जिल्हाधिकाऱ्यांचे नावे बनावट संदेशप्रकरणी गुन्हा दाखल
बुलडाणा, दि. 20 : जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांच्या
नावे उपविभागीय अधिकारी यांना बनावट संदेश पाठविणाऱ्या विरूद्ध बुलडाणा शहर पोलिस
ठाण्यात गुरूवारी, दि. 19 जानेवारी 2023 रोजी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी
सायबर गुन्हे शाखा तपास करीत असून तपासासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात येत आहे.
मेहकरचे उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांनी याप्रकरणी बुलडाणा
शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. श्री. राठोड हे जिल्हाधिकारी कार्यालयात
गुरूवारी पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रशिक्षणास आले होते. दरम्यान त्यांना
दुपारी दोन वाजताच्या सुमारास 8330007295 या क्रमांकावरून एक संदेश आला. या
संदेशाला उत्तर देताना आपण कोण आहात अशी विचारणा केल्यानंतर आपण जिल्हाधिकारी एच.
पी. तुम्मोड, आयएएस अशा आशयाचा संदेश पाठविला. श्री. राठोड यांना याबाबत साशंकता
वाटल्याने त्यांनी सदर व्हॉटस् ॲपची तपासणी केली असता सदर क्रमांकावर एच. पी.
तुम्मोड, आयएएस आणि डीपी ठेवलेला असल्याचे आढळून आले. सदरील मोबाईलधारक व्यक्ती हा
बनावट असू शकत असल्याने श्री. राठोड यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
नागरिकांनी त्यांच्या तक्रारी, समस्यांबाबत जिल्हाधिकारी
कार्यालयात रितसर लेखी तक्रार नोंदवावी. आवश्यकता असल्यास प्रत्यक्ष भेटून निवेदन
द्यावे. सबब जिल्हाधिकारी यांच्या नावे येणाऱ्या व्हॉटस् ॲपवरील बनावट संदेशाला
कोणताही प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
0000000
जिल्ह्यात कुष्ठरोगाबाबत 30 जानेवारीपासून स्पर्श जनजागृती अभियान
बुलडाणा, दि. 20 : कुष्ठरोग आरोग्य सेवा यांच्यावतीने 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2023 दरम्यान कुष्ठरोगाबाबत व्यापक स्पर्श जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी गुरुवारी, दि. 19 जानेवारी 2023 रोजी जिल्हा समन्वय समितीची बैठक घेऊन आढावा घेतला. पंधरवाड्यात विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम. एम. राठोड, साथरोग अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे, डॉ. सुशिल चव्हाण, सहाय्यक संचालक डॉ. एच. एस. पवार, जिल्हा आशा समन्वयक वर्षा जाधव, जयेश राणे उपस्थित होते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत दरवर्षी 30 जोनवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान कुष्ठरोगाविषयी शास्त्रीय माहिती देऊन विविध आरोग्य शिक्षणाचे कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्हयातील प्रत्येक गावात ग्रामसभा, ग्रामसभेत घोषणापत्र वाचन, भाषण व प्रतिज्ञा घेण्याचे कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
जनजागृती कार्यक्रमात शाळेमध्ये प्रार्थनेनंतर कुष्ठरोगाबाबत प्रतिज्ञाचे वाचन करण्यात येईल. शाळेतील सूचना फलकावर कुष्ठरोगाबाबत संदेश लिहावे. शाळेमध्ये चावडी नाटक, प्रश्न मंजूषा, निबंध स्पर्धा, कुष्ठरोगावरील गाणी, कविता वाचन, रांगोळी स्पर्धा, कटपुथली, चित्रकला स्पर्धा, पथनाट्य व कुष्ठरोगावरील म्हणी, घोषवाक्य स्पर्धा आदी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थी प्रभात फेरी, तसेच कुष्ठरोग दौड ‘मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात देणार आहे. स्थानिक महिला मंडळ, बचतगट, तरुण मंडळ यांच्या सभा घेण्यात येणार आहे. खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्या कार्यशाळा, बाजाराच्या ठिकाणी प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. आरोग्य मेळावा घेऊन निदान लवकर करून उपचाराचे महत्व सांगण्यात देणार आहे. समाजामध्ये कुष्ठरोगाबाबतची शास्त्रीय माहिती देण्यात येणार आहे.
00000
--
No comments:
Post a Comment