कर्जमाफीचे
अर्ज भरण्यासाठी 22 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
- अर्ज
भरण्यासाठी शेवटच्या दिवसाची प्रतीक्षा करू नये
बुलडाणा,दि. 16 - : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान
योजना 2017 अंतर्गत कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी राज्य शासनाने 7 दिवसांची
मुदतवाढ दिली आहे. या योजनेतंर्गत शेवटची तारिख 15 सप्टेंबर 2017 होती. ती आता 22
सप्टेंबर 2017 पर्यंत वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यात तालुका अथवा ग्रामपातळीवर
1892 केंद्र सुरू आहेत. त्यामध्ये आपले सरकार, महा ई सेवा केंद्र यांचा समावेश आहे.
शेतकऱ्यांनी शेवटच्या दिवसाची प्रतीक्षा न करता अर्ज भरावे. आपल्या जवळच्या
शासनमान्य आपले सरकार, महा ई सेवा केंद्र, ई संग्राम केंद्रांवर जावून कर्जमाफीचा
अर्ज भरावा. त्यासाठी आधार कार्ड, पॅन क्रमांक, बँक बचत खातेपुस्तिका, 7/12 उतारा
व आधार क्रमांकाशी जोडलेला मोबाईल क्रमांक आदी कागदपत्रे सोबत घेवून जावीत. अर्ज न
भरलेल्या शेतकऱ्यांनी त्वरित ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक
नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.
**********
जिल्हा ग्राहक संरक्षण परीषदेच्या बैठकीचे
आयोजन
बुलडाणा,दि. 16 - : जिल्हा स्तरावरील जिल्हा ग्राहक
संरक्षण परीषदेच बैठकीचे आयोजन दरमहा करण्यात येते. त्यानुसार 22 सप्टेंबर 2017
रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा ग्राहक संरक्षण बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी यांच्या
अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. सदर बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात
होणार आहे. तरी नागरिकांनी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अनुषंगाने असलेल्या
तक्रारी पुराव्यासह दोन प्रतीत लेखी स्वरूपात बैठकीत सादर कराव्यात. जेणेकरून
तक्रारींचे निराकारण करता येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.
*******
शेतकऱ्यांनी माल साठवणूक करताना गोदामाच्या
परवान्याची खात्री करावी
बुलडाणा, दि. 16 - : शेतकरी बांधव व माल
साठवणूकदारांनी गोदामात माल साठवणूकीस ठेवताना गोदामाचा परवाना जिल्हा उपनिबंधक,
सहकारी संस्था या कार्यालयातून घेतलेला किंवा नुतनीकरण केलेला आहे किंवा नाही,
याची खात्री करावी. खात्री केल्यानंतरच माल सदर मोदामामध्ये ठेवण्याचा निर्णय
घ्यावा. सहकारी संस्था, खाजगी गोदाम व्यावसायिक
(व्यक्ती / फर्म) तसेच गोदाम पावती योजनेतंर्गत व्यवसाय करणाऱ्या संस्था व
व्यावसायिक आस्थापना हे विना परवाना माल साठवणूक करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
अशा्रपकारे विनापरवाना माल साठवणूक
तारण पावती आणि तत्सम प्रकारचा व्यवसाय करीत असल्यास ही बाब मुंबई वखार अधिनियम
1959 चे कलम 35 चे उल्लंघन करणारी आहे. या अधिनियमाच्या कलम 11 नुसार सहकारी
संस्था, खाजगी गोदाम व्यावसायिक तसेच गोदाम पावती योजनेतंर्गत व्यवसाय करणाऱ्या
संस्था व व्यावसायिक आस्थापना यांना गोदाम परवाना घेणे बंधनकारक आहे. अशाप्रकारे
परवाना नसताना माल साठवणूक करीत असल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्याचा इशारा जिल्हा
उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी पत्रकान्वये दिला आहे.
***********
जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे 18
सप्टेंबर रोजी आयोजन
बुलडाणा,दि. 16 - : प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी
जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सप्टेंबर
महिन्याच्या महिला लोकशाही दिनाचे आयोजन 18 सप्टेंबर 2017 रोजी निवासी उप जिल्हाधिकारी
कार्यालयात सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. तरी महिलांनी तक्रारी असल्यास महिला
लोकशाही दिनामध्ये सोडविण्यासाठी आणाव्यात, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास
अधिकारी यांनी कळविले आहे.
पशुसंवर्धन विभागाची गोवर्धन गोवंश सेवा
केंद्र योजना जाहीर
- 27
सप्टेंबर 2017 पर्यंत स्वीकारणार अर्ज
- गोशाळांना
अर्थसहाय्य करणारी योजना
बुलडाणा, दि. 16 - : पशुसंवर्धन
विभागाने गोवंशाचा सांभाळ करण्यासाठी गोशाळांना अर्थसहाय्य देण्याकरीता
राज्यस्तरीय योजना गोवर्धन गोवंश सेवा केंद्र जाहीर केली आहे. ही योजना या आर्थिक
वर्षात राबविण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूकांनी
अर्जाचा नमुना व माहिती पंचायत समिती स्तरावर प्राप्त करून घ्यावी. पंचायत समिती
कार्यालयात पशुधन विस्तार अधिकारी यांच्याकडे अर्जाचे नमुने उपलब्ध आहेत. या
योजनेनुसार अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 27 सप्टेंबर 2017 रेाजी सायंकाळी 5
वाजेपर्यंत आहे. या मुदतीनंतर अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
राज्यात 4 मार्च 2015 पासून महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम 1995
लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार संपूर्ण गोवंशीय प्राण्यांच्या कत्तलीवर प्रतिबंध
करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकामासाठी व ओझी वाहण्यासाठी, पैदाशीकरीता उपयुक्त
नसलेले गोवंशीय बैल आणि वळू यांच्या कत्तलीवर बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच गाय,
बैल, वळु यांच्या कत्तलीकरीता परराज्यात करावयाची वाहतूक व अनुषंगीक खरेदी/विक्री
करण्याससुद्धा प्रतिबंध घालण्यात आलेले आहे. परीणामी कालांतराने शेती व दुग्ध
यासाठी अनुत्पादक असलेल्या गोवंशीय पशुधनाच्या संख्येत वाढ होणार असून या सर्व
पशुधनाचा सांभाळ करणे आवश्यक आहे. त्याकरीता शासनाने गोवंशाचा सांभाळ करण्यासाठी गोवर्धन
गोवंश सेवा केंद्र योजना अंमलात आणली आहे. तरी या योजनेचा लाभार्थ्यांनी लाभ
घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जायभाये यांनी केले आहे.
*******
मानवी
वस्त्यांमधील वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी शिघ्र कृती दल…
बुलडाणा, दि. 16 - : मानव व वन्यप्राणी
यांच्यामध्ये संघर्षाच्या घटना वारंवार होत असतात. तसेच मानवी वस्तीमध्ये
वन्यप्राणी आढळून येणे व वन्यप्राण्याचा जीव धोक्यात असल्याच्या घटनाही निदर्शनास
येतात. त्याचप्रमाणे वन्यप्राण्याचा अपघाती मृत्यू/ जखमी झाल्याचेही दृष्टीस पडते,
अशावेळी वन विभागाचे शिघ्र कृती दल मदतीस धावणार आहे. या शिघ्र कृती दलास संपर्क
केल्यास अशा घटनांमध्ये निश्चितच मदत मिळणार आहे.
यामध्ये प्रमुख वनपरिक्षेत्र अधिकारी बुलडाणा जी. ए झोळ आहेत. त्यांचा
मोबाईल क्रमांक 7030255444 आहे. तसेच सहायक वनसंरक्षक अधिकारी एस.एस गिरी यांचा
मोबाईल क्रमांक 9922744798 असून उपप्रमुख एस.एच राठोड यांचा मोबाईल क्रमांक 9922937974
आहे. तसेच शिघ्र कृती दल वाहन चालक भुषण जाधव यांचा मोबाईल क्रमांक 9423722233
आहे. उपरोक्त क्रमांकावर अशा घटनांवेळी संपर्क करावा, असे आवाहन उपवनसंरक्षक बी.टी
भगत यांनी केले आहे.
***********
जिल्ह्यात दमदार
पाऊस...
·
बुलडाणा तालुक्यात सर्वात जास्त 92 मि.मी
पावसाची नोंद
·
सरासरी 25.7 मि.मी पाऊस
बुलडाणा, दि. 16 - गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण
असून पावसाची हजेरी लावणे सुरू आहे. बहुप्रतिक्षित असलेल्या पावसाने कुठे साधारण,
तर कुठे दमदार स्वरुपाच्या पावसाची नोंद झली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर निश्चितच समाधानाचे
हास्य आले आहे. कालही जिल्ह्यात सिंदखेड
राजा तालुक्याचा अपवाद वगळता सर्वत्र दमदार पाऊस झाला. पावसामुळे जिल्ह्यातील
जलाशयांमधील पाणी पातळीत वाढ नोंदविण्यात आली.
जिल्ह्यात आज 16 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत महसूल विभागाकडील
आकडेवारीनुसार सर्वात जास्त 92 मि.मी पावसाची नोंद बुलडाणा तालुक्यात झाली आहे.
जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत
जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार
पावसाची झालेली नोंद खालीलप्रमाणे : कंसातील आकडेवारी आतापर्यंत पडलेल्या पावसाची – सर्वात जास्त पाऊस बुलडाणा :92
मि.ली (902 मि.ली), चिखली : 15 (590), मेहकर: 26 (682), दे.राजा: 4 (586), लोणार: 7 (583), खामगांव : 13.2 (564), शेगांव : 12 (436), मलकापूर : 4 (627), मोताळा : 35 (576), नांदुरा: 24 (601), जळगांव जामोद : 60 (682), सि.राजा: निरंक (589.8), संग्रामपूर : 42 (421) मि.मी पावसाची नोंद करण्यात आली.
अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 334.2 मि.ली पावसाची नोंद करण्यात आली असून त्याची सरासरी
25.7 मि.ली आहे. आतापर्यंत सर्वात जास्त
पाऊस बुलडाणा तालुक्यात झाला असून सर्वात
कमी पाऊस संग्रामपूर तालुक्यात झाला आहे. जिल्ह्यात 1 जुन 2017 पासून आतापर्यंत
पडलेल्या पावसाची सरासरी 577.4 मि.ली आहे.
जिल्ह्यातील प्रकल्पांमधील जलसाठ्यात वाढ
बुलडाणा पाटबंधारे विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील सिंचन
प्रकल्पांमध्ये गत 24 तासात झालेल्या पावसामुळे जलसाठ्यांमध्ये वाढ नोंदविण्यात
आली आहे. प्रकल्पनिहाय जलसाठा द.ल.घ.मी नुसार
पुढीलप्रमाणे आहे :
नळगंगा – प्रकल्पीय
संकल्पीत साठा : 69.32 टक्के, आजचा पाणीसाठा : 32.31 टक्के, पेनटाकळी – प्रकल्पीय संकल्पीत साठा : 59.97 टक्के, आजचा पाणीसाठा : 10.95 टक्के,
खडकपूर्णा – प्रकल्पीय संकल्पीत साठा : 93.47, आजचा पाणीसाठा
: निरंक, पलढग – प्रकल्पीय संकल्पीत साठा : 7.51 टक्के, आजचा
पाणीसाठा: 79.23 टक्के, ज्ञानगंगा - प्रकल्पीय संकल्पीत साठा : 33.93 टक्के, आजचा
पाणीसाठा: 32.21 टक्के, मस : प्रकल्पीय संकल्पीत साठा : 15.04 टक्के, आजचा
पाणीसाठा: 24.87, कोराडी : प्रकल्पीय संकल्पीत साठा : 15.12 टक्के, आजचा पाणीसाठा: 12.57 टक्के, मन :
प्रकल्पीय संकल्पीत साठा : 36.83 टक्के, आजचा पाणीसाठा: 17.02 टक्के, तोरणा : प्रकल्पीय
संकल्पीत साठा : 7.89 टक्के, आजचा पाणीसाठा: 14.70 टक्के, उतावळी : प्रकल्पीय
संकल्पीत साठा : 19.79 टक्के, आजचा पाणीसाठा: 23.65 टक्के.
***********
No comments:
Post a Comment