Wednesday, 6 April 2022

DIO BULDANA NEWS 6.4.2022




                                    डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतिनिमित्ताने सामाजिक समता कार्यक्रमाचे आयोजन

  • दहा दिवस चालणार कार्यक्रम
  • आज उद्घाटन, विविध कार्यक्रमांचे आयोजन

बुलडाणा, (जिमाका) दि. 6 : सर्वांना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती राज्यभरात आजपासून 6 एप्रिल 2022 पासून सलग दहा दिवस अभिनव पद्धतीने साजरी करण्याचे नियोजन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने केली आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

         जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम राबविण्याचे नियोजन विभागाने केले आहे. सामाजिक समता कार्यक्रम सामाजिक न्याय विभागाने दि. 06 एप्रिल पासून सलग दहा दिवस जिल्ह्यात दैनंदिन उपक्रम आयोजित केले आहे. त्यानुसार 7 एप्रिल रोजी विभागाच्या सर्व महाविद्यालये, आश्रमशाळा, वसतिगृहे, निवासी शाळा आदी ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात येतील. त्यानंतर 8 एप्रिल रोजी जिल्हा व विभाग स्तरावर कार्यक्रम आयोजित करून स्वाधार शिष्यवृत्ती, मिनिट्रॅक्टर आदी लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात येईल. दिनांक 9 एप्रिल रोजी ज्येष्ठ नागरिक योजनांच्या जनजागृती संदर्भात मेळावे किंवा तत्सम उपक्रम राबविण्यात येणार असून जिल्हा आरोग्य विभागाच्या समन्वयाने विभागाच्या शैक्षणिक अस्थापनांमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले जातील. तसेच 10 एप्रिल रोजी समता दूतांमार्फत ग्रामीण व शहरी भागात लघुनाट्य, पथनाट्य आदी माध्यमातून विभागाच्या योजनांच्या माहिती बाबत प्रबोधन करण्यात येईल.

त्याचप्रमाणे 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करून विविध वक्त्यांना निमंत्रित करून महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यात येईल. त्यानंतर 12 एप्रिल रोजी मार्जिन मनी योजनेच्या जनजागृती बाबत तसेच लाभ मिळालेल्या लाभार्थींसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात येतील. तसेच 13 एप्रिल रोजी संविधान जागर हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. तर 14 एप्रिल रोजी सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या सर्व कार्यालये, शाळा, वसतिगृहे इत्यादी सर्व आस्थपनांमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करून त्याठिकाणी, व्याख्याने, चर्चासत्रे आदी कार्यक्रम घेतले जातील. त्याचबरोबर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान मेळावा आयोजित करून बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याची माहिती देणारे व्याख्यान आयोजित केले जाईल. याच दिवशी सर्व जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या कार्यरत राहून, जात पडताळणी प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने वितरित करतील.

    तसेच 15 एप्रिल रोजी प्रत्येक सहाय्यक आयुक्त कार्यालयात महिला मेळावे आयोजित करून बाबासाहेबांच्या महिलांविषयी कार्याची माहिती देणारे कार्यक्रम घेतले जातील. तृतीयपंथी जनजागृती व नोंदणी करून ओळखपत्र देण्याचा उपक्रम राबविण्यात येईल. दिनांक 16 एप्रिल या अंतिम दिवशी, ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमध्ये स्वच्छता करणे तसेच वस्त्यांमध्ये विभागाचे लाभ मिळालेल्या व्यक्तींचे मनोगत जाणून घेणे आदी उपक्रम राबवून या समता कार्यक्रमाचा समारोप करण्यात येईल. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता कार्यक्रम राबविला जाणार आहे. हे सर्व कार्यक्रम यशस्वी करावेत तसेच यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी दिली आहे. दरम्यान भारतरत्न डॉ. बाबासाहेब सामाजिक समता कार्यक्रमाचे उद्घाटन आज रोजी 6 एप्रिल 2022 रोजी सहायक आयुक्त कार्यालयात करण्यात आले. यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत, कर्मचारी उपस्थित होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज मेरत यांनी तर आभार प्रदीप धर्माधिकारी यांनी केले. संचालन तालुका समन्वय सतीश बाहेकर यांनी केले.

                                                                        ******

अन्न व्यावसायिकांनी फॉसकॉस प्रणालीवर मोबाईल क्रमांक व इमेल आयडी अद्ययावत करावे

• अन्न व औषध प्रशासन विभागाचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 6 : सद्यस्थितीत सर्व अन्न व्यावसायिकांना देण्यात येणारे परवाने व नोंदणी प्रमाणपत्रे www. foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर अर्ज केल्यावर प्राप्त होतात. तथापि, बऱ्याच वेळा अर्ज करताना मोबाईल क्रमांक व ई मेल आयडी हा स्वत:चा न देता इतर व्यक्तींचा दिलेला असतो. तसेच बहुतांश वेळेस भ्रमणध्वनी क्रमांक व ईमेल आयडी क्रमांक बदललेला असतो. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन तथा अन्न सुरक्षा कायदे मानदे प्राधिकरण यांच्याद्वारे पाठविण्यात आलेल्या सुचना, कायदेशीर नोटीस, नोटीफिकेशन, सुधारणा नोटीस त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. परिणामी कायदेशीर पेच उद्भवू शकतो. तसेच कायद्यात झालेल्या नवीन तरतूदीबद्दल माहिती मिळत नाही. जिल्ह्यातील सर्व अन्न व्यावसायिक, परवाना, नोंदणीधारक यामध्ये खाद्यपदार्थ उत्पादक, रिपॅकर, घाऊक / किरकोळ विक्रेते, वितरक, हॉटेल, रेस्टॉरंट व्यावसायिक, फिरते विक्रेते व इतर अन्न व्यावसायिक यांनी त्यांचे मोबाईल  क्रमांक व ई मेल आयडी अद्ययावत करून घ्यावेत. त्यासाठी अन्न व औषध प्रशासन, बुलडाणा कार्यालयाकडे लेखी स्वरूपात अर्ज सादर करावा. सदर अर्जासोबत परवाना, नोंदणी प्रमाणपत्राची प्रत, आधार कार्ड जोडावे. अन्न व्यावसायिकांचा अर्ज कार्यालयात प्राप्त झाल्यावर त्वरित त्यांची माहिती अद्ययावत करण्यात येईल, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त श्री. केदारे यांनी केले आहे.

                                                                                *****

भुसावळ येथे 10 एप्रिल रोजी माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन

  • मेळाव्यासाठी माजी सैनिकांनी नोंदणी करावी

बुलडाणा, (जिमाका) दि. 6 : स्टेशन हेडक्वार्टर, भुसावळ जि. जळगांव येथे 10 एप्रिल 2022 रोजी आरपीडी मैदानावर शेड क्रमांक पी – 345 या ठिकाणी सकाळी सकाळी 9.30 वाजता माजी सैनिकांसाठी मेळावा अयोजित करण्यात आला आहे. सदर मेळाव्यामध्ये ईसीएचएस पॉलीक्लीनिक, ईसीएचएस कार्ड्स, वेतरन सेल, अभिलेखा कार्यालय स्टॉल, तक्रार काऊंटर, सेक्शन हॉस्पीटल कक्ष व सीएसडी कँटीनची व्यवस्था करण्यात आलेली आहे.  मेळाव्यासाठी स्टेशन हेडक्वार्टर, भुसावळ यांचेकडून वाहनाची कोणत्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली नसून स्वत:च्या बंदोबस्ताने जावायचे आहे. जे माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी जाणार आहेत. अशा सर्व माजी सैनिकांनी वाहन चालक अर्जन गाडेकर यांच्या 9921379711 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून तात्काळ आपली नोंदणी करावी. सदर नोंदणी 8 एप्रिल 2022 पर्यंत सायं 5 वाजेपर्यंत सुरू असेल. दिलेल्या वेळेतच नोंदणी करण्यात येईल. याची सर्व माजी सैनिकांनी नोंद घ्यावी, असे  सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर निंबाजी पडघान यांनी कळविले आहे.

                                                                        *********


 

No comments:

Post a Comment