Monday, 23 April 2018

सिंचनाची मिळतील गोड फळे.. शेतात घ्यावे शेततळे..!



·        भोसा ता. मेहकर येथील प्रभाकर खुरद यांची शेततळ्यावर फळबाग लागवड
·        शेततळ्याच्या पाण्यावर संरक्षित सिंचनसेंद्रीय कलिंगडाचेही उत्पादन
  बुलडाणा, दि. 21 :   सिंचनाची मिळतील गोड फळे.. शेतात घ्यावे शेततळे.. या उक्तीचा प्रत्यय बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात भोसा येथे येत आहे. या उक्तीनुसार भोसा येथील शेतकरी प्रभाकर खुरद यांनी शेततळ्याच्या पाण्यावर तब्बल 30 एकरावर फळबाग लागवड केली आहे. राष्ट्रीय फळबाग मिशन अंतर्गत 45 बाय 45 आकाराचे शेततळ्याचे निर्माण त्यांनी केले आणि कायापालट झाला.  सन 2016-17 या आर्थिक वर्षात शेततळ्याची निर्मिती झाली व त्यांचे जीवनमान समृद्धीच्या मार्गावर वेगाने धावू लागले. 
  राष्ट्रीय फळबाग मिशनच्या शेततळ्यावर आज 30 एकर शेतावर डाळींब, संत्र्याची फळबाग ते घेत आहेत. त्याचप्रमाणे सेंद्रीय पद्धतीने कलिंगडाची लावगड करून लाखो रूपयांचे उत्पन्न त्यांनी घेतले आहे. शेततळ्यापूर्वी केवळ 1200 संत्रा झाडे असणाऱ्या प्रभाकररावांनी त्यांच्या शेतात शेततळ्याच्या पाण्यावर आणखी 1600 झाडांची वाढ केली. आजरोजी त्यांच्या 20 एकर शेतावर 2800 संत्रा फळपिकाची झाडे आहेत. संत्रा फळपिकामध्ये दोन ओळीतील अंतर 18 बाय 18 मीटर ठेवले आहे. ते केवळ संत्रा फळपिकावरच थांबले नाही, तर त्यांनी  त्यासोबतच डाळींब फळबागेची लागवडही केली आहे.  डाळींबाची पाच एकर शेतावर 1400  झाडांची लागवड केली. तसेच या फळपिकासोबतच हंगामी पिक असलेल्या कलिंगडाचीही त्यांनी लागवड केली आहे. पाच एकर शेतावर मल्चिंग पद्धतीने कलिंगड पिक घेवून संपूर्ण फळपिकाची शेती करण्याचा त्यांनी प्रयत्न चालविला आहे.  अशाप्रकारे संपूर्ण 30 एकर शेतावर शेततळ्याच्या पाण्यावर त्यांच्याकडून फळबाग लागवड करण्यात आली आहे.
  पारंपारिक शेतीला फाटा देत प्रभाकर खुरद यांनी  अन्य पिकांच्या शेतीला फळबागेची जोड दिली आहे.  इयत्ता 12 वी शिक्षण घेतलेल्या श्री. खुरद यांचे शेतीतील ज्ञान मात्र शेतीमधील पीएचडी धारकालाही लाजवेल असे आहे. शेततळ्यातील पाणी विहीरींमध्ये सोडून विहीरीतून ठिबकद्वारे फळबागांना देण्याची सुविधा त्यांनी निर्माण केली आहे. त्यामुळे शेततळ्यातील पाण्याचे संरक्षित सिंचनासाठी मोलाची साथ मिळत आहे. पावसाळ्यात शेततळ्यात साठविलेले पाणी या फळबागांना उन्हाळ्यात संजीवनीपेक्षा कमी ठरत  नाही. शेततळ्याने दिलेले ही मोलाची साथ त्यांच्या समृद्धीला निश्चितच कारक ठरत आहे.
  केवळ पारंपारिक पिके घेणारा मेहकर तालुक्यातील भोसा पट्टा आज फळबगांकडे वळला आहे. त्यामध्ये कुठेतरी शेततळ्याची भूमिका मोलाची ठरते. फळबाग शेतीमधील उत्पन्नामुळे श्री. खुरद यांची मुले शिक्षणासाठी पुणे येथे ओहत. दोन मुलापैकी एक मुलगा पुण्यातील सिंहगड शैक्षणिक संकुलामध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे, तर दुसरा मुलगा एमआयटीमध्ये आहे. शेततळ्यातील पाण्यावर प्रभाकर खुरद यांनी  फळबाग फुलवित यशाचा मार्ग मिळविला आहे. तब्बल 1 करोड लीटर पाणीसाठा असलेले शेततळे केवळ पिकांची तहान भागवित नाही, तर त्यांच्या गोठ्यातील मुक्या जनावरांचीसुद्धा तृष्णातृप्ती करीत आहे. त्यामुळे जनावरांना उन्हाळ्यातील भोसा गावशिवारातील पाणी टंचाईचा सामना करावा लागत नाही.  राष्ट्रीय फळबाग मिशनमधील हे शेततळे अन्य शेतकऱ्यांनासुद्धा खुणावत आहे. फळबागांकडे आकर्षित करीत आहे. संत्रा, डाळींबासोबतच हंगामी पिक असलेल्या कलिंगडाचे उत्पादनही श्री. खुरद मोठ्या प्रमाणावर घेत आहे. मल्चिंग पद्धतीने कलिंगडाची लागवड करून त्यांनी जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. या पद्धतीमुळे आणि शेततळ्यातील पाण्यामुळे लाखो रूपयांचे उत्पन्न या कलिंगड शेतीने प्रभाकर खुरद यांना मिळवून दिले आहे. संत्रा फळपिकापासून सन 2017 मध्ये जवळपास 12 लक्ष रूपयांचे प्राप्त झाले असून यावर्षीच्या हंगामात पुढील 15 ते 20 दिवसांमध्ये काढणी सुरू होत आहे. केवळ पाणी नाही.. पाणी नाही म्हणून शेतीबाबत ओरडणाऱ्यांना प्रभाकर खुरद यांच्या शेततळ्याने निराशा झटकून कामाला लागण्याचा संदेशच दिला आहे. शेततळ्यासाठी शासनही अनुदान देते. या अनुदानाचा लाभ घेत शेतकऱ्यांनी शाश्वत सिंचन देणाऱ्या शेततळ्यांकडे वळले पाहिजे.  श्री. खुरद यांना 3.60 लक्ष रूपये अनुदान शेततळ्याच्या निर्मितीनंतर मिळाले आहे. केवळ संरक्षित सिंचनाची सुविधाच नाही.. तर शेतीमधील मिळकतीचा जब्बर स्त्रोतही शेततळे निर्माण करून देते.. याचे मुर्तिमंत उदाहरण म्हणजे भोसा येथील प्रभाकर खुरद यांचे शेततळे ठरले आहे. 
     *******
मेहकर उपविभागातील पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये  महाराष्ट्र भुजल अधिनियम लागू
  • मेहकर तालुक्यातील 75 व लोणार तालुक्यात 82 गावांमध्ये पाणीटंचाई घोषीत
बुलडाणा, दि.23 -  मेहकर तालुक्यात पाणी टंचाई भासण्याची शक्यता असणाऱ्या 75 व लोणार तालुक्यातील 82 गावांमध्ये उपविभागीय अधिकारी यांनी पाणीटंचाई घोषीत केली आहे. या गावांमध्ये महाराष्ट्र भुजल अधिनियम 2009 लागू करण्यात आला आहे. या अधिनियमानुसार अधिसूचित सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे 500 मिटरच्या अंतरामध्ये कोणतीही व्यक्ती, कोणत्याही प्रयोजनासाठी कोणत्याही विहीरीचे खोदकाम करणार नाही.
  भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने पुरविलेल्या माहितीच्या आधारे सार्वजनिक पिण्याच्या स्त्रोतांभोवती निश्चित व अधिसुचित केलेल्या प्रभाव क्षेत्रात कोणतीही व्यक्ती कोणत्याही प्रयोजनासाठी विहीरीचे खोदकाम करणार नाही. प्रभाव क्षेत्रामधील किंवा सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतापासून एक किलोमीटर अंतरामध्ये यापैकी जे अधिक असेल अशा क्षेत्रातील अशी विहीर तात्पुरती बंद करणे, भूजल काढण्यासाठी विहीत करण्याच्या दृष्टीने विनीयम करण्यात येईल. भूजल पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होईल अशी कोणतहीही कृती कुणीही करणार नाही. या अधिनियमनातील विविध तरतुदींचा भंग झाल्यास दंड व शिक्षेकरीता संबंधित तहसिलदारांनी त्वरित अहवाल सादर करावयाचा आहे. पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे कायम व्यवस्थापन करण्यामध्ये आणि पाणी टंचाईच्या काळात स्त्रेातांचे संरक्षण करण्यासाठी ग्रामपंचायत जिल्हा प्राधिकरणास मदत करेल, असे मेहकर उपविभागीय अधिकारी यांनी कळविले आहे.
                                                            *****
                   गाळ उपसा करणा-या जे.सी.बी. ऑपरेटर्सच्या भोजनाची केली व्यवस्था
·                    सिंदखेड राजा तहसिल कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दिला एक दिवसाचा पगार
    बुलडाणा, दि. 23 :  जिल्‍हा दुष्‍काळ मुक्‍त करण्‍यासाठी व सुजलाम सुफलाम बनविण्‍यासाठी भारतीय जैन संघटना व जिल्‍हा प्रशासन यांच्‍या मार्फत सिंदखेडराजा तालुक्यात गाळ उपासण्‍याचे काम सर्वत्र सुरू आहे.   या कामाला आपलाही खारीचा वाटा असावा म्‍हणून उपविभागीय अधिकारी विवेक काळे यांच्‍या आवाहनानुसार तहसिलदार संतोष कणसे यांच्‍यामार्गदर्शनाखली  सिंदखेडराजा तहसिल कार्यालया मधील सर्व कर्मचा-यांनी आपला एक दिवसाचा पगार हा जे.सी.बी. ऑपरेटरांना भोजना करीता दिला आहे
    त्‍या मुळे गाळ उपसण्‍याच्‍या कामाला गती आली असून या कर्मचा-यांनी केलेल्‍या मदतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 सिंदखेडराजा तालुक्‍यात 10 जे.सी.बी.च्‍या मदतीने तलाव आणि नदीतील गाळ उपसण्‍याचे काम दिवस रात्र सुरू आहे. गाळ उपसल्‍यामुळे भविष्यात मोठा जलस्‍त्रोत वाढणार आहे. आणि पाण्‍याची पातळी हि वाढणारआहे. सदर गाळ उपसांचे काम हे भारतीय जैन संघटना व महसूल प्रशासनाच्‍यावतीने होत आहे. हे काम करतांना सामाजीक जानीव ठेउन महसूल कर्मचारी  संघटनेच्‍या वतीने जे.सी.बी. ऑपरेटर यांना जेवनाची व्‍यवस्‍था व्‍हावी आणि हे काम सातत्‍यांने सुरू रहावे या करीता एक दिवसाचा पगार हा कर्मचा-यांनी जमा केला असून तहसिलदार संतोष कणसे यांच्‍या  मार्गदर्शनाखाली जे.सी.बी. ऑपरेटर यांना भोजन व्‍यवस्‍था दररोज करण्‍यात येत आहे.

No comments:

Post a Comment