Friday, 27 April 2018

जिल्ह्यात राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा मिशन राबविणार..



·        30 एप्रिल रोजी होणाऱ्या ग्रामसभांमध्ये माहिती देण्याचे आवाहन
·        लाभार्थी पडताळणी व अतिरिक्त माहिती संकलनासाठी मोहिम
 बुलडाणा,दि.27 : जिल्ह्यात राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा मिशन राबविण्यात येणार आहे.  सदर अभियान यशस्वी करण्यासाठी व लाभार्थ्यांपर्यंत परिणामकारक रितीने पोहोचविणेकरीता योजनेच्या तपशीलाविषयी माहिती देणे अत्यावश्यक आहे. याशिवाय योजना परिणामकारक रितीने राबविणेकरीता प्रत्येक लाभार्थ्यांची काही अतिरिक्त माहिती जमा करणे आवश्यक आहे. त्याची पहिली पायरी म्हणून सध्या सुरू असलेल्या ग्राम स्वराज्य अभियानादरम्यान 30 एप्रिल रोजी आयुष्यमान भारत दिवस साजरा केल्या जाणार आहे. या दिवशी आयोजित ग्रामसभांमधून लाभार्थी पडताळणी व अतिरिक्त माहितीचे संकलन करण्यात येणार आहे. याकरीता 21 मे 2018 पर्यंत जिल्ह्यात मोहिमच राबविण्यात येणार आहे.
   या मोहिमेत योजनेचा लाभाबद्दल माहिती देणे, विद्यमान लाभार्थ्यांच्या यादीचे प्रमाणीकरण करणे व जेथे ग्रामसेवक, एएनएम व आशा आहेत तेथे त्यांच्या माध्यमातून अतिरिक्त माहितीचे संकलन करणे. यामध्ये लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक, शिधापत्रिका क्रमांक व कुटूंबाच्या सद्यस्थितीमधील बदल या माहितीचा समावेश असणार आहे. सदर ग्रामसभांमध्ये उपस्थित न राहीलेल्या लाभार्थ्यांची माहिती 1 ते 8 मे 2018 दरम्यान गृहभेटीद्वारे आशा / आरोग्य सेविकांच्या माध्यमातून संकलीत होणार आहे. याकरीता आशा, ग्रामसेवक, आरोग्य सेविका, आरोग्य कर्मचारी यांची प्रशिक्षणे घेण्यात येणार आहे. ही माहिती 8 ते 21 मे 2018 दरम्यान संकेतस्थळावर अपलोड केल्या जाणार आहे. लाभार्थी यादीमध्ये समाविष्ट असलेल्या प्रत्येक कुटूंबास प्रतिवर्ष 5 लक्ष रूपये आरोग्य विम्याचे संरक्षण दिले जाणार आहे. या योजनेमधील पात्र लाभार्थ्यांना देशभरात कोणत्याही अंगीकृत रूग्णालयात विनामुल्य शस्त्रक्रीया व उपाचाराचा लाभ मिळणार आहे.    तरी नागरिकांनी 30 एप्रिल 2018 रोजी आयोजित ग्रामसभांमध्ये माहिती संकलीत करण्यास सहकार्य करावे. जेणेकरून अधिकाधिक कुटूंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा मिशन योजनेचा लाभ देता येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी केले आहे.
                                                            ******
              वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षितता पाळावी
-         संदीप डोईफोडे
·        रस्ता सुरक्षा अभियान
 बुलडाणा,दि.27 : राज्यभरात सुरक्षित रस्ता वाहतूकीसाठी शासन स्तरावर विविध प्रयत्न केल्या जातात. सध्या रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. रस्त्यावर चालताना वाहतूकीचे नियम पाळले पाहिजे. वाहतुकीच्या नियमांचे पालन करून रस्तयावर सुरक्षितता पाळावी, असे आवाहन अप्पर पोलीस अधिक्षक संदीप डोईफोडे यांनी केले. जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. दरम्यान उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
  यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे वाहतुक अधिकारी ए. यु कचवे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पी. के तडवी आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात श्री. तडवी म्हणाले, रस्त्यामध्ये अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी ध्वनी प्रदुषणावरही लक्ष केंद्रीय केले पाहीजे. त्यासाठी नो हॉन्गिंग डे साजरे केले पाहिजे. यावेळी वाहनांना रिफ्लेक्टीव्ह टेप लावण्यात आलया. कार्यक्रमाचे आभार गतानन तनपुरे यांनी मानले. कार्यक्रमाला परिवहन कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
                                                                                    *********
चार गावांसाठी टॅंकर मंजूर
  • चिखली, शेगांव व सिं.राजा तालुक्यातील  गावांचा समावेश
बुलडाणा, दि.27 -  सिं.राजा तालुक्यातील किनगांव राजा, शेगांव तालुक्यातील गव्हाण व  चिखली  तालुक्यातील पळसखेड सपकाळ, धोडप येथील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता या चार गावांसाठी पाणीपुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे.  कि.राजा गावाची लोकसंख्या 5500 असून येथे दोन टँकर दररोज 1 लक्ष 54 हजार लीटर पाणीपुरवठा करणार आहे.  तसेच गव्हाण गावची लोकसंख्या 1700 असून येथे एक टँकर मंजूर आहे. त्याचप्रमाणे चिखली तालुक्यातील पळसखेड सपकाळ गावची लोकसंख्या 700 आहे. या गावासाठी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. धोडप येथील 1600 लोकसंख्येकरीता एक टॅंकर दररोज 38 हजार लीटर पाण्याचा पुरवठा करणार आहे.  या सर्व टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
**********
अवैध दारू विक्रीला प्रतिबंध घालण्यासाठी गावागावात ग्रामरक्षक दल
  • ग्रामसभेमध्ये अधिसूचनेचे होणार वाचन
  • ग्रामपंचायतींनी ग्रामरक्षक दल स्थापन करण्याचे प्रस्ताव सादर करावे
बुलडाणा, दि.27 -  महाराष्ट्र दारूबदी (सुधारणा) अधिनियम 2016 अन्वये गावागावात  ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्याची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील मद्यपींची वाढती संख्या व त्याचे समाजावर होणारे दुष्परीणाम, तसेच मद्यपींच्या गैरवर्तणुकीमुळे महिलांना होणारा त्रास, युवा पिढीच्या मनावर होणार परिणाम यावर उपाययोजना म्हणून शासकीय यंत्रणेसोबत जनसहभागाची साथ घेवून अवैध मद्य निर्मिती व विक्री यावर प्रभावी नियंत्रण राखण्यासाठी ग्रामरक्षक दल महत्वाची भूमिका अदा करणार आहे.  त्याचप्रमाणे अवैध दारू निर्मिती व विक्री यावर सुद्धा प्रभावी नियंत्रण या दलाच्या माध्यमातून ठेवण्यात येणार आहे.
   महाराष्ट्र दिनी 1 मे 2018 रोजी होणाऱ्या ग्रामसभांमध्ये  ग्रामरक्षक दल स्थापण्याबाबतच्या अधिसूचनेचे वाचन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आहेत. त्यानुसार अवैध दारू विक्रीला प्रतिबंध घालण्यासाठी जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी यामध्ये सहभाग घेवून ग्रामरक्षक दल स्थापन करण्याचे प्रस्ताव संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करावे. ग्रामपंचायतींनी ठरावाद्वारे किंवा ग्रामसभेच्या 25 टक्क्याहुन कमी नसतील इतक्या महिला मतदारांनी स्वाक्षरीत केलेल्या अर्जाद्वारे ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलाविण्याकरीता संबंधित उपविभागीय अधिकारी यांना विनंती करावी. ग्रामसभेस ग्रामरक्षक दलाचे सदस्य म्हणुन नियुक्त करावयाच्या व्यक्तीची शिफारस करता येणार आहे. दलाच्या सदस्याची मुदत 2 वर्ष इतकी असणार आहे. ग्रामरक्षक दल ग्रामपंचायतीच्या सदस्यसंख्येएवढे असणार आहे. मात्र त्यांची संख्या 11 पेक्षा कमी असणार नाही.  दलात महिलांची व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील व्यक्तींचे पुरेसे प्रतिनिधीत्व असावे लागणार आहे.
  ग्रामरक्षक दलामध्ये सदस्य असणारी व्यक्ती त्या गावची मतदार असली पाहिजे, दारूबंदीच्या संदर्भात उल्लेखनिय कामगिरी असणारी पाहिजे, तसेच ती व्यक्ती दारू पिणारी नसावी, अशा व्यक्तीवर 3 वर्षापेक्षा जास्त शिक्षेची तरतुद असेल, असा भारतीय दंड संहीता किंवा इतर कोणत्याही अधिनियमाखाली कोणताही गुन्हा, त्या व्यक्तीविरूद्ध भुतकाळात नोंदविलेला नसला पाहिजे, अशी पात्रता धारण करणारा व्यक्ती ग्रामरक्षक दलामध्ये सहभागी होवू शकतो. ग्रामरक्षक दलाचे महत्वपूर्ण कर्तव्य म्हणजे गावात बेकायदेशीरपणे दारू तयार करणे, वाहतूक करणे, जवळ बाळगणे, विक्री करणे या विषयी पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग यांना लेखी कळविणे. दारूच्या सेवनामुळे सार्वजनिक ठिकाणी उपद्रवास कारणीभूत ठरणाऱ्या आणि उपद्रव निर्माण करणाऱ्या लोकांना प्रतिबंध करणे, अशा व्यक्तींचे समुपदेशन करावे किंवा ग्रामरक्षक दलाच्या तीन सदस्यांच्या सहीने लेखी इशारा द्यावा. व्यसनमुक्ती कार्यक्रमाचे आयोजन करावे. मद्याच्या प्रतिकूल परिणामाविषयी जनजागृती निर्माण करावी. राज्य पोलीस विभाग किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर कायदेशीर कार्यवाहीमध्ये सहकार्य करणे व खटल्याच्या वेळी पंच/साक्षीदार म्हणून उपस्थित राहण्याचे जबाबदारी ग्रामरक्षक दलाची असणार आहे.   
  या दलाचा प्रत्येक सदस्य कोणताही अपराध घडल्याबाबतची आणि कोणताही अपराध करण्याचा हेतू असल्याबाबतची, तयारी होत असल्याची त्याला कळेल अशी माहिती त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा याबाबत प्राधिकृत केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला देण्यास बांधील असणार आहे. तरी ग्रामपंचायतींनी ग्रामरक्षक दल स्थापन करण्याचे प्रस्ताव संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालयास सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी केले आहे.
                                                            ******

No comments:

Post a Comment