पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून
राष्ट्रमाता माँ जिजाऊसाहेबांना अभिवादन
राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी कटिबद्ध : पालकमंत्री गुलाबराव पाटील
बुलडाणा, दि. 12 : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सिंदखेडराजा येथील राजे लखोजीराव जाधव राजवाडा येथील राष्ट्रमाता माँ जिजाऊसाहेब जन्मस्थळी भेट देऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी राष्ट्रमाता माँ जिजाऊसाहेब यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
राष्ट्रमाता माँ जिजाऊसाहेब जन्मस्थळ विकास आराखड्यासह सिंदखेड राजा शहराच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. विकास आराखड्यानुसार विविध विकासकामे सुरू आहेत. येत्या काळातही विकासात्मक कामे हाती घेण्यात येतील. यातून जन्मस्थळ आणि शहराचा सर्वांगिन विकास साधण्यात येणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. राष्ट्रमाता माँ जिजाऊसाहेब जन्मोत्सवानिमित्त अभिवादन केल्यानंतर श्री. पाटील यांनी संवाद साधला. सिंदखेडराजा येथे राष्ट्रमाता माँ जिजाऊसाहेब यांच्या 425व्या जयंतीनिमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटील अभिवादन करण्यासाठी आले होते
यावेळी खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, आमदार संजय रायमूलकर, डॉ. शशिकांत खेडेकर, नगराध्यक्ष सतीश तायडे, भीमा पंडित जाधव, शिवप्रसाद ठाकरे, पाणीपुरवठा सभापती बालाजी मेहेत्रे आदी उपस्थित होते
00000
राष्ट्रमाता मॉ जिजाऊसाहेब,
स्वामी विवेकानंद जयंती साजरी
बुलडाणा, दि. 12 : राष्ट्रमाता मॉ जिजाऊसाहेब आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तहसिलदार शामला खोत, गजानन मोतेकर आणि अधिकारी-कर्मचारी यांनी अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
000000
नायलॉन मांजा विक्री, साठवणुकीवर कायमस्वरूपी बंदी
बुलडाणा, दि. 12 : प्लास्टिक किंवा कृत्रिम वस्तूंचा वापर करून बनविण्यात आलेल्या आणि सर्वसाधारण नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या पक्क्या धाग्याची निर्मिती, विक्री आणि साठवणुकीवर संपूर्ण जिल्ह्यात कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे. या प्रकारचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी पारित केले आहे.
मकर संक्रांत सणाच्या अनुषंगाने पतंग उडविण्यात येते. मात्र या पतंगाला नायलॉन मांजा वापरल्यामुळे पक्षी व मानव जीवितास इजा पोहचविले जाते. काही प्रसंगी या इजा प्राणघातक ठरत आहे. तसेच दोन पतंगामध्ये दोऱ्याचे घर्षण होवून मोठ्या प्रमाणात मांजा तुटून उंच झाडे व इमारतीमध्ये हा धागा अडकतो. त्यामुळे वनपक्षी यांचे जिवीतास धोका निर्माण होवून पशू-पक्षी जखमी अथवा मृत होतात. पतंगासह तुटलेल्या नायलॉन मांजाच्या धाग्यांचे तुकडे जमिनीवर पडून त्याचे विघटन होण्यासारखे नसल्याने गटारे व नदी, नाल्यांसारख्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण करतात. तसेच गाय अथवा तत्सम प्राण्यांनी नायलॉन मांजाचे तुकडे समाविष्ठ असलेले खाद्य सेवन केल्यामुळे त्यांना गुदमरण्याचा त्रास होतो. अशा प्रकारे मांजा अथवा धाग्यांमधील प्लास्टिकच्या वस्तूंमुळे विविध प्रकारचे दुष्परिणाम दिसून येतात.
या सर्व बाबींचा विचार करून जिल्ह्यात पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986 चे कलम 5 नुसार सर्व घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, साठवणूक करणारे यांना नायलॉन मांजा विक्री व साठवणूक करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था ह्या पर्यावरण अधिनियमानुसार शिक्षेस पात्र राहतील. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलिस विभागाचे स्वतंत्र पथक तयार करून कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी दिले आहे.
00000
No comments:
Post a Comment