बोंड अळीचे
नियंत्रणासाठी बियाण्यांसोबत फेरोमन सापळे देणार
-
पालकमंत्री
पांडुरंग फुंडकर
- जिल्ह्याचे 7 लक्ष 32 हजार हेक्टर क्षेत्रावर
खरीपाचे नियोजन
- बोंडअळीच्या नियंत्रणासाठी गावागावात जनजागृतीपर
सभा
- पेरणीपूर्वी पिक कर्जाचे वितरण करावे
- गोदामांची व्यवस्था करून तूर खरेदी करावी
- खरीप हंगामपूर्व आढावा बैठक
बुलडाणा दि 8 - जिल्ह्यात
गत खरीपात लहरी पाऊसमानामुळे शेती संकटात
होती. मात्र ऑक्टोंबरमधील पावसामुळे रब्बी पेऱ्यामध्ये वाढ झाली. तसेच गत खरीपात
बोंडअळीच्या संकटामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसावे
लागले. अशा परिस्थितीत यावर्षी आतापासूनच
बोंड अळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना जागरूक करणे आवश्यक आहे. त्यासाठी
शासन बियाणे कंपन्यांकडून बियाण्यांच्या पाकिटासोबतच फेरोमन सापळे देणे सक्तीचे करण्यात
आले आहे. हे फेरोमन सापळे शेतकऱ्यांना बियाण्यांच्या
पाकिटासोबत देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषि तथा जिल्ह्याचे पालकमंत्री
पांडुरंग फुंडकर यांनी आज दिली.
जिल्ह्याच्या खरीप हंगाम पूर्व
आढावा बैठकीचे आयोजन जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी
पालकमंत्री बोलत होते. बैठकीला व्यासपीठावर खासदार प्रतापराव जाधव, जि.प अध्यक्षा
श्रीमती उमाताई तायडे, आमदार सर्वश्री हर्षवर्धन सपकाळ, ॲड आकाश फुंडकर, जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, अति. जिप मुख्य
कार्यकारी अधिकारी बी. बी नेमाने, विभागीय सहसंचालक श्री. नागरे आदी उपस्थित होते.
बोंड अळीच्या नियंत्रणासाठी
शेतकऱ्यांच्या जनजागृतीकरीता गावागावांत सभा घेण्यात येणार असल्याचे सांगत
पालकमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांना कमी
कालावधीत येणाऱ्या कापूस बियाण्यांची लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार
आहे. हंगामपूर्व कापूस लागवड न करण्यासाठीसुद्धा शेतकऱ्यांना जागृत करण्यात येणार
आहे. त्याचप्रमाणे बोगस बियाणे, खत व किटकनाशकांच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची
तक्रार आल्यास शेतकऱ्यांना त्वरित कार्यवाहीसाठी मदत करण्यात येईल.
ते पुढे म्हणाले, येत्या खरीपात
होणारी पेरणी लक्षात घेता कुठल्याही प्रकारचे बियाणे, खते यांची टंचाई निर्माण
होणार नाही, याबाबत नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना खरीपातील पेरणीसाठी पेरणीपूर्वी
पीक मिळायला पाहिजे. त्यासाठी बॅकांनी योग्य ती सर्व व्यवस्था उभारावी. कुठलाही
पात्र शेतकरी बँकांनी पीक कर्जाशिवाय परत पाठवू नये. एकरकमी कर्जमाफी योजनेमध्ये पात्र असलेल्या
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त संख्येने सामावून घ्यावे. त्यांना या योजनेचा लाभ
द्यावा. उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानातंर्गत शेतकऱ्यांना यंत्र उपलब्ध करून
देण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून पूर्वसंमती घेवून साहित्य घेतलेल्या शेतकऱ्यांच्या
खात्यावर अनुदानाची रक्कम अदा करण्यात येत आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ
घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
महातिवरणने त्यांच्याकडील मान्सूनपुर्व वीज यंत्रणेची कामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना देत पालकमंत्री म्हणाले,
पेड पेडींग वीज जोडण्या गतीने पूर्ण करण्यात याव्यात. रोहीत्र जळालेले असल्यास
त्वरित रोहीत्र बदलून देण्यात यावे.
जेणेकरून शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागणार नाही. त्याचप्रमाणे तूर खरेदी
करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोदामांची व्यवस्था उभारण्यात यावी. या गोदामांचा अंदाज
घेवून तूर खरेदी करावी.
खासदार प्रतापराव जाधव यावेळी
म्हणाले, मागील प्रलंबित असलेल्या वीज जोडण्यांची त्वरित पुर्तता करावी. बोगस बियाणे
जिल्ह्यात येणार नाही, याबाबत काळजी घ्यावी. असे बियाणे आल्यास विक्रेत्यांवर
कारवाई करावी. पीक कर्ज वितरणासाठी सर्व यंत्रणांनी सहकार्य करावे. बँकांनी
मनुष्यबळ लक्षात घेवून आतापासून पीक कर्ज वितरणाचे नियोजन करावे.
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे
यांनी जिल्ह्यात 2018-19 मध्ये 7 लाख 32 हजार
हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांच्या लागवडीचे उद्दिष्ट असल्याची माहिती देवून
बैठकीचे प्रास्ताविक केले. येणाऱ्या खरीप हंगामाकरीता जिल्ह्यात पेरणीसाठी
प्रस्तावित केलेल्या क्षेत्रावर सर्व पिकांच्या 1 लक्ष 55 हजार 132 क्विंटल बियाणे पुरवठ्याचे नियोजन
करण्यात आले आहे. तसेच कापूस पिकाच्या बिटी कापूस बीजी-2 वाणाचे एकूण 8 लक्ष 11
हजार 500 पाकिटांची मागणी करण्यात आली आहे. रासायनिक खतांचे मंजूर आवंटन
जिल्ह्यासाठी 1 लक्ष 37 हजार 660 मे.टन असून आतापर्यंत जिल्ह्यात 20 हजार 792
मे.टन साठा उपलब्ध आहे. बैठकीत
लोकप्रतिनिधींनी विविध प्रश्न मांडले. बैठकीला विविध विभागांचे विभागप्रमुख,
अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे आभार उपविभागीय कृषि
अधिकारी संतोष डाबरे यांनी मानले.
*******
No comments:
Post a Comment