मंत्री संजय राठोड यांचा आज दौरा
बुलडाणा, दि.
6 : अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड शनिवार, दि. 8 एप्रिल
2023 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
त्यांच्या दौऱ्यानुसार, श्री. राठोड यांचे सकाळी 10.30 वाजता
मोताळा येथील हेलीपॅड येथे आगमन होईल. त्यानंतर ते सकाळी 10.45 वाजता नळकुंड तांडा
येथे संत सेवालाल महाराज मंदिर भुमिपुजन व सांस्कृतिक प्रबोधन मेळाव्यास उपस्थित
राहतील. कार्यक्रमानंतर सकाळी 11.45 वाजता मोताळा हेलिपॅडवरून जालनाकडे प्रयाण करतील.
000000
राज्य उत्पादन शुल्कची अवैध मद्य निर्मितीवर कारवाई
बुलडाणा, दि. 6 : राज्य उत्पादन शुल्क
विभागाने मंगळवार, दि. 4 एप्रिल आणि बुधवार, दि. 5 एप्रिल रोजी अवैध मद्य निर्मिती
आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली. बुलडाणा शहरात भीलवाडा, कैकाडी पुरा आणि
बुलडाणा ग्रामीण परिसरातील देऊळघाट, पाडळी आणि येळगाव येथे ही कारवाई करण्यात आली.
अवैध दारू धंद्यावर छापे टाकुन एकुण 13 गुन्हे नोंदवून हातभट्टी दारू 188 लिटर,
रसायन 4 हजार 691 लिटर असा मुद्देमाल नष्ट केली. यात 13 आरोपींसह 1 लाख 27 हजार
905 रूपयांचा मुद्देमाल आढळून आला.
राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक
भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 1 एप्रिल 2022 ते दि. 31 मार्च 2023
या कालावधीत जिल्ह्यात अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतुकीचे एकुण 1 हजार 300
गुन्हे नोंदविण्यात आले आहे. यात 1 हजार 209 वारस गुन्ह्यासह 1 हजार 257 आरोपी आणि
102 वाहनासह एकुण 1 कोटी 80 लाख 69 हजार 890 रुपयांचा मुद्देमाल जप्त
करण्यात आला.
नागरीकांनी मद्यसेवन परवाना प्राप्त
करुन केवळ शासनमान्य अबकारी मद्य विक्री अनुज्ञप्त्यांमधूनच मद्य खरेदी आणि सेवन
करावे. अवैध मद्य विक्री करणाऱ्या ढाबामालक आणि तेथे अवैध मद्यसेवन करणाऱ्या
ग्राहकांवर कारवाई करण्यात आली आहे. यापुढे ही अशा कारवाई सुरू राहणार आहे. आर्थिक
वर्षात जिल्ह्यास 10 कोटी 31 लाख रूपयांचे महसुली उद्दिष्ट दिले होते.
त्याअनुषंगाने या जिल्ह्याने 10.70 कोटींच्या महसुली उद्दिष्टाची पुर्तता केली
आहे.
आपल्या परिसरात अशी अवैध मद्य विक्री
अथवा बनावट मद्य निर्मिती आढळल्यास टोल फ्री क्रमांक 18002339999वर किंवा व्हॉटसॲप
क्रमांक 8422001133 किंवा excisesuvidha.mahaonline.gov.in या पोर्टलवर
तात्काळ माहिती कळवावी. जिल्ह्यातील किरकोळ आणि ठोक मद्य अनुज्ञप्तीधारक यांच्या
अनुज्ञप्तीमध्ये बनावट मद्य आढळून आल्यास त्यांची अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द
करण्यात येईल. तसेच मद्य बाळगताना मद्यसेवन, मद्य वाहतूक करताना अथवा मद्यविक्री
करताना किंवा आपल्या जागेचा वापर अवैध ढाबा चालविण्यासाठी दिल्यास त्यावर
महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे, असे
कळविण्यात आले आहे.
00000
आरसेटीमध्ये दुग्धव्यवसाय, गांडूळ खत निर्मिती प्रशिक्षण
बुलडाणा, दि. 6 : बुलडाणा येथील
सेंट्रल बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेतर्फे दहा दिवसीय दुग्धव्यवसाय
आणि गांडूळ खत निर्मिती प्रशिक्षण पार पडले. यामध्ये जिल्ह्यातील
१८ ते ४५ वयोगटातील पुरुषांनी सहभाग नोंदविला.
प्रशिक्षण कार्यक्रमात मनिषा देव
यांनी उद्योजकीय विकास कार्यक्रमातील आईस ब्रेकिंग, ध्येय निश्चिती, वेळेचे
व्यवस्थापन, उद्योजकीय सक्षमता, बँकेची माहिती, विविध कर्ज योजना आणि शासकीय
योजना, आर्थिक साक्षरता याबाबत माहिती दिली. ऋषीकुमार फुले यांनी आणि दुग्धव्यवसाय
व गांडूळखत निर्मितीबाबत जातीची निवड, जनावरांचे व्यवस्थापन, जनावरांचे आरोग्य
व्यवस्थापन, गाई, म्हशीमधील मुक्तसंचार गोठा पद्धती, स्वच्छ दूध उत्पादन आणि
मार्केटींगची माहिती दिली.
नॅशनल
अॅकॅडमी ऑफ रूडसेट यांच्याकडून नॅशनल कंट्रोलर प्रिती पांडे यांनी प्रशिक्षण
वर्गाचे मुल्यांकन केले. प्रशिक्षणासाठी संस्थेच्या प्रशिक्षिका मनिषा देव,
स्वप्नील गवई यांनी विशेष परिश्रम घेतले.
000000
गोंधनापूर येथे शेळीपालन प्रशिक्षण
बुलडाणा, दि. 6 : सेंट्रल बँक ग्रामीण
स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या गोंधनापूर, ता. खामगाव येथे दहा दिवसीय शेळीपालन
प्रशिक्षण घेण्यात आले. यात गोंधनापूर येथील 35 महिलांनी सहभाग नोंदविला.
प्रशिक्षणात
ऋषीकुमार फुले यांनी शेळीपालन आणि विषयाला चारा व्यवस्थापन, शेळी, करडांची
विक्रीची किंमत काढणे, जनावरांची खुरे काढणे, औषध उपचार करणे यासाठी प्रकल्प भेट
देण्यात आली. मनिषा देव यांनी उद्योजकीय ज्ञानाचे महत्त्व पटवून दिले.
प्रशिक्षणाला राज्य संचालक अशोक
चव्हाण यांनी गावपातळीवरील प्रशिक्षण आणि संस्थेत निवासी प्रशिक्षण यातील फरक
सांगितला. महिलांना स्वयंरोजगाराचे महत्त्व सांगून त्यांनी स्वतःचे अस्तित्व
निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणासाठी प्रमिला नवथडे, आयसीआरपी
श्रद्धा जोशी, ज्योती केनेकर यांनी पुढाकार घेतला.
00000
जात वैधता प्रमाणपत्रासाठी सामाजिक समता शिबिर
बुलडाणा, दि. 6 : जिल्हा जात
प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर
केलेल्या विद्यार्थ्यांच्या त्रृटी पुर्ततेसाठी दि. 20 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता
सामाजिक समता शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
अकरावी, बारावी विज्ञान शाखेत शिकत
असलेले विद्यार्थी, व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेले विद्यार्थी, सीईटी
देणारे डिप्लोमा तृतीय वर्षात शिकत असलेले विद्यार्थी तसेच ग्राम पंचायत निवडणुकीत
निवडून आलेले उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीचे ऑनलाईन अर्ज सादर केले
आहे. मात्र अर्जामध्ये जाती दावा आणि वंशावळीनुसार शालेय, महसुली पुरावे सादर
केलेले नाही. त्यामुळे त्यांचे अर्ज त्रुटी मध्ये आहे. अर्ज केलेल्यांनी त्रुटींची
पूर्तता करण्यासाठी दि. 20 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत
जिल्हा जात प्रमाणपत्र समितीच्या कार्यालयातील सामाजिक समता शिबिरात उपस्थित राहून
त्रृटीची पुर्तता करावी, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र समितीचे संशोधन अधिकारी
मनोज मेरत यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment