Friday, 13 April 2018

उज्ज्वला योजनेतून जिल्ह्याची निर्धुर स्वयंपाकगृहाकडे वाटचाल…!


उज्ज्वला योजनेतून जिल्ह्याची निर्धुर स्वयंपाकगृहाकडे वाटचाल…!
·        जिल्ह्यात 68 हजार 834 लाभार्थ्यांनी घेतला लाभ
बुलडाणा, दि‍. 13 – केंद्र शासनाने  उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून घराघरात धुरमुक्त अर्थातच निर्धुर स्वयंपाकगृह करण्याचा निर्णय घेतला. या योजनेतून महिलांना आरोग्याच्यादृष्टीने सुदृढतेकडे जाण्याचा मार्गही गवसला. देशामध्ये मोठ्या प्रमाणावर या योजनेचे लाभार्थी करण्यात आले. त्याला जिल्ह्याचाही अपवाद नाही. राज्यात या योजनेतून 18 लक्ष 55 हजार महिलांना लाभ देण्यात आला तर जिल्ह्यामध्ये 68 हजार 834 लाभार्थ्यांना गॅसचे वितरण करण्यात आले. त्यामुळे निश्चितच जिल्ह्याची वाटचाल निर्धुर स्वयंपाकगृहाच्या दिशेने होत आहे.
   या योजनेच्या देशपातळीवरील लाभार्थ्यांचा आकडा मोठा आहे. देशात 4 कोटी 82 लक्ष एकूण लाभार्थ्यांपैकी 3 कोटी 56 लक्ष लाभार्थ्यांना गॅसचे वाटप करण्यात आले. राज्यात 26 लक्ष 4 हजार पैकी 18 लक्ष 55 हजार लाभार्थी निर्धुर स्वयंपाकगृहाचा अनुभव घेत आहे. बुलडाणा जिल्ह्यात एकूण 99 हजार 185 लाभार्थ्यांपैकी 68 हजार 834 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. केंद्र शासनाने ग्राम स्वराज्य अभियान सुरू केले. त्यामध्ये 20 एप्रिल रोजी उज्ज्वला दिन पाळण्यात येणार आहे. संपूर्ण भारतभर ग्रामपंचायत पातळीवर एलपीजी पंचायतद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.
   ग्राम स्वराज्य अभियानाद्वारे उज्ज्वला योजनेत जिल्ह्यातील 22 गावांची निवड करण्यात आली आहे. या योजनेला मुदतवाढ मिळाली असून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्र्य रेषेखालील कार्डधारक, प्रधानमंत्री आवास योजना (गा्रमीण) अंत्योदय अन्न योजना, वन विभागात काम करणारे कामगार, अति मागास प्रवर्ग, उद्यानात काम करणारे कामगार अशा सात प्रवर्गांसाठी योजनेचा लाभ देण्यात येत आहे. योजनेतंर्गत गॅस जोडणीकरीता 1600 रूपये लागत असून लाभार्थी मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहे.
   या गॅस जोडणीमुळे जिल्ह्यातील स्वयंपाक घरांमध्ये निर्धुरता येणार आहे. यामुळे निश्चितच धुरामूळे होणा-या आजारांपासून जिल्ह्यातील नारीशक्तीचा बचाव होणार आहे. तसेच जंगलातील वृक्षतोड, इंधनासाठी होणारी वृक्षतोड  आपसूकच थांबणार आहे. परिणामी,  पर्यावरणाचा समतोल साधण्यासही मदत मिळणार आहे. अशाप्रकारे भारतीय नारीचे जीवनमान बदलविणाऱ्या उज्ज्वला योजनेचे यश नक्कीच स्पृहणीय आहे.
                                                            *******
जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन
बुलडाणा, दि‍. 13 – महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असते. त्यानुसार या एप्रिल महिन्याच्या महिला लोकशाही दिनाचे आयोजन निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात 16 एप्रिल 2018 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. तरी महिलांनी आपल्या वैयक्तिक तक्रारी असल्यास लोकशाही दिन कार्यवहीला उपस्थित राहून, तक्रारींचे निरसन करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे.
                                                                        ******
रोजगार विषयक सर्व सेवा महास्वयंम वेब पोर्टलवर उपलब्ध
·        रिक्त पदांची माहिती संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावी
बुलडाणा, दि‍. 13 – शासकीय, निमशासकीय कार्यालये, खाजगी आस्थापना, औद्योगिक आस्थापना तसेच अनुदानित, विनाअनुदानित शाळा, महाविद्यालये यांच्यासाठी रोजगार विषयक सर्व सेवा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग यांच्या www.mahaswayam.in वेबपोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार रिक्त पदांची माहिती या वेबपोर्टलवर सादर करावयाची आहे.
   माहे मार्च 2018 चे त्रैमासिक इ आर-1 विवरण पत्र या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करावी. सदर विवरण पत्र 1 एप्रिल 2018 पासून सुरू झाले असून विवरणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत 31 एप्रिल 2018 आहे. तरी सर्व आस्थापना / उद्योजक यांनी विहीत मुदतीत आपले विवरणपत्र ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर सादर करावे. ऑनलाईन ई आर -1 सादर करण्यात काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगर व उद्योजकता मार्गदर्शन्‍ केंद्र, बुलडाणा या कार्यालयाशी प्रत्यक्ष अथवा 07262-242342 क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा यांनी केले आहे.
                                                            *******
सहा गावांसाठी टॅंकर मंजूर
  • ढासाळवाडी, सावंगी भगत, पांग्री उगले, जयपूर, सुलतानपूर व किनगांव जट्टू  गावांचा समावेश
बुलडाणा, दि.13 -  सिंदखेड राजा तालुक्यातील सावंगी भगत, पांग्री उगले, जयपूर व लोणार तालुक्यातील सुलतानपूर, किनगांव जट्टू, बुलडाणा तालुक्यातील ढासाळवाडी येथील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता या सहा गावांसाठी पाणीपुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. सुलतानूपर गावाची लोकसंख्या 14000 असून येथे दोन टँकर मंजूर करण्यात आले आहे. सदर टँकर 2 लक्ष 70 हजार लिटर्स पाण्याचा पुरवठा करणार आहे.  तसेच किनगांव जट्टू  गावची लोकसंख्या 4550 असून येथे एक टँकर मंजूर आहे. त्याचप्रमाणे सिंदखेड राजा तालुक्यातील सावंगी भगत गावची लोकसंख्या 350 आहे. या गावासाठी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. पांग्री उगलेच्या 1380 लोकसंख्येकरीता एक टॅंकर, जयपूर येथील 1972 लोकसंख्येकरीता एक टँकर मंजूर करण्यात आले आहे.  ढासाळवाडीच्या 1205 लोकसंख्येकरीता एक टँकर मंजूर आहे. या सर्व टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
                                                            *******
दिव्यांग बांधवासाठी शिबिरांचे आयोजन
  • 20 व 21 एप्रिल 2018 रोजी आयोजन
  • शिबिराचा दिव्यांग बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन
  • खामगांव, बुलडाण्यात होणार शिबिर
बुलडाणा, दि.13   भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम मुंबई यांचे मार्फत जिल्ह्यात  20 व 21 एप्रिल 2018 रोजी शिबिरांचे आयेाजन करण्यात आले आहे. सदर शिबिर 20 एप्रिल रोजी निवासी मुक बधीर विद्यालय, दशहरा मैदान, अमडापूर नाका, खामगांव येथे व 21 एप्रिल 2018 रोजी सामाजिक न्याय भवन, बुलडाणा येथे आयोजित केल्या जाणार आहे. शिबिरात जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी कृत्रिम अवयव व साधने पुरविणेबाबत मोजमाप करण्यात येणार आहे. या शिबिरात दिव्यांग व्यक्तींना त्यांचे अपंगत्वानुसार आवश्यक लागणाऱ्या साहित्याचे मोजमाप करण्यात येणार आहे.  शिबिरासाठी येताना अपंग बांधवांनी 40 टक्के  अपंगत्व असलेले प्रमाणपत्र, आधार कार्ड, दरमहा 20 हजार रूपये प्रमाणे उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड/मतदान ओळखपत्र/ पेन्शन कार्ड आदी आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत.
   तरी जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी  या शिबिराचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, मुंबई व  जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, बुलडाणा यांनी केले आहे.
                                                                        *******

No comments:

Post a Comment