Monday, 25 September 2017

news 25.9.2017 dio buldana

    
प्रधानमंत्री पिक विमा योजना
नुकसान झाल्यास 48 तासाच्या आत विमा कंपनीला कळविणे आवश्यक
  • 18001030061 टोल फ्री क्रमांकावर नुकसानीची माहिती द्यावी
बुलडाणा, दि. 25 – शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांना पिकाच्या आर्थिक नुकसानीसाठी विम्याचे कवच प्रदान केले आहे. या खरीप हंगामातही योजनेच्या माध्यमातून सहभागी शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानीची मदत मिळणार आहे. त्यासाठी वैयक्तिक स्तरावर पिकांचे नुकसान झाले असल्यास अशा शेतकऱ्यांनी 48 तासाच्या आंत विमा कंपनीला कळवावे. कंपनीचा टोल फ्री क्रमांक 18001030061 उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर नुकसानीची माहिती तात्काळ द्यावी. या क्रमांकावर संपर्क न झाल्यास विमा कंपनीचे प्रतिनिधी दिलीप लहाने यांच्या  9881017458 क्रमांकावर कळवावे.
    त्याचप्रमाणे संबंधित तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे विहीत नमुन्यातील पिक सुचना अर्ज शेतकऱ्यांनी भरून द्यावे. सदर अर्ज भरणे अनिवार्य आहे. सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यात उडीद पिकाची काढणीपश्चात नुकसान होत असल्याचे निदर्शनास येत आहे. शेतकऱ्यांच्या पिकाचे भुस्खलन, पुराचे पाणी शेतात शिरून नुकसान होणे, गारपीट व काढणी/ कापणसी पश्चात पिक सुकविण्यासाठी  ठेवले असता नुकसान होणे या नुकसानीकरीता शेतकरी वैयक्तिक नुकसान भरपाईस पात्र आहे. कापणी अथवा काढणी पश्चात नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना 14 दिवसापर्यंत नुकसान भरपाई देय आहे. तरी अशा्रपकारे नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यापासून 48 तासांच्या आत विमा कंपनी व कृषि विभागाकडे तक्रार  करावी, असे आवाहन जिल्हा कृषि अधिक्षक अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे.
                                                                                    ********
जिल्ह्यातील 4.31 लक्ष शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा
  • 1724 मे.टन गहू व 431 मे.टन तांदुळाचे नियतन
  • 16 गोदामांच्या माध्यमातून स्वस्त धान्य दुकानदारांना शेतकरी लाभार्थ्यांच्या धान्याचे वाटप
बुलडाणा, दि‍ 25 राज्यातील शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा मिळावी, या हेतूने राज्य शासनाने मराठवाडा व विदर्भातील जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचा अन्न सुरक्षा योजनेत समावेश केला आहे. शेतकरी हा अन्नदाता असून त्याची अन्नधान्यासाठी पायपीट होवू नये म्हणून शासनाने शेतकऱ्यांचा समावेश या योजनेत केला. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही मिळत आहे.  योजनेच्या माध्यमातून दरमहा शेतकरी लाभार्थ्यांना शासन जिल्ह्यामध्ये 1724 मेट्रीक टन गहू व 431 मेट्रीक टन तांदूळाचे नियतन प्राप्त होते. प्राप्त नियतन व गोदामातील प्रत्यक्ष शिल्लक धान्यसाठा लक्षात घेवून दरमहा नियतन आदेश निर्गमित करण्यात येतात.
  शेतकरी लाभार्थी योजनेतंर्गत कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहत नाही व अशाप्रकारची कोणत्याही तहसील  कार्यालयाकडून लेखी तक्रार प्राप्त नाही. राष्ट्रीयअन्न सुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांकरिता माहे ऑगस्ट 2017 चे नियतनातील  गहू व तांदुळ धान्याची शासकीय गोदामात  वाहतूक करण्याचे आदेश पारीत करण्यात आले. या धान्याची उचल भारतीय अन्न महामंडळाच्या ब्लॅक स्टोन लॉजिस्टीक्स प्रा. लि, टेंभुर्णा फाटा, खामगांव यांचे गोदामातून करण्यात आलेली आहे. सदर धान्य गोदामांमधूनही स्वस्त धान्य दुकानांना वाटप करण्यात आलेले आहे.
     स्वस्त धान्य दुकानदारांनी गोदामातून पुढीलप्रमाणे गहू व तांदुळाची शेतकरी लाभार्थ्यांकरीता वाटप केलेली आहे.   बुलडाणा गहू 1546 क्विंटल व तांदूळ 364,  चिखली गहू 1425 व तांदुळ 403, अमडापूर गहू 601 व तांदुळ 150, दे.राजा गहू 1271 व तांदुळ 491, मेहकर गहू 1850 व तांदूळ 418, डोणगांव गहू 571 व तांदूळ 125, लोणार गहू 1577 व तांदुळ 409, सिं.राजा गहू 1196 व तांदुळ 254, साखरखेर्डा गहू 720 व तांदुळ 160, मलकापूर गहू 1113 व तांदुळ 274, मोताळा गहू 1142 व तांदुळ 296, नांदूरा गहू 1351 व तांदुळ 331, खामगांव गहू 1224 व तांदुळ 292, शेगांव गहू 1267  व तांदुळ 312, जळगांव जामोद गहू 923 व तांदुळ 230, संग्रामपूर गहू 1274 व तांदुळ 313 क्विंटल आहे. अशाप्रकारे गहू व तांदुळा  क्विंटल धान्याचे वितरण स्वस्त धानय दुकानदारांना करण्यात आले आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.

*********
विधान परीषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांचा जिल्हा दौरा
बुलडाणा, दि.25 - विधान परीषदेचे  उपसभापती  माणिकराव ठाकरे  जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार, 27 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 4.45 वाजता मलकापूर रेल्वे स्थानक येथे आगमन व बुलडाणाकडे प्रयाण, सकाळी 6.10 वाजता  शासकीय विश्रामगृह बुलडाणा येथे आगमन व राखीव, दुपारी 12.00 वाजता  माजी केंद्रीय मंत्री मुकुलजी वासनिक यांच्या वाढदिवसानिमित्त बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या गर्दे हॉल येथील कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह बुलडाणा येथून खामगांवमार्गे अकोलाकडे  प्रयाण करतील.
0000
खामगांव येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन
  • 200 पदांसाठी होणार भरती
  • www.mahaswayam.in  या संकेतस्थळावर उमेदवारांनी नोंदणी करावी
बुलडाणा, दि. 25 - खाजगी क्षेत्रातील रोजगाराच्या संधी हेरून बेरोजगार युवक-युवतींना त्या उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभाग नेहमी तत्पर असतो. त्यानुसार येत्या मंगळवार, 27 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 11 वाजता गो. से विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगांव येथे बेरोजगारांच्या भरतीसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात नवकिसान फर्टिलायझ, जळगांव या कंपनीला विक्री प्रतिनिधी, लॉकसेफ सेक्युरीटी सर्व्हीस औरंगाबाद कंपनीला सुरक्षा रक्षक/हेल्पर पदाकरीता आणि युरेका फोर्ब्स अकोला कंपनीमध्ये प्रोफेशनल सेल्स ट्रेनी पदाकरीता भरती होणार आहे. ही भरती एकूण 200 पदांसाठी  करण्यात येणार आहे.
   या मेळाव्यात सहभाग घेण्यासाठी उमेदवारांनी www.mahaswayam.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी. ऑनलाईन नोंदणी न केलेल्या उमेदवारांना मेळाव्यात सहभागी होता येणार नाही. संकेतस्थळावर Employment टॅबवर क्लिक करा, जॉब सिकर पर्याय निवडून आपला नोंदणी/आधार कार्ड क्रमांक व पासवर्डने sign in  करावे. त्यानंतर होमपेजवरील जॉब फेअर  हा पर्याय निवडून बुलडाणा जिल्हा निवडावा. तसेच 27 सप्टेंबर 2017 रोजी होणाऱ्या रोजगार मेळाव्यासाठी उपस्थिती नोंदविण्यासाठी क्लिक करावी व आय ॲग्री या बटनावर क्लिक करावी. त्यान्रतर आपल्या पात्रतेनुसार पदाची निवड करून अप्लाय बटनावर क्लिक करावी.  इच्छूक पात्र उमेदवारांनी स्वखर्चाने संबंधित ठिकाणी उपस्थित राहून नोंद करावी व  या मेळाव्यास उपस्थित रहावे.  सहभागाची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी काही अडचण आल्यास 18602330133 क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच मेळाव्याकरीता 07262-242342, 07263-255200 व सचिन पवार यांच्या 9552319696 व व्ही.एस आठवर यांच्या 9422884584  क्रमांकावर संपर्क साधावा.
    मेळाव्यासाठी येताना उमेदवारांनी कार्यालयाचे नोंदणी ओळखपत्र, शैक्षणिक अहर्ततेच्या मूळ प्रमाणपत्र व पाच प्रती, बायोडाटा, आधार कार्ड/ निवडणूक ओळखपत्र, 5 पासपोर्ट फोटो सोबत आणावे. तरी मोठ्या संख्येने उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करून मेळाव्यात सहभागी व्हावे आणि आपली संधी स्वीकारावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक श्री. चिमणकर यांनी केले आहे. 
                                                                        *********




जीएसटीच्या आपसमेळ योजनेची निवड करण्यासाठी 30 सप्टेंबर 2017 पर्यंत मुदतवाढ
बुलडाणा, दि.25 – वस्तु व सेवा कर कायदा, 2017 (जीएसटी) अंतर्गत आर्थिक वर्ष 2017-18 साठी आपसमेळ (कम्पोजीशन) योजना जाहीर केली आहे. या योजनेची निवड करण्यासाठी 30 सप्टेंबर 2017 पर्यंत करण्यासाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे. तरी योजनेची निवड करण्यासाठी इच्छूक असलेल्या व्यापाऱ्यांनी 30 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत जीएसटीच्या www.gst.gov.in  या पोर्टलवरून योजनेची निवड करावी. निवड केलेल्या व्यापाऱ्यांना 1 ऑक्टोंबर 2017 पासून या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
   जे व्यापारी याआधी या योजनेसाठी पात्र असुनसुद्धा योजनेची निवड करू शकले नाही, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. तरी पात्र व इच्छुक व्यापाऱ्यांनी या संधीचा पुरेपुर लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी www.gst.gov.in  संकेतस्थळ, वस्तू व सेवा कर भवन, खामगांव येथील दूरध्वनी क्रमांक 07263-258769 व इमेल आयडी milindkhune3@gmail. com, rnzanke@gmail.com या पत्यांवर संपर्क करावा, असे राज्य कर उपायुक्त टि. के पाचरणे यांनी कळविले आहे.
                                                            ******
पं. दिनदयाल उपाध्याय यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
बुलडाणा, दि. 25 - पं. दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला आज  25 सप्टेंबर 2017 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी प्रकतमेला पुष्पहार अर्पण केला, तर उपस्थितांनी पुष्प अर्पण केले. याप्रसंगी प्र. अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे, उपजिल्हाधिकारी श्रीमती नम्रता चाटे, राजेश देशमुख आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
                                                

No comments:

Post a Comment