कर्जमाफी अर्जामध्ये शेतकऱ्यांनी सर्व बँकाकडील कर्जाची माहिती देणे अनिवार्य
- सर्व शेती कर्जाची माहिती न दिल्यास अर्ज होणार अपात्र
- नव्याने अर्ज न भरताच जुन्या अर्जात एडीट ऑप्शनमधून माहिती द्यावी
बुलडाणा, दि 19 : छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना 2017 अंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येत आहे. या योजनेतंर्गत अर्ज भरण्याची शेवटची मुदत 22 सप्टेंबर 2017 असून अंतिम मुदतीची प्रतिक्षा न करता शेतकऱ्यांनी अर्ज भरावे. मात्र कर्जमाफी अर्जामध्ये सर्व बँकाकडील शेती कर्जाची माहिती देणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी विविध बँकांचे शेती कर्ज काढलेले आहे, त्यांनी सर्व बँक कर्ज खात्यांची माहिती अर्जात भरणे अत्यावश्यक आहे. यामध्ये जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचाही समावेश आहे. माहिती न भरल्यास असे अर्ज कर्जमाफीसाठी अपात्र ठरणार आहे.
अशी माहिती भरण्यासाठी शेतकऱ्यांना नव्याने अर्ज भरण्याची गरज नसून त्याच अर्जामध्ये एडीट ऑप्शनद्वारे ही माहिती भरावी. अर्ज सादर करताना सर्व थकीत खातेदारांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँक, खाजगी बँक व ग्रामीण बँक अशा सर्व प्रकारच्या वित्तिय संस्थांकडून घेतेलल्या सर्व प्रकारच्या कर्जाची माहिती सादर केलेली नसल्यास ती सादर करावी. घेतलेल्या सर्व कर्जाची माहिती सादर केलेली नाही, असे आढळल्यास अशा खातेदारांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. अर्ज सादर करताना सर्व बँकाकडून घेतलेल्या संपूर्ण कर्जाची माहिती सादर करणे अनिवार्य आहे. अशी माहीती सादर न केल्यास व अर्जदाराचा अर्ज कर्जमाफीसाठी अपात्र राहील्यास त्याला स्वत: अर्जदार जबाबदार राहील. तरी ज्यांनी अशी माहिती सादर केली नाही, त्यांनी ती त्वरित ऑनलाईन एडीट ऑप्शनमधून सादर करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी पत्रकान्वये केले आहे.
विविध धार्मिक संस्थानच्या महाप्रसाद वितरणबाबत कार्यशाळा
· अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने प्रशिक्षण
· सहा संस्थानचे विश्वस्त उपस्थित
बुलडाणा, दि 19 : जिल्ह्यात विविध धार्मिक संस्था, देवस्थान यांच्याकडून तसेच संस्थान परिसरातील अन्न व्रिकेते व्यावसायिक यांच्याकडून भाविकांसाठी प्रसाद, महाप्रसादाचे उत्पादन, वितरण, विक्री केली जात आहे. या प्रसादाची गुणवत्ता, दर्जा, अन्न सुरक्षीतता याबाबत माहिती देण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या बुलडाणा कार्यालयाच्यावतीने एकदिवसीय कार्यशाळा शेगांव येथील अन्नपुर्णा व्हेज प्लाझा हॉटेलात नुकतेच पार पडले.
या कार्यशाळेत श्री. संत गजानन महाराज संस्थान मंदीर परीसरातील अन्न व्यावसायिक, संत गोमाजी महाराज संस्थान नागझरी ता. शेगांव, वारी हनुमान वारी ता. संग्रामपूर, संत सोनाजी महाराज संस्थान सोनाळा ता. संग्रामपूर, हिवरा आश्रम संस्थान ता. मेहकर आणि बालाजी संस्थान वाशिम यांचे विश्वस्त, प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यशाळेचे उद्घाटन मुख्यालयाचे सहआयुक्त (अन्न) सी.डी. साळुंके, अमरावती विभागाचे सह आयुक्त सुरेश अन्नापुरे यांनी दीप प्रज्वलन करून केले.
कार्यशाळेत एफएसएसएआय दिल्लीचे फॉस्टेक ट्रेनर डॉ. रश्मी कोल्हे यांनी प्रोजेक्टरद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच सहआयुक्त यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. कार्यशाळेमध्ये उपस्थितांच्या शंकांचे समाधान करण्यात आले. तसेच सुरक्षीत व निर्भेळ प्रसाद भाविकांना मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यशाळेचे संचलन व आभार प्रदर्शन अन्न सुरक्षा अधिकारी स.ल. सिरोसीया यांनी केले. याप्रसंगी बुलडाणा कार्यालयातील सहा्यक आयुक्त ज.रा.वाणे, अन्न सुरक्षा अधिकारी यदुराज दहातोंडे, निलेश ताथोड, रावसाहेब वाकडे, गजानन गोरे व रा.ब यादव आदींसह अन्न व्यावसायिक उपस्थित होते.
सर्व बँक कर्ज खात्यांचे वरिष्ठ पातळीवरून एकत्रीकरण होणार
· नव्याने अर्ज न भरता जुन्या अर्जात एडीट ऑप्शनमधून कर्ज खात्यांची माहिती द्यावी
· आधार क्रमांक न दिल्यास कर्जमाफी अथवा प्रोत्साहनपर सवलतीचा लाभ नाही
बुलडाणा, दि 19 : छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना 2017 अंतर्गत कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरणे सुरू आहे. या अर्जासोबत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार कार्ड, गट सर्वे क्रमांक सादर करणे आवश्यक आहे. तसेच सर्व बॅकांमधील सर्व कर्जखात्यांची माहिती सादर करणे आवश्यक आहे. कारण सर्व बँकेच्या कर्ज खात्यांचे वरिष्ठ पातळीवरून एकत्रीकरण होणार आहे.
मात्र काही कर्जदार शेतकऱ्यांनी सर्व बँकाकडील कर्जखात्यांची माहिती ऑनलाईन अर्जात सादर केलेली नाही. तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बँक कर्जदार शेतकऱ्यांनी आधार कार्ड संबंधित बँक शाखेत सादर केलेले नाहीत. सर्व बॅकांचे कर्ज खात्यांचे एकत्रीकरण वरिष्ठ पातळीवर होणार आहे, तेव्हा कुणीही थकीत कर्जदार व नियमित परतफेड केलेल्या सभासदाने आधारकार्ड न दिल्यास त्यांना कोणत्याही राष्ट्रीयकृत अथवा ग्रामीण, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जमाफीचा किंवा प्रोत्साहनपर सवलतींचा लाभ मिळणार नाही.
तेव्हा सर्व कर्जदार शेतकरी बांधवांनी ऑनलाईन अर्जामध्ये आपल्याकडील सर्व प्रकारच्या कर्जखात्यांची माहिती द्यावी. त्याकरीता नव्याने अर्ज न करता, त्याच अर्जामध्ये एडीट ऑप्शनद्वारे सदरचा बदल करता येईल. सर्व कर्जखाते असणाऱ्या बँक शाखांमध्ये आधार कार्ड जमा करावे. अन्यथा त्यामुळे कुणीही कर्जदार शेतकरी संबंधीत लाभापासून वंचीत राहतील, याची सर्वांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment