Wednesday, 18 January 2023

DIO BULDANA NEWS 18.01.2023



 जलसंपदा विभागाची क्रिडा स्पर्धेत जिल्ह्याचे यश

बुलडाणा, दि. 18 : यवतमाळ येथे जलसंपदा विभागाच्या झालेल्या अमरावती विभागीय क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्याने चमकदार कामगिरी केली.

दैनंदिन कामकाजातून विरंगुळा मिळावा, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी प्रत्येक विभागाच्या क्रिडा आणि सांस्कृतिक स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यानुषंगाने दि. 14 आणि 15 जानेवारी 2023 रोजी नेहरु क्रिडा संकुल, यवतमाळ येथे जलसंपदा विभागाच्या अमरावती विभागीय क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा पार पडल्या.

बुलडाणा येथील अधीक्षक अभियंता, बुलडाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ चमूने कबड्डी, क्रिकेट, 100 मीटर, गायन आणि एकपात्री अभिनय स्पर्धेत विजेतेपद पटकावले.

कबड्डी स्पर्धेत प्रशांत राजगुरु, गौरव चव्हाण, मंजितसिंग राजपूत, राहुल येंडोले, अशोक सुभेदार, नंदकिशोर वानखेडे, सदानंद चापे, विनोद लांडे, संदीप इंगळे, लक्ष्मण तायडे, संदिप सुसर आणि उदय उपाध्ये यांचे चमूने अंतिम सामन्यात अमरावती संघाचा पराभव करून विजेतेपद पटकाविले.

क्रिकेट स्पर्धेत शरद भारोटे, रोहन शेटे, प्रशांत पांडे, संदीप खरात, वसीम खान, जीवन सुरडकर, संदिप कंकाळ, प्रविण गिरी, विजय तुपकर, शुभम गवई, सचिन वानखेडे, मंगेश पवार, संजय चांदोडकर, दादाराव शेगोकार, गजानन खाडे, गोपाल राजपूत, गजानन खाडे यांच्या संघाने यवतमाळ संघाचा पराभव करून अंतिम फेरीत विजय मिळविला.

वसीम खान याने 100 मीटर धावणे स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. गायन तथा एकपात्री अभिनयामध्ये मंजीतसिंग राजपुत यांना विजेता म्हणून घोषित करण्यात आले. या स्पर्धेत पार पाडलेल्या इतर क्रिडा प्रकारांमध्ये भास्कर गावंडे, सचिन निखारे, मिलींद घोडेस्वार, भरत माघाडे, नितीन लोखंडे, समृध्दी राठोड, सचिन राऊत, किशोर लबडे, अंकुश गायकवाड, अतुल पाटील, श्रीराम जायभाये, रंजना जाधव, प्रल्हाद गोरे, प्रदीप पवार, रविंद्र पाटील या खेळाडूंनी सहभाग नोंदविला.

अधीक्षक अभियंता सुनील चौधरी यांच्या मार्गदर्शनात पार पाडलेल्या स्पर्धेच्या यशस्वीतेकरीता समन्वय अधिकारी तथा सहायक अधीक्षक अभियंता तुषार मेतकर, कार्यकारी अभियंता अमोल चोपडे आणि प्रशांत संत, उपविभागीय अभियंता उन्मेश पाचपोर, श्रीशैल यमाजी, सुनिल नागपुरे, अधीक्षक देविदास वाकोडे यांनी प्रयत्न केले.

000000



मलकापूर पांग्रा येथे राष्ट्रीय युवा दिन, सप्ताहानिमित्त वक्तृत्व स्पर्धा

बुलडाणा, दि. 18 : नेहरू युवा केंद्रातर्फे राष्ट्रीय युवा दिन आणि सप्ताहानिमित्त निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा मलकापूर पांग्रा येथील कै. विजय मखमले उर्दू माध्यमिक विद्यालयात घेण्यात आली.

मुख्याध्यापक गिरीश मखमले अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून सय्यद आसिफ उपस्थित होते. यावेळी स्वामी विवेकानंद यांचे जीवनकार्य, आचार-विचार यावर मार्गदर्शन करण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनपटावर प्रकाशझोत टाकला.

निबधं स्पर्धा ही स्वामी विवेकानंद यांचे तत्वज्ञान या विषयावर मराठी भाषेमध्ये घेण्यात आली. यात प्रथम पूजा साळवे, द्वितीय सुहानी अवसरमोल तृतीय शारदा जोशी यांनी पटकविला. निबंध स्पर्धेचे परीक्षक म्हणून कैलास गिराम, ज्ञानेश्वर उगले, किरण कायंदे यांनी काम पाहिले.

यावेळी ‘स्वामी विवेकानंद के खयालत’ या विषयावर हिंदी भाषेमध्ये वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये प्रथम अकसा तहेरीम अय्युब खान, द्वितीय जारा कशफ शेख आलम, तृतीय मुंतसीम जक्की सय्यद आसिफ यांनी क्रमांक पटकाविला. परीक्षक म्हणून सय्यद आसिफ, नातीक जव्वाद, शेख इम्रान यांनी काम पाहिले.

जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर, कार्यक्रम पर्यवेक्षक अजयसिंग राजपूत, शेख इमरान यांच्या सहकार्याने ही स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमासाठी शेषराव इंगळे, विजय इंगळे, उत्तम घेवंदे, आरिफ शाह, जलील शेख, विलास टाले यांनी पुढाकार घेतला.

00000

हरभरा पिकातील घाटे अळी, मर रोगाचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 18 : जिल्ह्यातील हरभरा पिकावर घाटे अळी आणि मर रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. या रोगाचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

हरभरा हे रब्बी हंगामातील एक महत्वाचे डाळवर्गीय पीक आहे. हरभरा पिकावर प्रामुख्याने घाटे अळी आणि मर रोगाचा प्रादूर्भाव दिसून येतो. घाटेअळीचे वेळीच नियंत्रण केले नसल्यास पिकाचे जवळपास ३० ते ४० टक्क्यांपर्यंत नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सजग राहून एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापनाचा अंगीकार करणे गरजेचे आहे.

लहान अळ्या सुरवातीस पानाची खालील बाजू खरवडून खातात. त्यामुळे पानावर पांढरट डाग दिसून येतात. प्रादूर्भाव जास्त असल्यास पानांची जाळी झालेली दिसते. अळ्या झाडाचे कोवळे शेंडे देखील कुरतडून खातात. त्यामुळे शेंडे पाने विरहित होतात. पिकास आलेल्या कळ्या आणि फुले देखील अळ्या कुरतडून खातात. परिणामी घाटे कमी प्रमाणात तयार होतात. पूर्ण वाढ झालेली अळी अतिशय खादाड असते. अळी घाट्यात डोके खुपसून आतील दाणे फस्त करते. त्यामुळे घाट्यावर गोलाकार छिद्रे दिसून येतात. घाटे पक्वतेच्या कालावधीतील ढगाळ वातावरण किडीच्या वाढीस अतिशय पोषक असल्यामुळे अल्पावधीतच किडीची संख्या झपाट्याने वाढू शकते.

या रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन करताना पेरणीच्या वेळी हेक्टरी २०० ग्रॅम ज्वारी शेतामध्ये फेकावी जेणेकरून त्याचा नैसर्गिक पक्षी थांबा म्हणून चांगला उपयोग होतो. वेळोवेळी निंदणी, कोळपणी करून पीक तण विरहित ठेवावे. बांधावरील कोळशी, रानभेंडी व पेटारी इ. तणे काढून नष्ट करावीत. मुख्य पिकाभोवती झेंडू या सापळा पिकाची एक ओळ लावावी. इंग्रजी टी आकाराचे पिकापेक्षा १ ते १.५ फुट अधिक उंचीचे पक्षी थांबे ५० प्रती हेक्टरी दर १५-२० मीटर अंतरावर लावावेत. त्यामुळे चिमणी, साळुंखी, कोळसा इ. पक्षी त्यावर बसतात व घाटे अळ्या वेचून खातात. घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी हेक्टरी ५ कामगंध सापळे जमिनीपासून १ मीटर उंचीवर लावावेत.

पिक सुरवातीला कायिक वाढीत असताना ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडिरॅक्टिन ०.३० टक्के डब्लूएसपी ३०० पीपीएम ५० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पहिली प्रतिबंधात्मक फवारणी आणि १५ दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी केल्यास घाटे अळीचा पतंग अशा पिकावर अंडी घालण्याचे टाळतो. पिक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना आणि घाटे भरताना सुरुवातीच्या काळात अळीचा प्रादुर्भाव वाढल्यास शक्य तितक्या अळ्या वेचून रॉकेल मिश्रित पाण्यात बुडवून माराव्यात.

जैविक घटकाचा वापर घाटेअळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी अतिशय उपयुक्त ठरतो. प्रथम आणि द्वितीय अवस्थेतील अळ्या दिसू लागताच एचएएनपीव्ही विषाणू २५० एलई १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. विषाणूची कार्यक्षमता वाढविण्यासाठी व उन्हापासून संरक्षण करण्यासाठी १ ग्रॅम राणीपाल (नीळ) फवारणीच्या द्रावणात मिसळावे. रोगकारक बुरशी बिव्हेरिया बॅसिअॅना १.१५ टक्के डब्लूपी ५० ग्रॅम किंवा बॅसिलस थुरिनजिएन्सीस कुर्सटाकी प्रजाती ०.५ टक्के डब्लूपी ४० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

रासायनिक किटकनाशके ही किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास, दोन अळ्या प्रती मीटर ओळीत आढळून आल्यास किंवा ५ टक्के घाट्यांवर अळीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास अथवा सतत दोन-तीन दिवस प्रत्येक सापळ्यात ८ ते १० पतंग आढळून येत असल्यास कीटकनाशकांची फवारणी करावी.

फवारणीसाठी उपलब्ध रासायनिक किटकनाशके ही प्रती १० लीटर पाणीच्या प्रमाणात इमामेक्टीन बेन्झोएट १.९० टक्के ईसी किंवा ७.५ मिली, क्लोरेंट्रॅनिलीप्रोल १८.५० टक्के एससी किंवा २.५ मिली, ईथिऑन ५० टक्के ईसी किंवा २० मिली, फ्लुबेन्डामाईड २० टक्के डब्लूजी किंवा ५ ग्रॅम, फ्लुबेन्डामाईड ३९.३५ टक्के डब्लूजी किंवा २ मिली, नोव्हॅल्युरॉन १० टक्के ईसी किंवा १५ मिली, क्विनॉलफॉस २५ टक्के ईसी किंवा २० मिली, नोव्हॅल्युरॉन ५.२५ टक्के अधिक इंडोक्साकार्ब ४.५० टक्के एससी १६.५ मिली या प्रमाणात वापरावीत.

किटकनाशकांची फवारणी शक्यतो सकाळी वारा शांत असताना करावी. पावर स्प्रेने फवारणी करावयाची असल्यास किटकनाशकांची मात्रा तिप्पट घ्यावी, गरज भासल्यास १५ दिवसानी दुसरी फवारणी करावी. तसेच किटकनाशकाची आलटून पालटून फवारणी करावी. उपरोक्त किटकनाशकासोबत इतर किटकनाशके, बुरशीनाशके, संप्रेरक, खते व अन्नद्रव्ये मिसळू नये. शेतकऱ्यांनी हरभरा पिकाचे सर्वेक्षण करून किडीचा प्रादूर्भाव असल्याशिवाय सरसकट फवारणी करू नये. फवारणी करतेवेळी संरक्षक साधनाचा वापर करावा.

हरभऱ्यावरील मर रोगाची ओळख ही मर रोग फ्युजारियम ऑक्सिस्पोरम बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रसार जमिनीमधून आणि रोगग्रस्त बियाद्वारे होतो. मर रोगाची बुरशी साधारणतः ६ वर्षापर्यंत जमिनीत जिवंत राहू शकते. ज्या भागात हवामान जास्त थंड राहते तेथे याचा प्रादुर्भाव कमी दिसतो.

या रोगाची लक्षणे ही रोगाच्या बुरशीमुळे झाडाच्या अन्नद्रव्य वाहून नेणाऱ्या पेशी मरतात. झाडाचा जमिनीवरचा भाग, देठ आणि पाने सुकतात आणि झाडे वाळून मरतात. जमिनीखालचा खोडाच्या भागाचा रंग फिकट होतो. कोवळी रोपे सुकतात. रोगग्रस्त झाडाच्या खोडाना उभा छेद दिल्यास आतील भाग तांबूस तपकिरी काळसर रंगाचा झालेला दिसतो.

या रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन करताना पिकाची वेळेवर पेरणी करावी. पेरणीसाठी विजय, विशाल, दिग्विजय, फुले विक्रम, फुले विक्रांत, पीकेव्ही २, पीकेव्ही ४, बीडीएनजी ७९७ (आकाश) मर प्रतिकारक्षम वाणाचा वापर करावा.

लागवडीपूर्वी ३ ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा ट्रायकोडर्मा हरजियानाम १.० टक्के डब्ल्यूपी ६ ग्रॅम प्रती किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. ट्रायकोडर्मा व्हिरीडी ५ किलो प्रती हेक्टरी शेणखतातून मिसळून द्यावे. ट्रायकोडर्मा व्हीरीडी ५ ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी. रोगग्रस्त झाडे आढळून आल्यास तात्काळ उपटून नष्ट करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

हरभरा पिकातील घाटेअळीचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 18 : जिल्ह्यामध्ये हवामानातील बदलामुळे हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी या रोगाचे वेळीच व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

हरभऱ्यावरील घाटेअळीचे एकात्मिक व्यवस्थापन करताना सद्यास्थितीत हरभऱ्याचे पिक हे काही ठिकाणी वाढीच्या तसेच बहुताश ठिकाणी फुलोरा अवस्थेत आहे. यादरम्यान घाटे अळीच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. घाटे अळी ही हरभरा पिकाची प्रमुख किड असून या किडीची मादी पतंग पानावर, कोवळ्या शेंड्यावर, कळ्यावर आणि फुलावर एकेरी अंडी घालते. ही अंडी खसखसीच्या दाण्यासारखी दिसतात. त्यातून २ ते ३ दिवसात अळी बाहेर पडते. ही अळी पानावरील हरीत द्रव्य खरडून खाते. त्यामुळे पाने प्रथम पिवळसर पांढुरकी होऊन वाळतात आणि गळून पडतात. थोड्या मोठ्या झालेल्या अळ्या संपूर्ण पाने आणि कोवळी देठे खाऊन फस्त करतात. त्यामुळे झाडावर फक्त फांद्याच शिल्लक राहतात. पुढे पिक फुलोऱ्यावर आल्यावर या अळीचा प्रादूर्भाव वाढतो आणि अळ्या प्रामुख्याने फुले व घाट्यांचे नुकसान करतात. मोठ्या झालेल्या अळ्या घाट्याला छिद्र करून आतील दाणे खाऊन घाटे पोखरतात. एक अळी साधारणतः ३० ते ४० घाट्यांचे नुकसान करते.

या रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन करताना घाटे अळीचे परभक्षक उदा. बगळे, मैना, राघो, निळकंठ, काळी चिमणी इत्यादी पिकामधे फिरून घाटे अळ्या वेचून त्यांचे पिकावरील नियंत्रण करतात. अवाजवी किटकनाशकांची फवारणी केल्यास पक्षी किटकनाशकांच्या वासामुळे शेतामधे येणार नाहीत. त्यामुळे किटकनाशकांचा जास्त वापर टाळावा. ज्या शेतामधे मका किंवा ज्वारीचा नैसर्गिक पक्षी थांबे म्हणून उपयोग केला नसेल, त्या शेतामधे बांबूचे त्रिकोणी पक्षी थांबे (प्रती हेक्टर २० पक्षी थांबे) तयार करून शेतामधे लावावे. त्यामुळे पक्षांचे अळ्या वेचण्याचे काम सोपे होते. कामगंध सापळ्याचा वापर करावा. यासाठी घाटे अळीचे कामगंध सापळे (हेक्झाल्यूर) एकरी दोन किंवा हेक्टरी पाच सापळे याप्रमाणे लावावेत. सापळ्यामधे सतत तीन दिवस, आठ ते दहा पतंग आढळल्यास किड व्यवस्थापनाचे उपाय योजावेत. शेतकऱ्यांनी पिकाचे निरीक्षण करून किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान संकेत पातळीच्यावर १ ते २ अळ्या प्रति मीटर ओळ आढळून आल्यास किंवा ४० ते ५० टक्के पिक फुलोऱ्यावर आल्यानंतर घाटेअळीचे व्यवस्थापनासाठी खालील दोन फवारण्या १० लिटर पाण्यात मिसळून कराव्यात. पहिली फवारणी ५० टक्के फुलोरावर असताना करावी. निंबोळी अर्क ५ टक्के किंवा एचएएनपीव्ही (१x१०९ पीओबी/मिली) ५०० एलई प्रती हेक्टर किंवा क्विनॉलफॉस २५ ईसी, २० मिली फवारणी करावी.

पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसानंतर दुसरी फवारणी करावी. यात इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के एसजी ३ ग्रॅम किंवा ईथिऑन ५० टक्के ईसी २५ मिली किंवा फ्ल्युबेंडामाईड २० टक्के डब्ल्यूजी ५ ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रॅनीलिप्रोल १८.५ टक्के एससी २.५ मिली फवारणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000


No comments:

Post a Comment