कर्जमाफीपासून
वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जासाठी 1 मेपर्यंत मुदतवाढ
- अर्ज सादर न करू शकलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा संधी
- एकरकमी कर्ज योजनेसाठी अर्ज सादर करण्यास 30
जूनपर्यंत मुदत
बुलडाणा,दि. 16 : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान
योजना – 2017 अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असून या योजनेची
अंमलबजावणी राज्यात सुरू आहे. या योजनेसाठी अर्ज दाखल करावयाच्या कालावधीत
शेतकऱ्यांना काही वैयक्तिक अथवा तांत्रिक कारणांमुळे विहीत दिनाकांपर्यंत ऑनलाईन
पद्धतीने अर्ज सादर करता आले नाहीत, अशा शेतकऱ्यांना शासनाने पुन्हा एक संधी दिली
असून अर्ज सादर करण्यास 1 मे 2018 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसेच दीड लाखावरील कर्जासाठी एकरकमी
योजनेत अर्ज सादर करण्यास 30 जुन 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
त्यानुसार सदर अर्ज भरण्याची सेवा
महाईसेवा केंद्र, ग्राहक सेवा केंद्र व ई संग्राम केंद्रावरून नि:शुल्क
पुरविण्याबाबत त्यांना निर्देशित करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांना स्वत:सुद्धा http://csmssy.mahaonline.gov.in या पोर्टलवर नोंदणी करून युजर आयडी व
पासवर्डच्या आधारे अर्ज सादर करता येईल. उपरोक्त कालावधीत आपले सरकार सेवा केंद्र,
सर्व महा ई सेवा केंद्र, ग्राहक सेवा केंद्र व ई संग्राम यांनी शेतकऱ्यांचे ऑनलाईन
अर्ज नि:शुल्क भरून द्यावे, असे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने निर्देशीत केले आहे.
***********
अनधिकृत होर्डींग्ज व जाहीरातींवर प्रतिबंधासाठी नोडल अधिकारी
नियुक्त
बुलडाणा,दि. 16 : शासन निर्णयानुसार नगर परिषद व नगर पंचायत
क्षेत्र वगळून अन्य क्षेत्रातील अनधिकृत जाहीराती, घोषणा फलक, होर्डींग्ज, पोस्टर्स
यावर कारवाई करण्याच्या तसेच अनधिकृत जाहीरातीवर प्रतिबंध होण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी
कार्यालय व तहसलि कार्यालय येथे नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत
काहीही तक्रार असल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करता येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात सहा. करमणूक कर अधिकारी के.व्ही पाटील नोडल
अधिकारी असून त्यांचा क्रमांक 7773970909 व 07262-242411, टोल फ्री क्रमांक 100 वर
संपर्क करावा. त्याचप्रमाणे तहसिल कार्यालयांमध्ये पुढीलप्रमाणे नोडल अधिकाऱ्यांची
नियुक्ती करण्यात आली आहे. बुलडाणा : निवासी नायब तहसिलदार जी.टी माळी संपर्क
क्रमांक 8668811664 व 07262-242283, चिखली
: निवासी नायब तहसिलदारआर.एस कानडजे संपर्क
क्रमांक 7350688852 व 07264-242068, खामगांव
: निवासी नायब तहसिलदार वाय. एस देशमुख संपर्क क्रमांक 9890566240 व 07263-252138,
शेगांव : निवासी नायब तहसिलदार डी. एल मुकुंदे संपर्क क्रमांक 9637252237 व
07265-202008, मलकापूर : निवासी नायब तहसिलदार जी. ई राजगडे संपर्क क्रमांक 9527557271
व 07267-222041, मोताळा : निवासी नायब तहसिलदार जे.डी देशमुख संपर्क क्रमांक 9921596555
व 07267-245231, नांदुरा : निवासी नायब तहसिलदार एन.आर पाटील संपर्क क्रमांक 9764341922
व 07265-220300, मेहकर : निवासी नायब तहसिलदारकु. मीरा जाधव संपर्क क्रमांक 8698221884
व 07268-244524, लोणार : निवासी नायब तहसिलदार आर. डी. डाके संपर्क क्रमांक 9922330658
व 07260-221358, सिंदखेड राजा : निवासी
नायब तहसिलदार डॉ. आस्मा मुजावर संपर्क क्रमांक 8805509491 व 07269-234236, दे.
राजा : निवासी नायब तहसिलदार मदन जाधव संपर्क क्रमांक 9422516277 व 07261-232068, जळगांव
जामोद : निवासी नायब तहसिलदार एन. जी घट्टे संपर्क क्रमांक 9766422598 व
07266-221426 आणि संग्रामपूर : निवासी नायब तहसिलदार डी. ए पवार संपर्क क्रमांक 9767453515
व 07266-232226 आहे. तरी नागरिकांनी संबंधित विषयाशी तक्रार असल्यास या नोडल
अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
******
होमगार्ड सदस्य नोंदणीच्या शारिरीक चाचण्यांमुळे रस्ता
वाहतुकीमध्ये बदल
बुलडाणा,दि. 16 : होमगार्ड कार्यालय, बुलडाणा यांचे अधिनस्त
असलेल्या पथक निहाय अनुशेष भरून काढण्यासाठी होमगार्ड सदस्य नोंदणी कार्यक्रम 17
एप्रिलपासून सुरू होत आहे. सदर नोंदणी कार्यक्रमानुसार पात्र पुरूष उमेदवारांची
1600 मीटर, महिला उमेदवारांची 800 मीटर धावण्याची चाचणी त्रिशरण चौक ते एडेड
हायस्कूल चौक या मार्गाने उजव्या बाजूवर घेण्यात येणार आहे. जवळपास एवढ्या लांबीचा
सरळ मार्ग चाचणीसाठी उपलब्ध नाही. त्यामुळे वाहतूक उजव्या बाजूवरील बंद ठेवून ती
पर्यायी त्रिशरण चौक ते एडेड हायस्कूल चौक या डाव्या बाजूने सुरू राहणार आहे. तरी
18 व 19 2018 रोजी सकाळी 6 ते 11 या कालावधीत त्रिशरण चौक ते एडेड हायस्कूल चौक या
मार्गाने उजव्या बाजूवरील वाहतूक बंद ठेवून ती पर्यायी त्रिशरण ते एडेड हायस्कूल
चौक या डाव्या बाजूने सुरू राहणार आहे. त्यानंतर हा आदेश रद्द होवून वाहतूक
नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास महाराष्ट्र
पोलीस कायदा 1951 चे कलम 33 अन्वये उचित कार्यवाही करण्यात येणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी
यांनी कळविले आहे.
******
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचा समारोप
बुलडाणा,दि. 16 : जिल्ह्यात 8 ते 14 एप्रिल 2018 दरम्यान डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताह साजरा
करण्यात आला. या सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रम नुकताच सामाजिक न्याय भवन बुलडाणा
येथे पार पडला. समारोपीय कार्यक्रमादरम्यान सकाळी 9 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर
नगर, मलकापूर रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास प्र. जिल्हाधिकारी
प्रमोदसिंह दुबे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी पोलीस
बँडच्यावतीने शासकीय मानवंदना देण्यात आली. यावेळी आमदार हर्षवर्धन सपकाळ, जि.प
अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे, नगराध्यक्षा नजमुन्नीसा मो. सज्जाद, जिल्हा पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना, सहायक
आयुक्त मनोज मेरत, जि.प सदस्या जयश्रीताई शेळके, शाहीर डी. आर इंगळे, आशिष खरात, प्रदीप बोरडे आदी उपस्थित होते.
त्यानंतर सामाजिक सामाजिक न्याय भवन येथे आयोजित
कार्यक्रमामध्ये वसतिगृहातील विद्यार्थीनींनी गीत गायन सादर केले. तसेच काही
विद्यार्थीनींनी भाषणांद्वारे आपले मत मांडले. यावेळी राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता
पुरस्कार पात्र विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र
वाटप करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शन केले. सहायक आयुक्त
मनोज मेरत यांनी संपूर्ण सामाजिक समता सप्ताहाच्या अहवालाचे वाचन केले. संचलन सतीश
बाहेकर यांनी, तर आभार प्रदर्शन संदीप कपले यांनी केले. कार्यक्रमाच्या
यशस्वीतेसाठी उद्धव गायकवाड, अश्विन हिवाळे, गजानन धोटे, संदीप घाटोळे, दिपक
मेश्राम, शंकर गोमलाडू, अशोक भडके, श्रीमती प्रणिता बावनकर, श्रीमती रेखा बांगरे, राहुल
माने, जयेश जाधव, राजू सुरळकर, श्री. खोंडे, श्री. जाधव यांनी प्रयत्न केले.
*****
महेश पवार यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन
बुलडाणा,दि. 16 : ई- ग्रंथालय येथे स्पर्धा परीक्षांच्या
अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात
येते. दरम्यान 19 एप्रिल 2018 रोजी सकाळी 11 वाजता नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी
कार्यालय, बुलडाणा येथे परिविक्षाधिन तहसिलदार महेश पवार यांचे राज्यसेवा मुख्य
परीक्षा 2018 व अन्य स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने व्याख्यान आयोजित केले आहे. तरी
कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी 19 एप्रिल रोजी 10.30 वाजता उपरोक्त ठिकाणी उपस्थित
रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी केले आहे.
*********
जिल्हास्तर युवा
पुस्काराकरीता प्रस्ताव प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ
बुलडाणा, दि. 16 : राज्याचे युवा धोरण 2012 अन्वये
जिल्ह्यातील युवांनी व संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व
युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हास्तरावर
जिल्हा युवा पुरस्कार देण्यात
येत असतो. हा पुरस्कार जिल्हयातील एक युवक, एक युवती व एक नोंदणीकृत संस्था यांना
देण्यात येतो.
त्यानुषंगाने
सदर पुरस्काराकरीता या कार्यालयाच्या वतीने प्रस्ताव मागविण्यात आले होते. परंतु सदर
कार्यालयास प्राप्त झालेल्या प्रस्तावांची प्राथमिक छाननी केली असता सदर प्रस्ताव
पात्र नसल्याचे आढळून आले. त्यामुळे सदर या
कार्यालयाव्दारे पूनश्च प्रस्ताव मागविण्यात येत आहे.
तरी खालील प्रमाणे मुल्यांकनासह व पात्रतेचे निकष पूर्ण करणा-या बुलडाणा जिल्हयातील युवक,युवती व संस्थांनी या कार्यालयातून अर्ज
प्राप्त करुन घेवून विहीत नमुन्यातील आवश्यक कागदपत्रांसह आपला अर्ज 19 एप्रिल 2018 पर्यंत दोन प्रतीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जांभरुन रोड,
बुलडाणा येथे सादर करावा. तसेच अधिक माहितीकरीता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा
12 नोव्हेंबर 2013 रोजीचा शासन निर्णयाचे अवलेाकन करावे व कार्यालयीन वेळेत
प्रत्यक्ष कार्यालयात संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी
कळविले आहे.
युवक व युवतींसाठी
पात्रतेचे निकष-
अर्जदार युवक/युवतीचे
वय पुरस्कार वर्षातील 1 एप्रिल रोजी 13 वर्षे पुर्ण व 31 मार्च रोजी 35 वर्षे
पर्यंत असावे. जिल्हा पुरस्कारासाठी
अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे त्या जिल्हयात सलग 5 वर्ष वास्तव्य असावे. पुरस्कार व्यक्ती अथवा संस्थेंस
विभागून दिला जाणार नाही. पुरस्कार मरणोत्तर जाहिर करण्यात येणार नाही. केलेल्या कार्याचे सबळ
पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. (उदा. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे,
चित्रफिती व फोटो इ.)
अर्जदार
युवक व युवतीने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्ष क्रीयाशिल कार्यरत
राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक राहील. अर्जदार व्यक्तीचे कार्य हे
स्वयंस्फूर्तीने केलेले असावे. एका जिल्हयात पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्हयात
जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. केंद्र व राज्य
शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी तसेच विदयापीठ
अंतर्गत महाविदयालयातील प्राध्यापक / कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.
संस्थांसाठी पात्रता
निकष -
पुरस्कार संस्थेस
विभागून दिला जाणार नाही. संस्थांनी केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील.
(उदा. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती व फोटो इ.) अर्जदार संस्थेने पुरस्कार प्राप्त
झाल्यानंतर किमान दोन वर्ष क्रीयाशिल कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक
राहील. अर्जदार संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1860 किंवा
मुंबई पब्लीक ट्रस्ट अँक्ट 1950 नुसार पंजीबध्द असावी. अर्जदार
संस्था नोंदणी झाल्यानंतर किमान पाच वर्षे कार्यरत असणे आवश्यक आहे. अर्जदार संस्थेचे कार्य हे
स्वयंस्फूर्तीने केलेले असावे. एका जिल्हयात पुरस्कार प्राप्त
करणारी संस्था राज्यातील अन्य जिल्हयात जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास
पात्र राहणार नाही.अर्जदार/ संस्थेच्या
सदस्यांचा पोलीस विभागाने प्रमाणित केलेला चारित्र्य दाखला (संबंधीत
परिक्षेत्रातील पोलीस स्टेशन) देणे आवश्यक राहील.
पुरस्कारासाठी मुल्यांकन -
युवा
व युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्थांनी केलेले कार्य दि. 1 एप्रिल ते 31 मार्च
या कालावधीत गत तीन वर्षाची केलेली कार्य कामगिरी विचारात घेण्यात येईल. युवा अथवा
नोंदणीकृत संस्थांनी ग्रामिण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्य. राज्यात
साधन संपत्ती जतन व संवर्धन तसेच राष्ट्र उभारणीच्या विकासासाठी सहाय्यभूत ठरणारे
कार्य. समाजातील दुर्बल घटक, अनुसुचित जाती, जमाती व जनजाती
आदिवासी भाग इ. बाबतचे कार्य.शिक्षण, प्रौढ शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण,
सांस्कृतिक, कला, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान तंत्रज्ञान, व्यवसाय, महिला सक्षमीकरण,
स्त्रीभून, व्यसनमुक्ती तसेच युवांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य. राष्ट्रीय
एकात्मतेस प्रोत्साहन देणारे कार्य. नागरी
गलीच्छ वस्ती सुधारणा, झोपडपटटी, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक समस्या, महिला
सक्षमीकरण आदीबाबत कार्य, साहस, इ. बाबतचे कार्य.
******
18 एप्रिल
रोजी होणारे अपंग तपासणी शिबिर रद्द
बुलडाणा,दि. 16 : जिल्हा रूग्णालयात नियमितपणे महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी अपंग
तपासणी बोर्डात शिबिर सुरू असते. मात्र या बुधवारला दि. 18 एप्रिल 2018 रोजी अक्षय
तृतीया सणानिमित्त स्थानिक सुट्टी असल्यामुळे सदर अपंग तपासणी बोर्डातील शिबिर
रद्द करण्यात आले आहे. या शिबिरात अस्थिव्यंग,
नेत्र, मनोरूग्ण / मतिमंद अपंग तपासणीा होत असते. तरी नागरिकांनी जिल्हा रूग्णालय,
बुलडाणा येथील सदर अस्थिव्यंग व नेत्र अपंग तपासणीस येऊ नये. आल्यास झालेल्या
गैरसोयीला प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले
आहे.
******
गोदामामधून गहू नेणाऱ्या वाहनाच्या गंतव्य स्थानाची नोंद घेण्यात आली
- जिल्हा पुरवठा अधिकारी यांचा खुलासा
बुलडाणा,दि. 16 : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, वरखेड पीपीपी टेंभूर्णा,
खामगांव येथील गोदामामधून वाहनांमध्ये प्राधान्य कुटूंब योजनेचा गहू भरण्यात आला. तसेच
टी.पी वर गंतव्य बुलडाणा हे स्थान नमूद करण्यात आले. या वाहनांचा क्रमांक एमएच 28
एबी 8230 व एमएच -19 झेड 2097 असे आहेत. वखार महामंडळाच्या स्टेटमेंटमध्ये या वाहनांच्या
गंतव्य स्थानाची नोंद नसल्याचे व सदर धान्याचे वाहन काळ्या बाजारात जात असल्याचे
वृत्त प्रकाशित झाले होते. मात्र या वाहनांच्या गंतव्य स्थानाची नोंद घेण्यात
आल्याचा खुलासा जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी
सादर केला आहे.
खुलाशानुसार, वाहतुक
प्रतिनिधी यांचेकडे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, वरखेड, पीपीपी टेंभूर्णा,
खामगांव या दोन्ही गोदामांवर धान्य भरणे सुरू असते. तसेच दोन्ही गोदाम हे एका ठिकाणी नसल्यामुळे दोन्हीमध्ये
जवळपास 7 ते 8 किलोमीटरचे अंतर असल्यामुळे अनावधानाने बुलडाणा गोदामाला उक्त वाहन पाठवित
असल्याची स्टेटमेंटमध्ये घाईगडबडीने नोंद घेण्याचे राहून गेले. तरी नोंद घेवून
सुधारीत स्टेटमेंट वाहतूक प्रतिनिधी यांनी सादर केला आहे, असे जिल्हा पुरवठा
अधिकारी यांनी कळविले आहे.
*****
खरीप हंगामासाठी महाबिजच्या बिजोत्पादनाचे आरक्षण सुरू
- अंतिम मुदत 10 मे 2018
बुलडाणा,दि. 16 : खरीप 2018-19 मधील हंगामासाठी बिजोत्पादन कार्यक्रमाचे आरक्षण
सुरू झाले आहे. या आरक्षणाची अंतिम मुदत 10 मे 2018 आहे. बिजोत्पादन
कार्यक्रमातंर्गत आरक्षणाकरीता 8-अ, चालु वर्षाचा 7/12, आधार कार्ड व बॅक पासबुकची छायांकितची प्रत आदी कागदपत्रे
आवश्यक आहेत. बिजोत्पादन कार्यक्रम घेण्याकरीता संबंधित बिजोत्पादक स्वत: हजर
राहणे बंधनकारक आहे. बिजोत्पादन कार्यक्रमाचे आरक्षणामध्ये महाबीज भागधारकांना
प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या
तत्त्वावर महाबीजचे नियमांचे अधीन राहून बिजोत्पादन कार्यक्रमाचे आरक्षण करण्यात
येणार आहे. अधिक माहितीसाठी नजीकचे महाबीज तालुका कार्यालयाशी संपर्क साधण्यात
यावा, असे जिल्हा व्यवस्थापक, महाबीज यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment