शेतकऱ्यांना सलोखा योजनेतून मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क माफी
*जमिन अदलाबदलीसाठी मोहिम
*नाममात्र एक हजारात होणार दस्तनोंदणी
बुलडाणा, दि. 5 : शेतजमिनीचा ताबा आणि वहिवाटीबाबत शेतकऱ्यातील आपसातील वाद मिटविण्यासाठी सलोखा योजना उपयुक्त ठरणार आहे. परस्परांमधील शेतजमिनीचा ताबा परत मुळ मालकाकडे करण्यासाठी आता सलोखा योजनेतून नाममात्र एक हजार रूपयांत दस्त नोंदणी होणार आहे.
शेतजमिनीच्या वहिवाटीवरून होणारे वाद वाढत आहे. यावर उपाययोजना म्हणून हे वाद मिटविणे आणि समाजात सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी ही योजना प्रभावी ठरणार आहे. यामुळे एकमेकांमधील सौख्य आणि सौहार्द वाढीस लागण्यासाठी एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे किंवा दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमिनधारकांचे अदालाबदल दस्तांसाठी नोंदणी शुल्क एक हजार रूपये नाममात्र आकारण्याबाबत सवलत देण्याची सलोखा योजना ३ जानेवारी २०२३ पासून राबविण्यात येत आहे.
सदर योजना अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून दोन वर्षांपर्यंत लागू राहणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन्ही शेतकऱ्यांचा एकमेकांच्या जमिनीवरील ताबा किमान १२ वर्षांपासून असणे आवश्यक आहे. एकाच गावात जमिन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांचे परस्परांकडे मालकी आणि ताबा असल्याबाबतचा पंचनामा मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी करुन दस्त नोंदणीच्या वेळी दस्तासोबत जोडणे बंधनकारक आहे. जमिनीच्या दोन्ही बाजूकडील क्षेत्रफळात कितीही फरक असला तरी योजनेत पात्र मात्र दोन्ही पक्षकार सर्व संमतीने हा अदलाबदल दस्त नोंदवित असल्याची अट दस्तामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. ही योजना अकृषक रहिवासी आणि वाणिज्यिक वापराच्या जमिनीस लागू राहणार नाही.
या योजनेमुळे आपसातील पिढीजात वैरभावना संपुष्टात येऊन ताबा आणि मालकीबाबतचा संभ्रम नष्ट झाल्यामुळे सकारात्मक मानसिकता होऊन जमिनीच्या विकासाला चालना मिळणार आहे. तसेच शेतकऱ्याचे वैयक्तिक आणि राष्ट्रीय उत्पादनात वाढ होऊन न्यायालयांमध्ये प्रलंबित दावे निकाली निघून शेतकरी, न्यायालय आणि प्रशासनाचा वेळ आणि खर्च वाचणार आहे.
सलोखा योजना ही शेतकऱ्यांच्या हिताची असल्यामुळे योजनेचे निकष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन वाद मिटवून सामाजिक सौख्य आणि सौहार्द वाढविण्यास हातभार लावावा, योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
000000
संसर्गजन्य आजाराबाबत नागरिकांनी सतर्कता बाळगावी
- जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड
*वाढत्या कोविड संसर्गामुळे निर्देश जारी
बुलडाणा, दि. 5 : जिल्ह्यात कोविड आणि इन्फ्ल्युएंझा आजाराच्या रूग्णांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. संसर्ग वाढू नये, यासाठी नागरिकांनी शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले आहे.
संसर्गाला आळा घालण्यासाठी गर्दी आणि बंदिस्त ठिकाणी विशेषत: सहव्याधी असणाऱ्या व्यक्ती आणि वृद्धांनी जाणे टाळावे. डॉक्टर, पॅरामेडिकल, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी आरोग्य सुविधा देताना रुग्णालयात मास्क घालावे. गर्दीच्या ठिकाणी आणि बंदिस्त ठिकाणी मास्क वापरावे. शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड झाकण्यासाठी रुमाल, टिश्यू वापरात आणावे. हाताची स्वच्छता राखणे, वारंवार हात धुणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळावे, चाचणी करण्यावर भर देणे आणि लक्षणांचा लवकर अहवाल देण्यात येणार आहे. श्वसनाच्या आजाराने ग्रस्त असल्यास वैयक्तिक संपर्क मर्यादित करावा, तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी नियंत्रण कक्ष सुरु करण्यात येणार आहे.
राज्यातील कोविड-19 रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्याअनुषंगाने रुग्णालय स्तरावर आणि कार्यक्षेत्रात भेटी दरम्यान आरोग्य कर्मचारी यांनी आयएलआय, सारीसारख्या आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे वर्गीकरणानुसार आणि इन्फ्ल्युएंझा -एच्या चाचणीच्या मार्गदर्शक तत्वानुसार एचवन एनवन आणि एचथ्रीएनथ्रीसाठी तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोविड-19 व्यवस्थापन, इन्फ्ल्युएंझा -ए व्यवस्थापन दोन्ही आजारसोबत असतील, तर त्याच्या व्यवस्थापनाच्या सुचनेचे पालन करावे लागणार आहे. यासाठी रुग्णालयात ऑक्सीजनची पुरेशा प्रमाणात साठवणूक असावी लागणार आहे. प्रत्येक संस्थानिहाय माहिती तयार करुन कोविड पोर्टलवर टाकण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यासाठी कोविड रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाचा सहभाग घेण्यात येणार आहे.
राज्यात चाचण्यांचा दर कमी झाला आहे. चाचण्यांचा दर दशलक्ष लोकसंख्येमागे 140 प्रतिदिन असणे आवश्यक आहे. तसेच घरी विलगीकरणाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, रुग्णांच्या सहवासिताचा शोध घेऊन मार्गदर्शक सुचनांनुसार चाचण्या करण्यात येणार आहे. रुग्णालयात औषधी आणि साहित्य उपलब्ध राहिल, याची खातरजमा करणे आवश्यक आहे. उपलब्ध कोव्हॅक्सीन पूर्णपणे वापरात येईल, यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. लोकांमध्ये आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत जागरूकता वाढविण्यात येणार आहे. विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. कोविड आणि इन्फ्युएंझा या दोन्ही आजाराचा प्रसार थांबण्यासाठी मार्गदर्शक बाबींचे नागरिकांनी पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
00000
समता पर्वात शुक्रवारी आरोग्य शिबिराचे आयोजन
बुलडाणा, दि. 5 : सामाजिक न्याय विभागाच्या समता पर्वात जागतिक आरोग्य दिनानिमित्त शुक्रवार, दि. 7 एप्रिल रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील ऊसतोड कामगार आणि जिल्ह्यातील तृतीयपंथी यांच्यासाठी दि. 25 एप्रिल रोजी आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यत करण्यात येणार आहे.
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयातर्फे संपूर्ण एप्रिल महिन्यात समता पर्व अभियानांतर्गत विभागाच्या विविध योजना थेट जनतेपर्यंत संवाद साधून पोहोचविण्यात येत आहे. यासाठी जिल्हा, तालुका आणि ग्रामपातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर आरोग्य तपासणीचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.
0000000
No comments:
Post a Comment