक विमा योजनेतंर्गत पुर्नरचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना सन 2017-18 करीता जाहीर करण्यात आली आहे. या योजनेतील विम्याचा लाभ मृग बहारामध्ये डाळींब या फळपिकास देण्यास मान्यता देण्यात आली आहे. योजनेद्वारे कमी/ जास्त पाऊस, पावसाचा खंड व सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून निर्धारीत केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देण्यात येते.  फळपीक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखल्या जाते.
  अधिसुचीत क्षेत्रात अधिसुचीत फळपीक घेणारे (कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. जे शेतकरी विविध वित्तीय संस्थेकडून पीक कर्ज घेतात अशा कर्जदार शेतकऱ्यांना योजना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक राहणार आहे. फळपीक निहाय निर्धारीत केलेले हवामान धोके  लागू झाल्यावर नुकसान भरपाई देय राहणार आहे. विमा क्षेत्राचा घटक हा महसूल मंडळ असणार आहे. डाळींब फळपिकाकरीता विम्याची संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी 1 लक्ष 10 हजार असणार असून विमा हप्ता प्रती हेक्टरी 5500  राहणार आहे.  
   बँकेकडून अधिसूचित फळ पिकांसाठी पीक कर्ज मर्यादा मंजूर असलेले शेतकरी यांना तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव बँकांना सादर करण्याची मुदत डाळींब पिकाकरीता 14 जुलै आहे. फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी बँकेशी किंवा क्षेत्रीय अधिकारी असलेल्या तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक यांचेशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे.
-         या महसूल मंडळात डाळींब फळपिकासाठी असणारा विम्याचा लाभ –
चिखली तालुका : पेठ, चिखली, चांधई, हातणी, अमडापूर, शेळगांव आटोळ, बुलडाणा : बुलडाणा व धाड, मोताळा : शेलापूर, बोराखेडी, मोताळा, धा.बढे. खामगांव : हिवरखेड व काळेगांव, दे.राजा : दे.राजा, अंढेरा, दे. मही, तुळजापूर, मेहुण राजा, जळगाव जामोद : जामोद, मलकापूर : नरवेल व जांभुळधाबा.
*********




क्रीडा प्रबोधिनी निवासी व अनिवासी प्रवेश
सरळ प्रवेश व खेळनिहाय चाचण्यांचे आयोजन
            बुलडाणा, दि. 23 : क्रीडा व युवक सेवा संचालनलायाच्या अधिपत्याखालील शिवछत्रपती क्रीडापीठाअंतर्गत राज्यातील 11 क्रीडा प्रबोधिनीमध्ये ॲथलेटिक्स, ज्युदो, शूटींग, सायकलींग, वेटलिफ्टिंग, हॉकी, बॉक्सिंग, जिम्नॅस्टिक, फुटबॉल, कुस्ती, टेबल टेनिस, बॅडमिंटन, जलतरण, आर्चरी, हॅण्डबॉल या खेळातील चाचण्यांचे आयोजन राज्यस्तरावर करण्यात आले असुन चाचण्या आयोजनाचे प्रवेश पध्दतीनुसार आयोजनाचा कार्यक्रम इरविण्यात आला आहे.
   सरळ प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी ॲथलेटिक्स, जलतरण, जिम्नॅस्टिक, ट्रायथलॉन, ज्युदो, बॉक्सिंग, सायकलींग, कुस्ती या खेळ प्रकाराकरीता 28 जून 2017 रेाजी चाचणी असणार आहे. तसेच हॉकी, फुटबॉल, हॅण्डबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, शूटिंग, वेटलिफ्टिंग या खेळ प्रकारासाठी 29 जून 2017 रोजी चाचणी होणार आहे. या दोन्ही प्रकारांमध्ये चाचणी ही शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथे होणार आहे. तर आर्चरी या खेळ प्रकारासाठी 29 जून 2017 रोजी चाचणी प्राचार्य, क्रीडा प्रबोधिनी विभागीय क्रीडा संकुल, अमरावती येथे आयोजित करण्यात आली आहे.
             सरळ प्रवेशाकरीता वरील नमुद खेळातील जे खेळाडु महाराष्ट्राचे रहिवासी आहेत, राष्ट्रीयस्तर सहभागी झालेले आहेत व राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाने विजयी झालेले 17 वर्षाखालील खेळाडू या सरळ प्रवेश प्रक्रीयासाठी पात्र आहेत. सरळ प्रवेश प्रक्रीया करीता जे खेळाडू उपरोक्त नमुद नियमानुसार क्रीडा प्रबोधिनीसाठी मान्य खेळ असलेल्या खेळातील पात्र खेळाडूंनी उपरोक्त नमुद केलेल्या खेळनिहाय तारखेस आवश्यक प्रमाणपत्रासहीत सकाळी 8.00 वाजता चाचणी ठिकाणी उपस्थित राहावे असे शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.
****
परीक्षेत्रीय पोलीस मेळाव्यात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची उत्कृष्ट कागगिरी
·        दोन अधिकारी व 14 पोलीस कर्मचाऱ्यांचा मेळाव्यात सहभाग
·        जिल्ह्याला दुसरा क्रमांक
 बुलडाणा, दि. 23 : दरवर्षीप्रमाणे विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती यांचे मार्गदर्शनाखाली 19 ते 21 जून 2017 दरम्यान 15 व्या अमरावती परीक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संपूर्ण अमरावती विभागातून पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.
   मेळाव्यात पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना व अप्पर पोलीस अधिक्षक संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे जिल्ह्यातील दे.राजा चे ठाणेदार सारंग नवलकर यांचे नेतृत्वात दोन अधिकारी व 14 पोलीस कर्मचारी यांनी मेळाव्यात सहभाग नोंदविला. यामध्ये सहायक पोलीस निरीक्षक शेवानंद वानखडे यांनी फॉरेन्सीक सायन्समध्ये द्वितीय क्रमांक पटकविला आहे. तसेच लेवलिंग ॲण्‍ड पॅकिंग टेस्टमध्ये  तृतीय क्रमांक पटकाविला. पोलीस उपनिरीक्षक दिनकर गोरे यांनी लेबलिंग ॲण्ड पॅकिंग टेस्टमध्ये द्वितीय व फिंगर प्रिंट टेस्टमध्ये तृतीय, पोलीस कॉन्स्टेबल पंकज गिते यांनी कॉम्प्युटर अवरनेस ऑफीस ऑटो टेस्टमध्ये प्रथम, तर ऑब्जेक्टीव्ह टेस्टमध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला. संतोष जमधडे यांनी साहेबराव शिंदे यांनी डॉग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. पोहेकॉ आरिफ व पो.ना प्रशांत शास्त्री यांनी घातपात विरोधी तपासणीमध्ये प्रथम, पोहकॉ सुधाकर तारकसे यांनी निरीक्षण चाचणी स्पर्धेत तृतीय, पोना संजय डोंगरदिवे यांनी निरीक्षण चाचणीमध्ये द्वितीय आणि पोकॉ संदीप मिसाळ यांनी छायाचित्रण स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला.
   या स्पर्धेमध्ये पोना सुनील वाघमारे, संजय भुजबळ, पवन मखमले यांनी संगणक जनजागृती स्पर्धेत, तर पोकॉ संदीप डोंगरे, चंद्रकांत शिंदे, राहुल जाधव यांनी छायाचित्रण स्पर्धेत सहभाग नोंदविला.   संपूर्ण स्पर्धेत बुलडाणा जिल्हा पोलीस दलास द्वितीय क्रमांक मिळाला आहे.

                                                           *****

No comments:

Post a Comment