Thursday, 20 April 2023

DIO BULDANA NEWS 20.04.2023

 शनिवारी नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन

बुलडाणा, दि. 20 : समता पर्व निमित्ताने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयातर्फे नवउद्योजकांसाठी शनिवार, दि. 22 एप्रिल 2023 रोजी उद्योजकता मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

 विविध योजनांची माहिती आणि प्रसिद्धी व्हावी यासाठी शनिवार, दि. 22 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात स्टॅंड अप इंडिया योजनेंर्तगत हे शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबीराचा अनुसूचित जाती प्रवर्गातील नवउद्योजकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

00000

पंडीत दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

*दि. 21 ते 24 एप्रिल 2023 या कालावधीत ऑनलाईन मुलाखती

बुलडाणा, दि. 20 : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे पंडीत दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन दि. 21 ते 24 एप्रिल 2023 या कालावधीत करण्यात आले आहे.

सदर रोजगार मेळाव्यामध्ये जबील सर्किट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे, मकापेरी एन्व्हायरमेंटल प्रायव्हेट  लिमिटेड   पुणे यासारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी रोजगार मेळाव्यासाठी पदे अधिसुचित केली आहेत. सदर कार्यालयाकडे नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याद्वारे गरजू व रोजगार इच्छुक उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेऊन त्यांची प्राथमिक निवड करतील. तसेच जिल्ह्यातील उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या mahaswayam.gov.in आणि ncs.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेल्या दहावी आणि बारावी पास पुरुष, महिला उमेदवारांनी आपले सेवासोजन कार्डचा आयडी आणि पासवर्डचा वापर करुन आपले लॉगइनमधून ऑनलाईन अर्ज करुन यात सहभागी व्हावे. या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरीता कार्यालयात येण्याची गरज नाही. उमेदवार जेथे असतील त्याच ठिकाणावरुन आपल्या सेवायोजन कार्डचा युझर आयडी आणि पासवर्डचा उपयोग करुन आपल्या लॉगइनमधून ऑनलाईन रोजगार मेळाव्यात ऑनलाईन पद्धतीने सहभागी होऊ शकतील.

पात्र उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा जास्त पदाकरिता अर्ज करु शकतात. दि. 21 ते 24 एप्रिल दरम्यानच्या मेळाव्याबाबत अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा या कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधावा, तसेच अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयाचा दूरध्वनी 07262-242342, भ्रमणध्वनी क्रमांक 7447473585 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे. 

00000

दहा वर्षे पूर्ण आधारकार्ड अपडेट करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 20 : दहा वर्षे पूर्ण झालेले आधारकार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. त्यामुळे आधार नोंदणी करुन दहा वर्षे कालावधी पूर्ण झाला आहे. असे आधारकार्ड अपडेट करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आधारकार्ड काढल्यानंतर कालांतराने रहिवासी पत्ता, बोटांचे ठसे, नावातील चुका, मोबाईल क्रमांक यासह अनेकदा एकापेक्षा अधिक आधारकार्ड नोंदणी झालेले असते. आधारकार्डला संबंधितांची माहिती नोंद असल्याने यासर्व नोंदीचे अद्यावतीकरण होणे आवश्यक असते. त्यासाठी दहा वर्षांनी आधार ईकेवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

आधारकार्ड काढून दहा वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे, त्यांनी आपल्या नजीकच्या आधार नोंदणी केंद्रावर जावून कागदपत्रे सादर करावी. आधारकार्ड अपडेट केले नसल्यास भविष्यात आधार नोंदणी स्थगित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी कागदपत्रे अद्यावत करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पी. तुम्मोड यांनी केले आहे.                                                 0000000

वसुंधरा दिनानिमित्त शनिवारी सायकल रॅली

बुलडाणा, दि. 20 : जागतिक वसुंधरा दिनानिमित्त शनिवारी, दि. 22 एप्रिल 2023 रोजी सकाळी आठ वाजता सायकल रॅली काढण्यात येणार आहे. सामाजिक वनीकरण परिक्षेत्र, वनपरिक्षेत्र अधिकारी आणि पर्यावरण मित्र मंडळाच्या वतीने राष्ट्रीय हरित सेना वार्षिक उपक्रमांतर्गत ही रॅली काढण्यात येणार आहे.

ही सायकल रॅली गांधी भवन पासून सुरु होणार आहे. मलकापूर मार्गावरील आयटीआय ते एचपी गोडाऊन समोरुन बोथरा हॉस्पीटल ते संगम चौक आणि विश्राम भवन समोरुन ते हॉटेल राधिका, चिंचोले चौक ते सर्क्युलर रोड, त्रिशरण चौक ते राणीबाग वनविभाग, बुलडाणा येथे रॅलीचा समारोप होणार आहे. रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. ह. पी. तुम्मोड यांच्या हस्ते होणार आहे. यात नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन सामाजिक वनीकरण परिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment