ग्राहक संरक्षण हितासाठी काम करावे
- जिल्हाधिकारी
· जिल्हा ग्राहक संरक्षण समिती बैठक
बुलडाणा,दि. 22 : ग्राहकांना विविध समस्या भेडसावत असतात. शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा देण्यात येतात. अनेकवेळा या सेवा देताना तक्रारी येतात. ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करून आलेल्य तक्रारी सोडविल्या पाहिजे. त्यासाठी ग्राहक संरक्षण परिषद व शासनाच्या विविध विभागांनी काम करावे, अशा सूचना प्र. अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद देशमुख यांनी आज दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ग्राहक संरक्षण परिषदेच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तक्रारींवर सुनावणी करताना ते बोलत होते. यावेळी बीएसएनएलचे श्री. रजोरीया, महावितरणे कार्यकारी अभियंता श्री. पाठक आदींसह अमरचंद संचेती, श्री. बैरागी, संजय जोशी, जिवनसिंग राजपूत आदी सदस्य उपस्थित होते.
प्रत्येक विभागाने तक्रारींचा निपटारा त्वरित करून तक्रारदाराचे समाधान करण्याचे सांगत श्री. देशमुख म्हणाले, जिल्हा ग्राहक संरक्षण परीषदेच्या माध्यमातून येणाऱ्या तक्रारी समोर येतात. मात्र अशा अनेक तक्रारी कार्यालयांकडे येत असतात. या सर्व तक्रारींचा निपटारा करावा.
याप्रसंगी महावितरण, सहकार विभाग व मलकापूर नगर पालिका यांच्याकडील तक्रारी सोडविण्यात आल्या. तसेच संबंधित विभागांना कळविण्यात आले. बैठकीला संबंधित यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*********
पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांचा दौरा
बुलडाणा, दि. 22 : राज्याचे कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री 23 सप्टेंबर 2017 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : दि. 23 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 10.25 वाजता खामगांव येथून शासकीय मोटारीने गो. से महाविद्यालयकडे प्रयाण, सकाळी 10.30 वाजता गो. से महाविद्यालय येथे आगमन व स्व. ॲड. शंकररावजी उपाख्य भाऊसाहेब बोबडे यांच्यावरील कार्य सुगंध या स्मरणिकेचे विमोचजन कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 12.30 वाजता खामगांव येथून शासकीय मोटारीने हिवरखेड ता. तेल्हाराकडे प्रयाण, दुपारी 2 वाजता हिवरखेड ता. तेल्हारा येथे आगमन व अकोला जिल्हा बँकेच्या हिवरखेड शाखा इमारतीचे उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती, दुपारी 4.30 वाजता हिवरखेड येथून नांदुरा जि. बुलडाणाकडे प्रयाण, सायं 7.30 वाजता नांदुरा रेल्वे स्थानकावर आगमन व हावडा मेलने मुंबईकडे प्रयाण करतील.
शालेय डेंग्यू जागृती मोहिमेतंर्गत जनजागृती कार्यक्रम
बुलडाणा, दि. 21 : शालेय डेंग्यू जागृती मोहिमेतंर्गत बुलडाणा शहरात माध्यमिक शाळा व कनिष्ठ महा विद्यालयामधील विद्यार्थ्यांमध्ये डेंग्यू विषयी जनजागृती करण्यासाठी कार्यक्रमांचे आयेाजन करण्यात आले. प्रबेाधन विद्यालय, सरस्वती उच्च प्राथमिक शाळा, राजर्षी शाहू महाराज प्राथमिक शाळा, न.प उर्दू वरीष्ठ प्रा. शाळा क्रमांक 3, महात्मा फुले उच्च प्राथमिक शाळा या शाळांमध्ये कार्यक्रम पार पडले. जिल्हाभर डेंग्यू जनजागृती मोहिम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमती पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा हिवताप अधिकारी श्री. चव्हाण यांच्या मार्गदर्शनात राबविल्या जात आहे.
त्याअनुषंगाने उपरोक्त शाळांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात आले. या प्रसंगी आरोग्य सहायक आर जी पाखरे, आरोग्य कर्मचारी श्री. बाहेकर, श्री. जुमडे, श्री. लोखंडे, श्री. वनारे, आर.एस जाधव, श्री. पडोळकर, पी.एस जाधव व शाळेचे शिक्षकवृंद उपस्थित होते.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्पनिदेशक पदांसाठी मुलाखतीचे आयोजन
बुलडाणा, दि. 22 : खामगांव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्पकारागीर योजनेतंर्गत शिल्पनिदेशकांची दोन पदे तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्वावर मुलाखतींचे आयोजन गुरूवार 28 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत करण्यात आले आहे. ही दोन पदे थेअरी व प्रॅक्टीकल शिकविण्याकरीता भरावयाची आहेत. यामध्ये गवंडी व्यवसायाकरीता एक व साचेकार व्यवसायाकरीता एक पदाचा समावेश आहे.
उमदेवारांची संख्या जास्त झाल्यास लेखी परीक्षा घेवून उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सेवानिवृत्त शिल्पनिदेशक तसेच संबंधित शाखेतील किमान द्वितीय श्रेणीमध्ये पदवी/पदविका उत्तीर्ण असावा. त्यानंतरचा एक वा दोन वर्षाचा अनुभव किंवा संबधीत व्यवसायातील आयटीआय प्रमाणपत्र, एनसीव्हीटी/एटीएस परीक्षा उत्तीर्ण व त्यानंतरचा तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे, असे प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment