राखीव जागेवर निवडून आलेल्या उमेदवारांसाठी जात
वैधता प्रमाणपत्र अनिवार्य
सादर करण्याचे जिल्हाधिकारी
कार्यालयाचे आवाहन
बुलडाणा, दि. 12 - राज्य निवडणूक आयोग,
मुंबई यांचेकडून जिल्ह्यातील माहे नोव्हेंबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत मुदत
संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणूका झाल्या. यामध्ये राखीव
जागेवर निवडणूक लढवून निवडून आलेल्या सदस्यांनी त्यांचे जातीचे वैधता प्रमाणपत्र विहीत
मुदतीत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे सादर करणे अनिवार्य आहे.
तरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, पोट निवडणूकांमध्ये
राखीव जागेवर निवडणूक लढवून निवडून आलेल्या सरपंच, सदस्यांनी त्यांचे जातीचे वैधता
प्रमाणपत्र विहीत मुदतीत जात पडताळणी समिती यांचेकडून प्राप्त करून घ्यावी. त्याची
छायांकित प्रत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे सादर करावी. अन्यथा आपले
सरपंच/सदस्यपद अनर्ह ठरू शकते, याची नोंद राखीव जागेवर निवडणूक लढवून निवडून
आलेल्या सरपंच, सदस्यांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
******
अनु.जाती मुलींची शासकीय निवासी शाळा शेगांव येथे
प्रवेश प्रकिया सुरु
बुलडाणा, दि. 12 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
विभागतंर्गत अनु. जाती मुलींची शासकीय
निवासी शाळा, शेगांव, जि.बुलडाणा येथील निवासी शाळेत प्रवेश देण्यात येत आहे. येथे
2011-12 पासून सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू आहे. या शाळेमध्ये शैक्षणिक सत्र
2018-19 करिता 6 वी साठी संपूर्ण नवीन प्रवेश तथा इयेत्ता 7 वी ते 10 वी मधील
रिक्त जागांसाठी अनु. जाती, अनु.जमाती,विजाभज, विमाप्र व अपंग या प्रवर्गातील विद्यार्थींनींना
प्रवेश देण्यात येणार आहे. या प्रवेशासाठी दिनांक 1 मे 2018 पासून कार्यालयीन वेळेत तथा
सुटीचे दिवस वगळून प्रवेश अर्ज विनामुल्य मिळणार आहेत..
अर्ज भरून देण्याची अंतिम तारीख
15 जून 2018 आहे. सदरचे प्रवेश शासनाच्या सामाजिक आरक्षणाच्या ठरविलेल्या
टक्केवारीनुसार दिले जातील. तरी इच्छूक
विद्यार्थींनींनी अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा, शेगांव येथे संपर्क साधावा. तसेच मुख्याध्यापक ए.व्ही नागपुरे यांच्या 9860139781 व
कनिष्ठ लिपीक एन जी तरपुडे यांच्या 9766009951
क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन
मुख्याध्यापक ए.व्ही नागपुरे यांनी केले आहे.
******
तालुकास्तरीय स्मार्ट ग्राममध्ये ग्रामपंचायतींची
निवड
- स्मार्ट ग्राम योजनेतून साधल्या जाणार पर्यावरण
संतुलित विकास
- निवडलेल्या ग्रामपंचायतीला 10 लक्ष रूपये
पारितोषिक
बुलडाणा, दि. 12 – राज्यातील सर्व भागातील
सामाजिक व आर्थिक परिस्थिती विचारात घेवून पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजनेच्या
निकष, स्वरूपात बदल करून स्मार्ट ग्राम योजना आणली आहे. या योजनेत प्रत्येक
ग्रामपंचायतीस सहभागी होण्याची समान संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानुसार
तालुकास्तरीय समितीने ग्रामपंचायतींची तपासणी केल्याप्रमाणे तसेच हरकती प्राप्त
ग्रामपंचायतीचे जिल्हास्तरीय समितीने पुनर्मुल्यांकन केल्यानुसार जिल्ह्यातील
तालुकास्तरीय स्मार्ट ग्राममध्ये ग्रामपंचायतींची निवड केली आहे.
तालुका स्मार्ट ग्रामपंचायतीला 10 लक्ष रूपये
पारितोषिक देण्यात येणार आहे. या निवडलेल्या ग्रामपंचायतीचे चालू महिन्यात जिल्हास्तरीय
पुनर्मुल्यांकन समितीद्वारे मुल्यमापन करून जिल्हा स्मार्ट ग्राम म्हणून घोषीत करण्यात
येणार आहे. तालुका स्मार्टमध्ये निवडलेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे : बुलडाणा –
सावळी, मलकापूर – निंबारी, शेगांव – मोरगांव डी, सिंदखेड राजा – भंडारी, दे.राजा –
सिनगांव जहागीर, जळगांव जामोद – बोराळा खु, मोताळा – शेलगांव बाजार, खामगांव –
कंचनपूर, नांदुरा – वसाडी बु, संग्रामपूर – रूधाना, चिखली – मलगी, लोणार – वझर आघव
आणि मेहकर – दादुलगव्हाण.
या सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक
यांचे जि.प अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे, उपाध्यक्षा श्रीमती मंगलाताई रायपूरे, मुख्य
कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, सभापती श्रीमती श्वेताताई महाले, सभापती डॉ. गोपाल
गव्हाणे, सभापती दिनकर देशमुख, सभापती राजेंद्र उमाळे, अति. मुख्य कार्यकारी
अधिकारी बी. बी नेमाने आदींनी कौतुक केले आहे, असे उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांनी
कळविले आहे.
*******
मानसेवी होमगार्ड सदस्यत्वासाठी होणार
शारीरिक चाचणी
- 17 एप्रिल 2018 रोजी सकाळी 7 वाजता चाचणीचे
आयोजन
बुलडाणा, दि. 12 – जिल्ह्यातील 7 तालुका पथकानुसार रिक्त अनुशेषाप्रमाणे
पुरूष व महिला होमगार्ड्सची सदस्य नोंदणी होणार आहे. त्याकरिता येत्या मंगळवार, 17
जुलै 2018 रोजी सकाळी 7 वाजता पोलीस मुख्यालय मैदान, बुलडाणा येथे शारिरीक चाचणीचे
आयोजन करण्यात आले आहे.
नोंदणीकरीता अनुशेषातंर्गत पुरूष सदस्यांची 64
तर महिला सदस्यांची 115 पदे आहेत. त्यामध्ये बुलडाणा पथकामध्ये पुरूष 16 व महिला 22,
चिखली पथकात महिला 9, खामगांवमध्ये पुरूष 7 व महिला 25, जळगांव जामोदमध्ये पुरूष
14 व महिला 12, मलकापूरमध्ये पुरूष 6 व महिला 14, दे.राजा पथकामध्ये पुरूष 4 व
महिला 18, मेहकर पथकामध्ये पुरूष 17 व महिला 15 अशाप्रकारे एकूण पुरूष पदासाठी 64
व महिलांच्या 115 पदांसाठी चाचणी होणार आहे. सदस्यत्वासाठी शिक्षण कमीत कती इयत्ता 10 वी उत्तीर्ण
असावी. उंची पुरूषांसाठी 162 से.मी व महिलांसाठी 150 से.मी असणे आवश्यक असून वय 20
वर्ष पूर्ण व 50 वर्षांचे आत असावे. गोळाफेक चाचणीसाठी पुरूषांना 07.260 किलोग्रॅम व महिलांसाठी 4 किलो
वजनाचा गोळा असावा. धावण्यामध्ये पुरूषांना 1600 मीटर व महिला सदस्यांसाठी 800
मीटर अंतर कापावे लागणार आहे. उमेदवारास विहीत केलेल्या वेळेत धावणे व गोळाफेक
शारिरीक चाचणी द्यावी लागणार आहे.
निवड होऊन पात्र ठरलेले उमेदवार हे वेतनी सेवेत
असतील, तर त्यांना कार्यालयाचे अथवा मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र, माजी सैनिक अथवा एनसीसी
प्रमाणपत्रधारक व इतर तपशिलाच्या पृष्ट्यार्थ जोडावेत. संबंधित प्रमाणपत्रे तसेच इयत्ता
10 वीची गुणपत्रिका व बोर्ड सर्टीफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला सर्व कागदपत्रांची
छायांकित प्रत, नोंदणीच्या वेळी उमेदवारांस स्वखर्चाने यावे लाणार आहे. तसेच नोंदणीच्या
वेळी कोणतीही अपघाती घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहणार
आहे. उमेदवारांची निवड पुर्णपणे गुणवत्त्तेनुसार करण्यात येईल. उमेदवारांनी येताना
सोबत तीन रंगीत छायाचित्र सोबत आणावेत. अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील होमगार्ड
पथकाचे कार्यालयात संपर्क साधावा, असे जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अप्पर पोलीस
अधिक्षक संदीप डोईफोडे यांनी कळविले आहे.
************
तालुका स्तरीय लोकशाही दिनाचे 16 एप्रिल रोजी आयोजन
बुलडाणा, दि.12 : नागरिकांच्या
तक्रारींचा निपटारा जलदगतीने व्हावा, यासाठी तालुका
स्तरीय लोकशाही दिन संबंधित तहसिल कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या
सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार या महिन्याच्या तिसऱ्या सेामवारी तालुकास्तरीय
लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, 16 एप्रिल 2018 रोजी सकाळी 11 वाजता तहसील
कार्यालयात होणार आहे. या दिवशी तहसीलदार
व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करणार
आहेत. जिल्ह्यातील शासकीय, निम
शासकीय कार्यालयातील अडचणी व तक्रारी संबंधी ज्या नागरिकांना आपली निवेदने लोकशाही
दिनी सादर करावयाची आहेत, त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या नावे विहित
नमुन्यात अर्ज करावा. विहित नमुन्यातील अर्ज व सोबत अर्जाची आगाऊ प्रत जोडून
लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी पाठविणे आवश्यक आहे.
अर्जदाराने
लोकशाही दिनाच्या दिवशी मूळ अर्जासोबत उपस्थित रहावे. अन्य व्यक्तीमार्फत
पाठविलेली निवेदने स्विकारली जाणार नाहीत. तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1
महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच
तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर
करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही.
तक्रार, निवेदन
वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/
अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित
नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध
न्यायालयात, प्राधिकाऱ्यां-कडील, लोकआयुक्त
यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक
कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल, असे तहसलीदार यांनी कळविले आहे
********
मलकापूर शहरातील शनिवारचा आठवडी बाजार रविवारी..
बुलडाणा, दि.12 : येत्या
शनिवारला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असल्यामुळे मलकापूर शहरात मिरवणूक आहे. त्यामुळे
मलकापूर येथील शनिवारला भरणारा आठवडी बाजार पुढील दिवशी रविवार 15 एप्रिल 2018 रोजी
भरविण्यात येणार आहे. तरी शहरात 14 एप्रिल 2018 रोजी भरणारा आठवडी बाजार रविवारला
भरणार आहे. याबाबत नागरिकांनी नोंद घ्याव. हा आदेश 14 एप्रिल 2018 पुरताच मर्यादीत
आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
******
No comments:
Post a Comment