मतदार यादीतील आपल्या
नावाची निश्चिती करावी
-
जिल्हाधिकारी
·
दोन ठिकाणी नावे असलेल्या मतदारांनी एकच नाव ठेवावे
·
जिल्ह्यात 19 सप्टेंबर पर्यंत 35 हजार 123 मतदारांची नोंदणी
·
जिल्ह्यात एकूण 19 लक्ष 11 हजार 123 मतदारसंख्या
बुलडाणा, दि.27
- राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त आदेशान्वये जिल्ह्यात मतदार याद्यांचा
विशेष संक्षिप्त पुर्ननिरीक्षण कार्यक्रम 3 ऑक्टोंबर 2017 ते 5 जानेवारी 2018
पर्यंत राबविण्याचे घोषीत करण्यात आले आहे. या मोहिमेदरम्यान मयत मतदारांची नावे
वगळणे, नाव पत्त्यातील चूक दुरूस्त करणे, मतदार यादीतील नावाची निश्चिती करण्यात
येणार आहे. तरी मतदारांनी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्या नावाची
निश्चिती करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज
केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या
सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजेंद्र देशमुख व
निवडणूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
मतदारांची दोन ठिकाणी नावे
असल्यास ती त्वरित स्वत:हून नागरिकांनी रद्द करण्याचे आवाहन करीत जिल्हाधिकारी म्हणाले,
एकच नाव मतदार यादीत दोन ठिकाणी असल्यास मतदारांनी एक नाव त्वरित वगळावे. एकाच
ठिकाणी नाव ठेवावे. मतदार यादीत दोन ठिकाणी नाव असणे हा गुन्हा आहे. त्यामुळे
नागरिकांनी सजग राहून दोन ठिकाणी नाव
असल्यास एकच नाव ठेवावे. त्यासाठी प्रारूप मतदार यादी 3 ऑक्टोंबर 2017 रोजी
प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, चूक दुरूस्त करणे
यासाठी विशेष मोहिमांचेसुद्धा आयोजन करण्यात येणार आहे.
ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात 1 जुलै ते 31
ऑगस्टपर्यंत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत नवीन मतदारांनी चांगल्याप्रकारे
प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यात 35 हजार 123 मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.
अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण मतदारसंख्या 19 लक्ष 11 हजार 123 मतदारसंख्या आहे. तसेच
या मोहिमेत 10 हजार 443 मतदार मयत आहेत. त्यांची नावे कमी करण्यात येणार आहेत.
असा
आहे संक्षिप्त मतदारयादी पुर्ननिरीक्षण कार्यक्रम
हा
कार्यक्रम ERO-Net अंतर्गत प्रत्येक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या स्तरावर
राबविण्यात येणार आहे. दिनांक 1 जानेवारी 2018 या अर्हता दिनांकावर आधारीत
छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुर्ननिरीक्षण कार्यक्रमाचे वेळापत्रक
पुढीलप्रमाणे : प्रारूप मतदारय याद्यांची प्रसिद्धी करणे : 3 ऑक्टोंबर 2017, दावे
व हरकती स्वीकारण्याचा कालावधी : 3 ऑक्टोंबर ते 3 नाव्हेंबर 2017 पर्यंत, मतदार
यादीमधील सबंधीत भागाचे/सेक्शनचे ग्रामसभा/ स्थानिक संस्था येथे वाचन व
आरडब्ल्यूएसोबत बैठक आणि नावांची खातरजमा 7 ऑक्टोंबर ते 13 ऑक्टोंबर 2017, विशेष
मोहिमांचे आयोजन : 8 ऑक्टोंबर व 22 ऑक्टोंबर 2017, दावे व हरकती निकालात काढणे : 5
डिसेंबर 2017पर्यत, डाटाबेसचे अद्यावतीकरण : 20 डिसेंबर पर्यंत, अंतिम मतदार यादी
प्रसिद्ध करणे 5 जानेवारी 2018.
*****
क्रॉपसॅप
प्रकल्पातंर्गत सोयाबीन व कापूस पीक पाहणी
बुलडाणा, दि.27
- मोताळा व मलकापूर तालुक्यात सोयाबीन पिकावर खोडमाशी, चक्रीभुंगा,
तंबाखुची पाने खाणारी अळी, उंटअळीया प्रादुर्भाव झालेला आहे. तर कापूस पिकावर
गुलाबी बोंड अळी, मावा, तुडतुडे, फुलकीडे, पांढरी माशी या किडींचा प्रादुर्भाव
झालेला आहे. कीडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प 2017-18 अंतर्गत मोताळा व मलकापूर
तालुक्यातील प्रादुर्भावग्रस्त पीकांची प्रत्यक्षात शेतात जावून पाहणी केली. या
चमूमध्ये कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. सी.पी जायभाये, डॉ. मिलींद गिरी, किडनियंत्रक
जी. टी सांगळे, मंडळ कृषि अधिकारी के. एल कंकाळ, एस.एच पवार, कृषि पर्यवेक्षक
व्ही. आर धांडे, विशाल महाजन, डी. बी नवले, किड सर्वेक्षक विकास ताठे, मयूर मेहसरे
यांचा समावेश होता.
शेतकऱ्यांनी बांधावरील
किडींना पुरक असणाऱ्या वनस्पतींचा नाश करावा, अंडपुंज असलेली पाने नष्ट करावी. पाच
ते दहा कामगंध सापळे प्रति हेक्टरी लावावे, सोयाबीनवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी
एन्डॉक्झकार्ब 15.6 ई.सी 7 मि.ली किंवा क्लारन्ट्रानिलीप्रोल 18.5 टक्के प्रवाही 3
मि.ली किंवा लॅमडा सॅहलोथ्रीन 4.9 सि.एस 6 मि.ली 10 लीटर पाण्यात फवारावे, कापूस
पिकावर ॲसीटामाप्रीड 20 एस.पी 2.5 ग्रॅम, थायमिथॉक्साम 25 डब्ल्यू जि 2.5
ग्रॅम, डायमेथोएट 30 इ.सी 10 मि.ली यापैकी
एका औषधाची 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी प्रोफेनॉफॉस 50 इ.सी 20
मि.ली किंवा थायोडिकार्ब 75 डब्ल्यु पी 20 20 ग्रॅम 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी. शेतकरी बंधूनी नियमित पिकांची पाहणी करून एकात्मिक किड नियंत्रणाचा मार्ग
अवलंबवावा, असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.
**************
जिल्हाधिकारी कार्यालयात
3 ऑक्टोंबर रोजी लोकशाही दिन
बुलडाणा, दि.27 : नागरिकांच्या
तक्रारींचा निपटारा जलदगतीने व्हावा, यासाठी
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे
आयोजन करण्यात येते. मात्र या महिन्याच्या पहिल्या सोमवारला, दि. 2 ऑक्टोंबर 2017 रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त
सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे सदर लोकशाही दिन मंगळवार 3 ऑक्टोंबर 2017 रोजी दुपारी
1 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी
जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करणार
आहेत. तसेच तालुका स्तरावर तहसील कार्यालयात महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही
दिनाचे आयोजन करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील शासकीय, निम
शासकीय कार्यालयातील अडचणी व तक्रारी संबंधी ज्या नागरिकांना आपली निवेदने लोकशाही
दिनी सादर करावयाची आहेत, त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या नावे विहित
नमुन्यात अर्ज करावा. विहित नमुन्यातील अर्ज व सोबत अर्जाची आगाऊ प्रत जोडून
लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी पाठविणे आवश्यक आहे.
अर्जदाराने
लोकशाही दिनाच्या दिवशी मूळ अर्जासोबत उपस्थित रहावे. जिल्हाधिकारी कार्यालयात
लोकशाही दिनी संबंधीत नागरिकांनी उपस्थित राहून दोन प्रतींमध्ये आपली निवेदने
जिल्हाधिकारी यांना सादर करावीत. अन्य व्यक्तीमार्फत पाठविलेली निवेदने स्विकारली
जाणार नाहीत. तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी
कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ
नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी
असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही.
तक्रार, निवेदन
वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/
अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित
नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध
न्यायालयात, प्राधिकाऱ्यां-कडील, लोकआयुक्त
यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक
कार्यवाहीसाठी 8 दिवसात पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात
येईल, असे
जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
*******
No comments:
Post a Comment