७ डिसेंबरला नागपूर येथे होणार गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागम स्मृती सोहळा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा

 



         मुंबई/ बुलढाणा, (जिमाका) दि. 3 :  हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त राज्य सरकारतर्फे नागपूर, नवी मुंबई आणि नांदेड येथे भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. नागपूरमध्ये ७ डिसेंबर रोजी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णु देव सहाय प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

              या पार्श्वभूमीवर नागपूर आणि अमरावती विभागातील सुरू असलेल्या विविध कार्यक्रम, प्रचार उपक्रम व व्यवस्थापनाची आज अल्पसंख्याक विकास व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला बुलढाणा येथून निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, शिक्षणाधिकारी विकास पाटील, उप शिक्षणाधिकारी अनिल देवकर, प्र. जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड, एसटी महामंडळाचे अधिकारी आदी दूरदृष्ट प्रणालीद्वारे उपस्थित होते.
               राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले की, प्रभातफेरी, वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा, रथयात्रा अशा विविध जनजागृती उपक्रमांच्या माध्यमातून गावोगावी आणि समाजातील सर्व स्तरांपर्यंत कार्यक्रमाची माहिती पोहोचवण्यात यावी. कार्यक्रमाला राज्यासह देशभरातून सुमारे तीन लाख भक्तांची उपस्थिती अपेक्षित असल्याने त्यांच्या निवास, भोजन, वाहतूक व सुरक्षेच्या तयारीचा देखील त्यांनी सविस्तर आढावा घेतला.
                राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांनी सांगितले की, समितीच्या संकेतस्थळावर तसेच पत्रकांवर क्यूआर कोड स्कॅनरची सुविधा देण्यात आली असून, त्याद्वारे कार्यक्रमाची सर्व माहिती, स्थळापर्यंतचे मार्गदर्शन आणि उपलब्ध सुविधांची अद्ययावत माहिती थेट पाहता येणार आहे.

                या बैठकीस राज्य पंजाबी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष व प्रदर्शनी समितीचे अध्यक्ष मलकित सिंग बल, अवर सचिव विशाखा आढाव यांच्यासह नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम येथील जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी, माहिती व जनसंपर्क विभागाचे अधिकारी तसेच समितीचे नोडल अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.


०००

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या