Tuesday, 18 April 2023

DIO BULDANA NEWS 18.04.2023

 




शासकीय योजनांची जत्राचे काटेकोर नियोजन करावे

-जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड

बुलडाणा, दि. 18 : जिल्ह्यातील 75 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी शासकीय योजनांची जत्रा हा उपक्रम जिल्हाभर राबविण्यात येणार आहे. लाभार्थ्यांच्या सोयीसाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर कार्यक्रम आयोजित करावा, या आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचे काटेकोरपणे नियोजन करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी दिले.

शासकीय योजनांची जत्रा या उपक्रमातून शासनाच्या विविध विभागाच्या योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. यासाठीच्या नियोजनाबाबत घेण्यात आलेल्या बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, उपवनसंरक्षक अक्षय गजभिये आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी शासकीय योजनांची जत्रा उपक्रमाच्या अनुषंगाने नियोजन करताना सुरुवातीला योजनानुसार लाभार्थ्यांची निवड करण्यात यावी. उन्हाळ्याचे वातावरण लक्षात घेता जिल्हा आणि तालुका अशा दोन स्तरावर हा उपक्रम राबविण्यात यावा. कार्यक्रम घ्यावयाचे ठिकाण निश्चित करण्यात यावे. लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या लाभाचे कार्यक्रम शक्यतो सकाळीच घेण्यात यावे. याठिकाणी पिण्याचे पाणी आणि वैद्यकीय सुविधा ठेवण्यात यावी. कार्यक्रमाच्या ठिकाणी लाभार्थ्यांच्या मदतीसाठी राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांची मदत घ्यावी. तसेच लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी अधिकाधिक स्टॉल लावण्यात यावे.

यावेळी कृषि विभाग, अनुदान योजना, कर्ज योजना, लाभार्थ्यांची नोंदणी, विविध प्रमाणपत्र, वैयक्तिक लाभ, मदतीच्या योजनांमधून देण्यात येणारे लाभ आदींबाबत नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. जिल्हास्तरावरील कार्यक्रमात जवळच्या तालुक्यातील लाभार्थी आणण्यात यावे. त्यांची येण्याजाण्याची, तसेच लाभ मिळण्याची व्यवस्था करण्यात यावी. शासनाने महत्वाच्या योजनांची यादी दिलेली असली तरी आपआपल्या विभागातील लाभार्थींची निवड करून त्यांना या कार्यक्रमात लाभ देण्यात यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.

000000

मंगळवारपासून उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण, व्यक्तिमत्व विकास शिबीर

बुलडाणा, दि. 18 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे दि. 25 एप्रिल ते दि. 5 मे 2023 दरम्यान उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण आणि व्यक्तिमत्व विकास शिबीर घेण्यात येणार आहे.  जिल्हा क्रीडा संकुल, जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल, तालुका क्रीडा संकुल, एडेड हायस्कूल, जिजामाता महाविद्यालय येथे सकाळी 6 ते 8.30 आणि सायंकाळी 5.30 ते 7.30 या दोन सत्रामध्ये हे शिबीर होणार आहे.

शिबीरात क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे, विविध एकविध खेळ संघटनेचे तज्‍ज्ञ मार्गदर्शक, राष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक प्रशिक्षण देतील. मैदानी खेळाचे अनिल इंगळे, विजय वानखेडे, गणेश जाधव, समाधान टेकाळे, हर्षल काळवाघे, हॅण्डबॉलसाठी मनोज श्रीवास, प्रणव काठोके, कबड्डीचे सागर गावंडे, अभय डोंगरदिवे, आकाश मोरे, खो-खोसाठी सागर उबाळे, निलेश शिंदे, आर्चरीचे चंद्रकांत इलग, फुटबॉलचे फव्वाद अहमद, राहुल औशलकर, सुनिल जोशी, जिम्नॅस्टीकचे रवी भगत, संजय चितळे, कराटेसाठी अरविंद अंबुसकर, बॉक्सिंगचे महम्मद सुफीयान, योगाचे प्रा. डॉ. बाबाराव सांगळे, संदीप पाटील, ॲरोबिक्सचे प्रा. विद्या वानखेडे मार्गदर्शन करणार आहे. खेळांचे तसेच व्यक्तिमत्व विकास शिबीरांतर्गत वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला, योगा, एरोबिक्स, लाठीकाठी, मर्दानी खेळ, सर्पमित्र, दंतचिकित्सा, जंगल सफरी, खेळ दुखापत आणि प्रथमोपचार, आहारविषयक माहिती, कार्डीओ अरेस्ट आदीबाबत माहिती तज्‍ज्ञ मार्गदर्शक देणार आहे.

प्रशिक्षण शिबीरात सहभागी होण्यासाठी कार्यालयात संपर्क साधून नोंदणी करुन, अर्ज प्राप्त करुन घ्यावा. तसेच दि. 25 एप्रिल 2023 रोजी जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलढाणा येथे शिबीरात सहभागी होण्यासाठी सकाळी 6 वाजता उपस्थित रहावे लागणार आहे. सदर शिबीर विनामुल्य असून, या शिबीरात बुलडाणा शहरातील 10 ते 17 वर्षे वयोगटातील मुले-मुली सहभागी होऊ शकतील. शिबीरात नियमित उपस्थित आणि शिबीर यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहितीकरीता अनिल इंगळे, संपर्क क्रमांक 9970071172 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

00000



अनुसूचित जाती, जमाती कायद्याची कार्यशाळेत माहिती

बुलडाणा, दि. 18 : समता पर्व निमित्ताने समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयातर्फे आज दि. 18 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजता अनुसूचित जाती, जमाती कायदा 1989 ची माहिती देण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली.

कार्यशाळेत जिल्हा न्यायालयाचे सचिव हेमंत भुरे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून कायदेविषयक सल्लागार पी. आर. सानप उपस्थित होते. यावेळी नागरी हक्क संरक्षण विभागाचे  दिपक इंगळे , सुभाष सोळंके, शांताराम शिंदे, श्री. भवते, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक श्री. सावळे, राजू टेकाळे, श्री. बोरले, राहूल बटुकर, पोलिस पाटील संघटनेचे भारत शिंदे, राजेश रिंढे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक प्रदिप धर्माधिकारी, नागरी हक्क संरक्षण शाखेचे प्रमुख प्रविण पांडे उपस्थित होते.

श्री. भुरे यांनी अनुसूचित जाती, जमाती अधिनियम 1989 कायद्याचे महत्त्व सांगितले. डॉ. अनिता  राठोड यांनी प्रास्ताविक केले. सतिश बाहेकर यांनी सूत्रसंचालन केले. रवि काळवाघे यांनी आभार मानले.

00000

कार्यालयाला इमारत भाड्याने देण्यासाठी

आवेदन सादर करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 18 : नव्याने निर्माण झालेल्या कार्यालयासाठी मलकापूर-शेगांव बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयासाठी भाड्याने इमारत आवश्यक आहे. यासाठी इच्छुकांनी आवेदन सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बाल विकास प्रकल्प अधिकारी, बुलडाणा, मलकापूर-शेगाव या मलकापूर शहरामध्ये बसस्थानक ते रेल्वे स्टेशन रोड परिसरामध्ये सर्व सोयीसुविधायुक्त इमारत आवश्यक आहे. इमारत ही मुख्य रस्त्याला लागून असावी, अंदाजित क्षेत्र फळ 1200 ते 1500 चौरस फूटपर्यंत बांधकाम असलेली इमारत शासकीय कार्यालयासाठी भाड्याने घेणे आहे. इच्छुक घरमालकांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प, नगर परिषद शाळेसमोर, एकता नगर, बुलडाणा या पत्त्यावर संपूर्ण कागदपत्रासह बंद लिफाफ्यामध्ये दि. 24 एप्रिल 2023 पर्यंत आवेदन करावे. सदरील जागेचे भाडे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी ठरवून दिलेल्या निकषानुसार अदा करण्यात येणार असल्याचे बाल विकास प्रकल्प अधिकारी मं. मा. पांचाळ यांनी कळविले आहे.         

000000000

रोजंदारी कर्मचाऱ्यांसाठी आवेदनपत्र सादर करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 18 : शासकीय अध्यापक महाविद्यालयात दोन पदे कंत्राटीपद्धतीने भरण्यात येणार आहे. यासाठी नोंदणीकृत संस्थांनी आवेदनपत्र सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शासकीय अध्यापक महाविद्यालय करिता आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये दि. 1 मे 2023 ते एप्रिल 2024 या कालावधीकरीता सफाई कामगार 1 आणि रात्रपाळी पहारेकरी 1 असे एकूण 2 पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. याकरिता विहित आवेदन शासनमान्य कंत्राटदार, पंजीकृत बेरोजगारांच्या सेवा सहाकारी संस्था, लोकसेवा केंद्राकडून द्विलिफाफा पद्धतीने मोहोरबंद निविदा मागविण्यात येत आहे. महाविद्यालयाकडे प्रति शेड्यूल 500 रूपयांचा भरणा करुन दि. 19 एप्रिल 2023 ते दि. 21 एप्रिल 2023 पर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मिळू शकतील. दि. 24 एप्रिल 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत मोहोरबंद निविदा स्विकारण्यात येतील. मोहोरबंद निविदा दि. 27 एप्रिल 2023 रोजी दुपारी 12 वाजाता प्राचार्यांच्या दालनात उघडण्यात येतील. त्यावेळी संबंधित निविदाधारकांनी प्राचार्यांच्या दालनात दुपारी 12 वाजता उपस्थित राहावे. यासंबंधी अंतिम निर्णय प्राचार्य यांचे राहील. सदर माहिती महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर gcebedbuldan.org.in उपलब्ध आहे.

00000

 

No comments:

Post a Comment