अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक
आदर्श आचारसंहिता लागू
बुलडाणा, दि. 2 : अमरावती पदवीधर मतदार संघ सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. निवडणुक आयोगाने या मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम घोषित केल्यापासून ते या निवडणुकीचा निकाल जाहिर होईपर्यंत निवडणुकीची आदर्श आचार संहिता लागू राहील.
30 जानेवारी 2023 रोजी अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी मतदान आणि 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 5 जानेवारी 2023 रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. 12 जानेवारीपर्यंत नामनिर्देशन पत्रे सादर करता येतील. 13 जानेवारी रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येईल. 16 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेणे, 30 जानेवारी रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी करण्यात येईल.
या निवडणुकीच्या आदर्श आचार संहिता कालावधीमध्ये निवडणूक प्रचारार्थ कार्यासाठी किंवा निवडणुकीशी संबंधित दौऱ्यासाठी मंत्री, राज्यमंत्री, स्थानिक स्वराज संस्थांचे पदाधिकारी, राजकीय पक्षाचे उमेदवार, इत्यादी व्यक्तींना शासकीय वाहनांचा वापर करता येणार नाही. अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या आदर्श आचार संहितेचे सर्वांनी पालन करण्याचे आवाहन अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment