Wednesday, 25 January 2023

DIO BULDANA NEWS 25.1.2023

 जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आज राष्ट्रध्वज वंदन

बुलडाणा, दि. 25 : प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त गुरूवारी, दि. 26 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9.15 वाजता जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांच्या हस्ते पोलिस कवायत मैदान येथे राष्ट्रध्वज वंदन होणार आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वज वंदन आणि संचलन होणार आहे. संचलनात विविध विभागाचे चित्ररथ सहभागी होतील. तसेच उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव करण्यात येणार आहे. राष्ट्रध्वज वंदनाच्या कार्यक्रमाला नागरिकांनी राष्ट्रीय पोषाखात सकाळी नऊ वाजेपूर्वी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

000000



आरसेटी प्रशिक्षणार्थ्यांचे कौशल्य, ज्ञान स्पर्धेत यश

बुलडाणा, दि. 25 : बँक ऑफ महाराष्ट्र, जीवननोत्ती अभियान उमेद आणि आरसेटी यांच्या वतीने आरसेटीच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय कौशल्य आणि ज्ञान स्पर्धा घेण्यात आली. त्यात अनिता चवरे यांनी उद्योजकता विकास प्रशिक्षणाविषयी सादरीकरण केले. जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड झाल्याने त्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्या आहेत.

विभागनिहाय स्पर्धा घेऊन प्रशिक्षणार्थ्यांची सोलापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड करण्यात आली. यात सेंट्रल बँक ऑफ इंडिया बुलडाणा आरसेटी येथील चार महिलांनी सहभाग घेतला. आरसेटीमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थीची विभागीय स्पर्धा वाशिम येथील स्टेट बँक आरसेटी येथे घेण्यात आली. यामध्ये शिवणकाम, ब्युटी पार्लर, शेळी संगोपन आणि उद्योजकता विकासाचे प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला.

000000‍

महाडीबीटी प्रणालीवरील अर्ज निकाली काढण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 25 : महाडीबीटी प्रणालीवरील महाविद्यालय स्तरावरील मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज तात्काळ निकाली काढावेत, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त यांनी केले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तसेच बहुजन कल्याण इतर मागास विभागामार्फत प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण फी, परिक्षा फी या योजनांचा लाभ देण्यात येतो.

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेले ऑनलाईन अर्ज महाविद्यालयांकडे पाठविले जातात. महाविद्यालय प्राप्त अर्जांची तपासणी करून पात्र अर्ज समाज कल्याण विभागाकडे पाठवितात. यातील त्रृटी असलेले अर्ज विद्यार्थ्यांच्या लॉगीनला परत पाठविणे आवश्यक आहे. मात्र जिल्ह्यातील चार हजार 18 विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित ठेवण्यात आले आहे.

यात स्व. भास्करराव शिंगणे कला, प्रा. एन. गावंडे विज्ञान आणि ए. गावंडे वाणिज्य महाविद्यालय, साखरखेर्डा, परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेचे अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय, चिखली, श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगाव, पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर, व्यवस्थापन महाविद्यालय, खामगाव, आदर्श बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ, डॉ. आर. एन. लाहोटी तंत्रनिकेतन, सुलतानपूर, गावंडे औषधनिर्माण महाविद्यालय, साखरखेडा, सहकार महर्षि भास्करराव शिंगणे कला महाविद्यालय, खामगाव, मॉडर्न डिग्री कॉलेज बुलडाणा, श्री पुंडलिक महाराज महाविद्यालय, नांदुरा या महाविद्यालयांचे अर्ज प्रलंबित आहेत.

अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचे प्रलंबित असलेल्या अर्जाची महाविद्यालयस्तरावर तपासणी करून पात्र अर्ज समाज कल्याण विभागाच्या लॉगीनला दि. 26 जानेवारी 2023 पर्यंत पाठविण्यात यावे. तसेच त्रृटी असलेले अर्ज विद्यार्थ्यांच्या लॉगीनला परत करण्याची कारवाई करण्यात यावी. अन्यता मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवल्याप्रकरणी महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येईल. जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर राहणार आहे. त्यामुळे महाविद्यालयांनी प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

000000

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 25 : दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी नॅशनल सेंटर फॉर प्रमोशन ऑफ एम्प्लॉयमेंट फॉर डिसेबल पिपल संस्थेकडून बजाज फिनसर्व स्कॉलरशिप प्रोग्राम फॉर स्टुडंट विथ डिसेबिलीटी ही शिष्यवृत्ती राबविण्यात येत आहे. यासाठी इच्छुकांनी दि. 31 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर शिष्यवृत्तीसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांनी bspf.ncpedp@gmail.com किंवा secretatiat.ncpedp@gmail.com या मेल आयडीवर पीडीएफ किंवा वर्ड फाईलमध्ये विहित नमुन्यात  अर्ज करावे लागणार आहे. या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी केले आहे.

000000

जिल्हा ग्रंथालयात शुक्रवारी ग्रंथप्रदर्शन

बुलडाणा, दि. 25 : मराठी भाषा पंधरवाड्यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने ग्रंथप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा ग्रंथालयात सायंकाळी पाच वाजता ग्रंथप्रदर्शन आणि त्यानंतर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथ प्रदर्शनी शुक्रवार, दि. 27 जानेवारी 2023 आणि शनिवार, दि. 28 जानेवारी 2023 या दोन दिवशी सर्वांसाठी नि:शुल्क खुली राहणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment