राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ ते १४ डिसेंबर कालावधीत नागपूर येथे होणार विधानसभा आणि विधानपरिषद विधिमंडळ कामकाज सल्लागार समिती बैठकीत निर्णय

 


मुंबई/ बुलढाणा, दि. ३ :- महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार दि.  ८ ते  रविवार दि. १४  डिसेंबर २०२५  या कालावधीत नागपूरमध्ये होणार आहे.  दि. १३ डिसेंबर शनिवार आणि दि. १४  डिसेंबर रविवार  शासकीय सुट्टीच्या दिवशीही  दोन्ही सभागृहाचे कामकाज घेण्याचा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

 

विधानभवन येथे  विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची  बैठक आयोजित करण्यात आली होती.बैठकीला विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, विधानसभा सदस्य  सर्वश्री सुधीर मुनगंटीवार,दीपक केसरकर, जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव, सुनील प्रभू,अमीन पटेल विधानपरिषद सदस्य अनिल परब, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, विक्रम काळे, सतेज पाटील, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या ऐतिहासिक पर्वानिमित्त  दिनांक २६ मार्च २०२५ रोजी  विधानसभेत भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल' या विषयावर  सभागृहात चर्चा झाली होती. या वेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस  यांनी  केलेल्या भाषणाचे पुस्तक स्वरूपातील संकलन महाराष्ट्र विधिमंडळ वि.स. पांगे संसदीय प्रशिक्षण केंद्राच्या पुढाकारातून करण्यात आले आहे. हा पुस्तक प्रकाशन सोहळा मंगळवार दिनांक ९ डिसेंबर २०२५ रोजी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात येणार आहे असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बैठकीत सांगितले.

0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या