कोलवडात आज श्रमदानाचा जागर
पैनगंगा नदीकाठी मेहकर, चिखली येथे श्रमदान
बुलडाणा, दि. 13 : ‘चला जाणूया नदीला’ उपक्रमास जिल्ह्यात सुरवात झाली आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील पैनगंगा नदीचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील बुलडाणा, चिखली, मेहकर या तीन तालुक्यातील 84 किलोमीटर नदीपात्राची शनिवार, दि. 14 जानेवारी 2023 रोजी स्वच्छता करण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरवात कोलवड येथून होणार आहे. यात पहिल्या टप्प्यात कोलवडसह मेहकर, चिखली येथे श्रमदान करण्यात येणार आहे.
बुलडाणा तालुक्यातील कोलवड येथे जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांच्या उपस्थितीमध्ये पैनगंगा नदी स्वच्छता अभियानाला सुरूवात होणार आहे. बुलडाणा येथील 300 अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते कोलवड येथील नदीपात्राची स्वच्छता करणार आहे.
चिखली तालुक्यात कोलारी ब्रम्हपुरी, किन्होळा, सवना, दिवठाणा पेठ, बोरगाव काकडे, पांढरदेव, उतदारा, पेठ येथे श्रमदान करण्यात येणार आहे. मेहकर तालुक्यात पैनगंगा नदीचा पूल, घुमटामागील जानेफळ वेस परिसर, ओलांडेश्वर मंदिर येथे श्रमदान करण्यात येणार आहे.
सांडपाणी आणि कचऱ्यामुळे नदीतील पाणी दुषित होत आहे. नदीपात्रातील कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. त्यासोबतच नदीपात्रात येणाऱ्या सांडपाण्याबाबतही उपचारात्मक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. नदीच्या दुषित पाण्यामुळे होणाऱ्या दुष्परिणाबद्दल जाणीव निर्माण करण्यासाठी नदीची स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली आहे. या स्वच्छता मोहिमेत प्रामुख्याने नदीकाठील गावांमधील नागरिक आणि विद्यार्थ्यांना सामावून घेतले जाणार आहे.
नदीतील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी पाणलोटाची कामे करण्यात येतील. तसेच नदीपात्रातील घटकांचीही विल्हेवाट लावण्यात येणार आहे. नदीपात्रातील कचरा काढून पात्र स्वच्छ करण्यात येणार आहे. जिल्ह्यात पैनगंगा नदीचे 84 किलोमीटरचे पात्र आहे. या संपूर्ण नदीपात्राची स्वच्छता पूर्ण होईपर्यंत हे अभियान सुरूच राहणार आहे. यात स्थानिक नागरिकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे.
नदीचे पाणी दुषित झाल्यामुळे अनेक गंभीर समस्या निर्माण होत आहे. तसेच नदीच्या नैसर्गिक प्रवाहावरही परिणाम झालेला आहे. त्यामुळे नदीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पैनगंगा नदीची स्वच्छता करण्यासाठी उपक्रम हाती घेतला आहे. प्रामुख्याने युवा आणि विद्यार्थ्यांमध्ये नदीबद्दल जाणीव जागृती करण्यासाठी हा उपक्रम मदतीचा ठरणार आहे. या उपक्रमात युवकांनी बुलडाणा, चिखली, मेहकर येथील श्रमदानात सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी केले.
000000
उद्योग सुलभतेसाठी कार्यशाळा संपन्न
बुलडाणा, दि. 13 : उद्योजकांसाठी उद्योग सुलभता
आणि व्यवसाय वाढीसाठी उद्योग विभाग, मैत्री विभाग आणि जिल्हा उद्योग केंद्रातर्फे
कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात बुधवारी, दि.
11 जानेवारी 2023 रोजी कार्यशाळा पार पडली.
कार्यशाळेला जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड,
उद्योग उपसंचालक श्री. भुरेवाल, नाबार्डचे व्यवस्थापक श्री. पठारे, अग्रणी बँक
अधिकारी नरेश हेडावू आदी कार्यशाळेस उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी
उद्योजकांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी पुढे यावे, तसेच स्थानिकांना मोठ्या प्रमाणात
रोजगार देण्यासाठी कोणतीही समस्या असल्यास सोडविण्याचे आश्वासन दिले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023च्या निमित्ताने पौष्टिक तृणधान्य
आहारातील महत्त्व लक्षात घेता सर्व उद्योजक अधिकारी, कर्मचारी यांनी पौष्टिक
तृणधान्याचे विविध पाककृती नागली बिस्कीट,बाजरीचे अप्पे व शिरा, ज्वारीचे धिरडे,
मिक्स तृणधान्य लाडूचे महत्त्व सांगितले. दररोज कडधान्यापासून तयार होणाऱ्या
पौष्टीक आहाराचा समावेश करावा, असे आवाहन केले. मुंबई येथील मैत्री सल्लागार सरीम
खान आणि अमेशा शेट्टी यांनी ईज ऑफ डुईंग बिजनेस सुधारणांबाबत सादरीकरण केले.
त्यांनी उद्योजकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्यांनी शासन राबवित असलेल्या आणि
नव्याने येवू घातलेल्या धोरणावर चर्चा केली.
जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनील
पाटील यांनी प्रास्ताविकात व्यवसायिकांमध्ये जागरुकता निर्माण करणे, तसेच आयटी
पातळीवर आणि नियामक पातळीवर केल्या जाणाऱ्या विविध सुधारणाविषयी माहिती दिली.
उपस्थितांचे एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत जिल्ह्यात निवड करण्यात आलेल्या पिकाचे
बियाणे देवून स्वागत करण्यात आले. व्यवस्थापक एन. एस. पाटील यांनी आभार मानले.
00000
No comments:
Post a Comment