Tuesday, 17 January 2023

DIO BULDANA NEWS 17.01.2023

 




मकरसंक्राती सण पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून साजरा

बुलडाणा, दि. 17 : पौष्टिक तृणधान्याची उत्पादनात वाढ आणि आहारातील वापर वाढविण्याबाबत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यात मकरसंक्रांती हा सण पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून साजरा करण्यात आला.

संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. ‘आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३’ च्या अनुषंगाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये सदर पिकांचे उत्पादन वाढ आणि आहारातील वापर वाढविण्यासाठी विविध विभाग आणि कृषि महाविद्यालय, शाळांचे मार्फत जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात येत आहेत.

 मकर संक्राती-भोगी सणाच्या दिवशी पौष्टिक तृणधान्ययुक्त पदार्थाचा आहारामध्ये समावेश करण्याची परंपरा आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ चे  औचित्य साधून, पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व अधोरेखित करण्यासाठी मकर संक्राती भोगी हा सण दरवर्षी पौष्टिक तृणधान्य दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. 

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयात मकरसंक्राती भोगी सणानिमित्त पौष्टिक तृणधान्य बाजरी, इतर पौष्टिक तृणधान्यापासूनच्या विविध पदार्थाचे अल्पोपहार आणि आहारातील महत्व आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमात या मोहिमेंतर्गत बुलडाणा येथील जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, जिल्हा मृद सर्व्हेक्षण मृद चाचणी, जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळा, जिल्हा रोपवाटिका कार्यालयातील महिला तसेच कुटुंबातील महिला सदस्यांनी पौष्टिक तृणधान्य बाजरी आणि इतर पौष्टिक तृणधान्यापासूनचे विविध पदार्थ तयार केले. हळदी कुंकूनिमित पौष्टिक तृणधान्य शब्दांचा उपयोग करून महिलांनी विविध उखाणे घेतले.  यात महिलांसाठी विविध कार्यक्रम घेण्यात आले.

00000

 

पदवीधर मतदारसंघासाठी 30 जानेवारीला मतदान

*मतदान प्रक्रिया जाणून घेण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 17 : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी सोमवार, दि. 30 जानेवारी 2023 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीतील मतदारांनी मतदान करताना घ्यावयाची काळजी, मतदान आणि मतदान नोंदविण्याची प्रक्रिया जाणून घ्यावी, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी गौरी सावंत यांनी केले आहे.

मतदारांनी मत कसे नोंदवावे

केवळ आणि कवेळ मतपत्रिकेसोबत पुरवण्यात आलेल्या जांभळ्या शाईच्या स्केच पेनच मत नोंदवावे. इतर कोणताही  पेन, पेन्सिल, बॉलपेनचा  वापरू नये. मतदारांनी पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील ‘पसंतीक्रम नोंदवावा’ या रकान्यात ‘1’ हा अंक लिहून मत नोंदवावे. निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या विचारात घेता मतपत्रिकेवर जितके उमेदवार आहेत, तितके पसंतीक्रम मतदार मतपत्रिकेवर नोंदवू शकतील. आपले पुढील पसंतीक्रम उर्वरित उमेदवारांसमोरील रकान्यात 2, 3, 4 आदीप्रमाणे आपल्या पसंतीप्रमाणे नोंदवू शकतात.

एका उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात एकाच पसंतीक्रमाचा अंक नोंदवावा. तो पसंतीचा क्रमांक इतर कोणत्याही उमेदवारासमोर नोंदवू नये. पसंतीक्रम केवळ 1, 2, 3 अशा अंकामध्येच नोंदविण्यात यावेत. ते  एक, दोन व तीन अशा शब्दांमध्ये नोंदविण्यात येवू नयेत. पसंतीक्रम नोंदविताना वापरावयाचे अंक हे भारतीय अंकाच्या आंतरराष्ट्रीय स्वरूपात जसे 1, 2, 3 इत्यादी किंवा रोमन अंक स्वरूपात जसे I, II, III किंवा मराठी भाषेतील देवनागरी 1, 2, 3 या स्वरूपात नोंदवावे. मतपत्रिकेवर कोठेही आपली स्वाक्षरी, आद्याक्षरे, नाव किंवा अन्य कोणताही शब्द लिहू नये. तसेच मतपत्रिकेवर अंगठ्याचा ठसा उमटवू नये. मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदवताना टिकमार्क बरोबरची खुण किंवा क्रॉसमार्क अशी खूण करू नये. अशी मतपत्रिका अवैध ठरेल. आपली मतपत्रिका वैध ठरावी याकरिता आपण पहिल्या पसंतीक्रमाचे मत नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे. अन्य पसंतीक्रम नोंदवणे ऐच्छिक आहे, अनिवार्य नाही, असे निवडणूक विभागाने कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment