Thursday, 27 April 2023

DIO BULDANA NEWS 27.04.2023

 



सलग दुसऱ्या दिवशी अवैध दारूविरुद्ध 12 गुन्हे

*दोन लाखाचा मुद्देमाल जप्त

बुलडाणा, दि. 27 : राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी, दि. 26 एप्रिल रोजी अवैध दारूविक्रीविरूद्ध 12 गुन्हे नोंद केले. सलग दुसऱ्या दिवशी अवैध दारूविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. यात दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मंगळवारी, दि. 25 एप्रिल रोजी अवैध हातभट्टीवर कारवाई करून एक लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत्‍ 12 वारस गुन्हे नोंदवून 12 आरोपींसह हातभट्टी 228 लिटर, रसायन 5 हजार 156 लिटर, देशी मद्य .90 लिटर, विदेशी मद्य 1.24, असा 2 लाख 8 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध मद्य विक्री करणाऱ्या चिखली तालुक्यातील सावखेड भोई येथील आशिर्वाद ढाबा आणि अशोका ढाबा येथे मद्यसेवन करणाऱ्या दोन ढाबा मालक आणि सहा ग्राहकांवर म. दा. का. १९४९ चे कलम ६८ व ८४ नुसार कार्यवाही करण्यात आली.

राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १ एप्रिल २०२३ ते दि. 27 एप्रिल २०२३ या कालावधीत एकूण 101 गुन्हे नोंदवून 97 आरोपी आणि ५ वाहनासह बिअर ८७ लिटर, देशी मद्य ३८५ लिटर, हातभट्टी 947 लिटर, विदेशी मद्य १३७ लिटर आणि सडवा 22 हजार 481 लिटर असा 13 लाख 48 हजार 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जिल्ह्यातील नागरीकांनी मद्यसेवन परवाना प्राप्त करुन केवळ शासनमान्य अबकारी मद्य विक्री अनुज्ञप्त्यांमधूनच मद्य खरेदी आणि सेवन करावे. तसेच आपल्या परिसरात अवैध मद्य विक्री अथवा बनावट मद्य निर्मिती आढळल्यास विभागास टोल फ्री क्रमांक १८००८३३३३३ वर किंवा व्हॉटॲप क्रमांक ८४२२००११३३ वर किंवा excisesuvidha.mahaonline.gov.in या पोर्टलवर तात्काळ माहिती द्यावी.

जिल्ह्यातील किरकोळ व ठोक मद्य अनुज्ञाप्तीधारक यांच्या अनुज्ञाप्तीमध्ये बनावट मद्य आढळुन आल्यास त्यांची अनुज्ञाप्ती कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल. तसेच मद्य बाळगताना मद्य सेवन, मद्य वाहतूक करताना अथवा मद्य विक्री करताना किंवा आपल्या जागेचा वापर अवैध ढाबा चालविण्यासाठी दिल्यास त्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी कळविले आहे.

00000

टपाल जीवन विमा योजनेसाठी एजंट भरती

*इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 27 : महाराष्ट्र आणि गोवा राज्यात टपाल जीवन विमा आणि ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेसाठी थेट एजंटच्या भरतीकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्जासह दि. 10 मे 2023 रोजी सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत डाकघर कार्यालयात उपस्थित राहावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

एजंटसाठी वय वर्षे 18 ते 50 दरम्यान असावे, शैक्षणिक पात्रता किमान दहावी पास असावी, बेरोजगारीत किंवा स्वयम रोजगारीत शिक्षित युवा, माजी जीवन सल्लागार, इन्शुरन्स कंपनीचे माजी एजंट, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, महिला मंडळ सेविका, सेवा निवृत्त शिक्षक व इतर उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, परस्पर संबंधाचे कौशल्य, जीवन विम्याबाबतचे ज्ञानाच्या आधारावर केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारास राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र अथवा किसान विकास पत्रच्या स्वरुपात पाच हजार रुपयांची अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवावी लागेल.

प्रशिक्षण पूर्ततेनंतर डाक विभागाकडून तात्पुरता परवाना देण्यात येईल. आयआरडीएची परवाना परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर कायम परवान्यामध्ये रुपांतरीत केला जाईल. नियुक्तीनंतर आयआरडीएची परवाना परीक्षा तीन वर्षाच्या आत उत्तीर्ण करणे अनिवार्य राहिल. दहावी किंवा बारावी बोर्डाचे प्रमाणपत्र, जन्मतारखेचे प्रमाणपत्र, पॅनकार्ड झेरॉक्स, संगणक ज्ञानाचे प्रमाणपत्र अर्जासह असणे आवश्यक आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना टपाल विभागाने वेळोवेळी ठरविलेले कमिशन दिले जाईल. याबाबत अधिक माहितीसाठी डाक कार्यालयास संपर्क साधावा किंवा maharashtrapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000000





जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची मानसिक आरोग्य तपासणी

बुलडाणा, दि. 27 : जिल्हा परिषदेच्या प्रांगणात जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांसाठी बुधवारी, दि. 26 एप्रिल 2023 रोजी मानसिक आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.

शिवाजी सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम. एम. राठोड, मानसोपचार तज्‍ज्ञ डॉ. विश्वास खर्चे, डॉ. महेश बाहेकर, सायकोलॉजिस्ट सिद्धार्थ जाधव, मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता हरिदास अंभोरे उपस्थित होते.

यावेळी मानसिक आजाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यात जीवनातील मानसिक ताण खूप वाढले आहे. मानवी जीवन अत्यंत तणाव आणि चिंताग्रस्त झाले आहे. आपल्याला अनेक समस्यांना बऱ्यावाईट गोष्टींना सामोरे जावे लागते. अशा गोष्टी वारंवार घडल्यास मनावर खूप दडपण येते, चिंता व बैचेनी वाढू लागते. यामधूनच अनेक प्रकारच्या मानसिक रोगामध्ये प्रचंड वाढ होत आहे. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य जपणेही खूप गरजेचे आहे. झोप न येणे, मनात उदास वाटणे, कामात मन न लागणे, भूक न लागणे,आत्मविश्वास कमी होणे, चिडचिड होणे, डोके भारी वाटणे, आत्महत्येचे विचार मनात येतात. याप्रकारचे मानसिक आजारी हे आपल्या शेजारी आढळल्‍यास त्यांना उपचार आणि मार्गदर्शन करु शकतो, अशी माहिती देण्यात आली.

मानसिक आजारी नागरिकांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत विविध उपक्रम चालविण्यात येतात. याबाबत अधिक माहितीकरीता जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात असलेल्या बाह्यरुग्ण खोली क्र. 12 मध्ये संपर्क साधावा. याठिकाणी सकाळी 8.30 ते 1 किंवा मानसिक आरोग्य विनामुल्य समुपदेशन हेल्पलाईन नंबर 14416 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी मनोविकृती परिचारीका पुजा मधुकर वानखेडे, केस रजिस्टर चंद्रकांत जामहोड उपस्थित होते.

000000

मत्स्य उद्योजकांची रविवारी बैठक

बुलडाणा, दि. 27 : मत्स्यव्यवसायाबाबत माहिती देण्यासाठी रविवार, दि. 30 एप्रिल रोजी सकाळी 9.45 वाजता व्हीडीओ कॉन्फरंस घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील मच्छिमार, मत्स्यपालक, मत्स्यउद्योजकांनी उपस्थित राहावे, असे अवाहन करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सन 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षाकरिता राबविण्यात येत आहे मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा शाश्वत विकास व जबाबदार विकासाद्वारे नीलक्रांती घडवून आणणे हे या योजनेचा मुख्य उद्देश आहे. मच्छिमार, मत्स्यपालक आणि इतरामध्ये विभागाच्या उपक्रमांबाबत माहिती पोहचविणे आणि जनजागृती करणे या हेतूने सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, बसस्टँडसमोर, बुलढाणा आणि शासकीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र, कोराडी, ता. मेहकर  येथे व्हीडीओ कॉन्फरंस आयोजित करण्यात आली आहे. यावेळी जिल्ह्यातील मच्छिमार, मत्स्यपालक, मत्स्यउद्योजकांनी उपस्थित राहावे, असे अवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सु. ग. गावडे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment