Thursday, 13 April 2023

DIO BULDANA NEWS 13.04.2023

 नवोदयच्या सहावीसाठी निवड परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध

*29 एप्रिलला 37 केंद्रावर परीक्षा

बुलडाणा, दि. 13 : जवाहर नवोदय विद्यालयाच्या सहावी करीता निवड चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले. शनिवार, दि. 29 एप्रिल 2023 रोजी जिल्ह्यातील 37 केंद्रावर ही परीक्षा होणार आहे.

सहावी करीता निवड चाचणी परीक्षा शनिवार, दि. 29 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11.15 ते 1.30 यादरम्यान जिल्ह्यातील एकूण 37 परीक्षा केंद्रावर होणार आहे. परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांनी सकाळी 10.30 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. या परीक्षेचे परीक्षा प्रवेश पत्र cbseitms.rcil.gov.in/nvs/AdminCard/AdminCard संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

परीक्षेशी संबंधित शाळेतील मुख्याध्यापक, पालक, विद्यार्थी यांनी परीक्षेचे प्रवेश पत्र डाऊनलोड करावे. तसेच दि. 29 एप्रिल 2023 रोजी प्रवेश परीक्षेकरीता वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आर. आर. कसर यांनी केले आहे.

000000





विधवा, विधुर मेळाव्यात व्यसनमुक्तीची शपथ

बुलडाणा, दि. 13 : समता नगर येथे आयोजित विधवा, विधुर, घटस्फोटीत परिचय मेळाव्यात उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ घेतली. मानसोपचार व व्यसनमुक्ती तज्ज्ञ डॉ. लता भोसले-बाहेकर यांनी तंबाखूमुक्तीची शपथ दिली.

यासाठी जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. वसंतराव चिंचोले, प्रा. जगदेवराव बाहेकर, डॉ. मनोहर तुपकर, सुनिल सपकाळ, गणेश निकम, प्रा. शाहिना पठाण, प्रतिभा भुतेकर, अश्विनी सोनावणे उपस्थित होते.

मेळाव्यात महिलांनी पुनर्विवाह करताना जोडीदार हा निर्व्यसनी असावा, असे आग्रही प्रतिपादन केले. त्यानुषंगाने डॉ. लता भोसले-बाहेकर आणि अर्चना आराख यांच्या चमूने उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ दिली.

जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. भुसारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण जिल्हाभर गेल्या पाच वर्षापासून हृदयरोग, मधुमेह, अर्धांगवायू, कर्करोग या आजारांसाठी कारणीभूत तंबाखू व्यसनावर मार्गदर्शन, प्रशिक्षण, मुख तपासणी, मुख कर्करोगावरील मोफत शस्रक्रिया आदी उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयात जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष ओपीडी नंबर 33 व 34 येथे कार्यरत आहे. नागरिकांनी तंबाखू मुक्तीसाठी मोफत टोल फ्री क्रमांक क्र. 1800112356 व मुखस्वास्थासाठी मोफत टोल फ्री क्रमांक क्र. 1800112032 यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

No comments:

Post a Comment